सुरेखा सिक्री : 'मला पुन्हा चालायचं आहे,' असं म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं 75 व्या वर्षी निधन

    • Author, नम्रता जोशी
    • Role, ज्येष्ठ सिने पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकही आला होता.

'तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या सुरेखा सिक्री यांचं शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं,' त्यांच्या निधनाविषयी कळवताना त्यांच्या मॅनेजरने ही माहिती दिली आहे.

दोनदा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असंही मॅनेजरनी म्हटलंय.

'किस्सा कुर्सी का' पासून सुरेखा सिक्रींनी 1978 मध्ये कारकीर्दीला सुरुवात केली. तमस (1988), मम्मो (1995) आणि बधाई हो (2018) साठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

2019 साली उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते सुरेखा सिक्रींनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला होता. 2018मध्ये रिलीज झालेल्या अमित शर्मा दिग्दर्शित 'बधाई हो' या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला होता.

तरुण मुलं असणाऱ्या जोडप्याचं वाढत्या वयातलं गरोदरपण आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम आणि समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, यावर हा सिनेमा होता.

व्हीलचेअरवर बसलेल्या, अशक्त पण तरीही प्रसन्न चेहऱ्याच्या सुरेखा सिक्री पुरस्कार स्वीकारत असताना जवळपास सर्व उपस्थित उभं राहून टाळ्या वाजवत होते. तिखट बोलणाऱ्या पण लैंगिक संबंधांविषयी आधुनिक विचारसरणी असणाऱ्या आजीच्या भूमिकेसाठी मिळालेली ही दाद होती.

कायम आपल्या सुनेशी वाद घालणारी ही अम्मा एका महत्त्वाच्या क्षणी सुनेच्या बाजूने उभी राहते. पोक्त वयामध्ये आई होऊ घातलेल्या सुनेवर जवळच्या नात्यातल्या महिला टीका करत असताना ही आजी सुनेचा बचाव करत म्हणते, "उसकी मर्जी है वो सेक्स करे," सेक्स करणं हा त्या जोडप्याचा निर्णय असून त्यासाठी त्यांना समाजाच्या परवानगीची गरज नसल्याचंही ही आजी ठणकावते.

सुरेखा सिक्रींनी ज्या झोकात या आजीची भूमिका निभावली, त्याने फक्त मध्यमवयीनच नाही, तर तरुण प्रेक्षकांनाही हे पात्र आवडून गेलं.

कलर्स टीव्हीवरील बालिका वधू या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेतली सिक्रींची दादीसाची भूमिकाही गाजली होती.

2008 ते 2016 दरम्यान सुरू असलेली ही मालिका तामिळ, तेलुगू आणि मल्याळमसह इतर अनेक भाषांत डब करण्यात आली आणि सिक्रींची लोकप्रियता भारतभर पसरली.

तमस आणि मम्मो

अभिनय जगतातल्या त्यांच्या आणखीन 2 भूमिका लक्षणीय होत्या.

गोविंद निहलानींची दूरदर्शन मालिका 'तमस' (1988). याचं नंतर फिल्ममध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि श्याम बेनेगल यांचा 'मम्मो' (1994) हा सिनेमा.

या दोन्ही सिनेमांसाठी त्यांना 'बधाई हो' प्रमाणेच सहाय्यक भूमिकेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण सहाय्यक भूमिका म्हटल्याने या भूमिकांचं महत्त्वं कमी होत नाही.

इतर अनेक अभिनेत्यांप्रमाणेच सुरेखा सिक्री रंगभूमीच्या मार्गे मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्या. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)च्या 1971च्या बॅचच्या त्या विद्यार्थिनी.

70, 80 आणि 90 च्या दशकातल्या अनेक समांतर सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.

1978मध्ये आलेला अमृत नहाटांचा 'किस्सा कुर्सी का' सिनेमा हा इंदिरा गांधींवर आधारित असल्याचं म्हटलं गेलं आणि आणीबाणीच्या काळात म्हणजे 1975-1977 दरम्यान यावर संजय गांधींनी बंदी घातली होती.

समांतर सिनेमात काम

सुरेखा सिक्रींनी अनेक मोठ्या फिल्म निर्मात्यांसोबत काम केलं. श्याम बेनेगल यांच्यासोबत त्यांनी मम्मोसोबतच 'सरदारी बेगम'(1996), 'हरिभरी' (2000) आणि झुबैदा (2001) या सिनेमांत काम केलं.

यासोबतच सईद मिर्झांसोबत 'सलीम लंगडे पे मत रो' (1989) आणि नसीम (1995) आणि अपर्णा सेन यांच्यासोबत 'मिस्टर अँड मिसेस अय्यर' (2003) सिनेमात त्या होत्या.

पण नंतर त्यांनी लहान पडद्यावर जास्त भूमिका केल्या. टीव्हीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून, 90च्या दशकापासून त्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करत होत्या.

'बनेगी अपेनी बात'मध्ये त्या तरुण मुलींच्या आई होत्या, तर 'जस्ट मोहब्बत'मध्ये त्यांनी चष्मा लावणाऱ्या मिसेस पंडित या शाळेच्या मुख्याध्यापिकेची भूमिका केली होती.

युरिडिस, द ट्रोजन विमेन, अंतोन चेखॉवचं द चेरी आर्केड, जॉन ऑसबोर्नचं लुक बॅक इन अँगर या नाटकांत त्यांनी भूमिका केली. 1989मध्ये त्यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

गेल्यावर्षी महाबळेश्वरमध्ये शूट करत असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि यानंतर त्यांचा वावर कमी झाला. यामुळेच त्यांना अनेक ऑफर्स नाकाराव्या लागल्या.

आणखी एकदा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

अमोल गुप्तेंचा 'स्निफ' हा त्यांचा शेवटचा सिनेमा. झोया अख्तरच्या नेटफ्लिक्सवरील हॉरर घोस्ट सीरिजमध्येही त्यांनी भूमिका केली.

आजारपणातही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यांतली चमक कायम होती. गेल्या वर्षी फिल्मफेअर मासिकाला त्यांनी दिलेली मुलाखत, शेवटच्या मुलाखतींपैकी एक ठरली. त्यात त्या म्हणाल्या होत्या, "मला पुन्हा चालायचं आहे," पण ते मात्र होऊ शकलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)