You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाना पटोले : पंजा फक्त 'टायगर'कडे असतो, 'टायगर' आता काँग्रेसमय झाला #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. पंजा फक्त टायगरकडे असतो, टायगर आता काँग्रेसमय झाला - नाना पटोले
'टायगर अर्थात वाघाला इलाका नसतो. पंजा फक्त टायगरकडे असतो आणि तो आता काँग्रेसमय झाला आहे', असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे 'राष्ट्रीय बंजारा टायगर्स' संघटनेचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
नुकतंच काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी चिंतन बैठकीत 'आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो' असं वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर आज पटोले यांनीही वाघाचा उल्लेख करत तशीच टोलेबाजी केल्याने हा शिवसेनेला टोला असल्याचं मानलं जात आहे. अद्याप शिवसेनेकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
2. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदवी-पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत - मंत्री उदय सामंत
कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
तर खासगी अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना देखील यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंगळवारी (दि. 29 जून) मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, कोरोनामुळे दगावले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्याशिवाय अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही.
त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल, असं मंत्री सामंत यांनी सांगितलं. ही बातमी ई-टीव्ही भारतने दिली.
3. 'पब, डिस्को, बार यांना सवलतींचा प्रसाद तर गणेशोत्सव बंदिवासात'
महाराष्ट्रात पब, डिस्को, बार यांना सवलतींचा प्रसाद आणि गणेशोत्सव मात्र बंदिवासात अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली काल (29 जून) जाहीर केली. त्यामधील नियम आणि अटी जाचक असल्याचं सांगत शेलार यांनी त्यावर आक्षेप घेतला.
"ठाकरे सरकारने गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध एकतर्फी आहेत. कुणाशीही चर्चा न करता सरकारने ही नियमावली जाहीर केली," असा आरोप शेलार यांनी केला आहे.
घरगुती गणेशाची मूर्ती 2 फुटांची ठेवण्याचा निर्बंध कशामुळे घालण्यात आला? कारखान्यात तयार झालेल्या मूर्तींचे आता काय करणार?
या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. लोकांची मदत करण्याच्या भावनेतूनच कोरोना काळात औषधं पोहोचवली - सोनू सूद
कोरोनाच्या संकटकाळात गरजू लोकांची मदत करण्याच्या हेतूनेच रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप गरजवंतांना केलं. त्यात चुकीचं असं काहीच केलेलं नाही, असा दावा अभिनेता सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
कोव्हिड-19 संदर्भात विविध विषयांवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सध्या एकत्रित सुनावणी सुरू आहे. यामध्ये खासगी लोकांना कोरोनावरील औषध वाटणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
"कोरोनाच्या काळात आपण अखंडपणे लोकहिताचं काम केलं. पहिल्या लाटेत घरी परतणाऱ्या मजुरांना मदत केली. तर दुसऱ्या लाटेत लोकांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध होत नव्हती. लोकांना मदत म्हणून औषधं त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही केलं," असा युक्तिवाद सूदच्या वकिलांनी यावेळी केला.
उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल- भास्कर जाधव
गेली दोन वर्षे राज्य सरकार कोरोना साथीचा सामना करत आहे. या कालावधीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचंच काम करत आहेत.
"त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा," असा सल्ला देत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
"आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन," असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना जाधव बोलत होते.
राज्यावर कोणतंही संकट आलं तर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी असं काही न करता फक्त त्रास देण्याचा काम केलं आहे. त्यामुळेच आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं जाधव म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)