You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळे म्हणतात, 'अजितदादांचे नाव वापरणाऱ्या विरोधात मी स्वतः तक्रार करेन' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. 'अजितदादांचे नाव वापरणाऱ्या विरोधात मी स्वतः तक्रार करेन'- सुप्रिया सुळे
"अजित पवार यांचे नाव वापरून ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, मी तुमच्या वतीने त्याविरोधात तक्रार करेन," अशी रोखठोक भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
"तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ" असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.
संबंधित बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांची आयुक्तांसोबत बैठक झाली होती. कारवाईचा बडगा दाखवणारे लोक अजित पवारांचं नाव घेतात अशी तक्रार कुटुंबीयांनी केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या असं कुणी करत असेल तर त्याविरोधात तक्रार केली जाईल.
"जर या प्रकरणातले पुरावे तुमच्याकडे असतील तर ते मला द्या तुमच्या वतीने मी त्यांची तक्रार करेन" अशी भूमिका सुळे यांनी घेतली.
2. मी भक्त आहे, मला त्याचा अभिमान आहे - अमृता फडणवीस
"हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे," असं अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. अमृता यांनी ट्वीटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या अनेक वक्तव्यांसाठी चर्चेत राहिल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखती असो की एखाद्या विषयावर मत मांडणं असो, अमृता फडणवीस या सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसल्या आहेत.
17 सप्टेंबर 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'देशाचा पिता' असा केला. त्यानंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या.
यावेळी त्यांनी लसीकरणासंदर्भातली आकडेवारी ट्वीट केली आणि आपण भक्त आहोत असं म्हटलं.
21 जूनपासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं.
त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.
3. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ
अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना नेते प्रदीप शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झाली आहे.
प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संतोष शेलार, आनंद जाधवलाही 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांआधी प्रदीप शर्मा यांची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या अनुषंगाने शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना कोर्टाकडून दिलासा देण्यात आला होता. पण त्यांनतर आता कोर्टाकडून 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
4. फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन-नाना पटोले
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
"देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव आहे. 2014 च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण पाच वर्षात त्यांना आरक्षण दिले नाही, धनगर समजाची त्यांनी घोर फसवणूक केली.
"मराठा समाजाचीही दिशाभूल केली आणि त्यांचे आरक्षण रद्द झाले आणि आता ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झाले आहे," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली असून जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल," असंही पटोले पुढे म्हणाले.
5. राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या टीईटीअभावी धोक्यात
राज्यातील अनुदानित शाळेतील जवळपास 8 हजार आणि विनाअनुदानित शाळेतील जवळपास 17 हजार शिक्षकांनी आपली नोकरी टिकावी म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
या शिक्षकांनी थेट दिल्ली गाठत सर्वोच्च न्यायालयात नोकऱ्या टिकवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 23 (1) तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने 12 फेब्रुवारी 2013 रोजी टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली.
हा निर्णय घेतल्यानंतरही राज्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या.
त्यानंतर केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात 2017 मध्ये सुधारणा केल्यानंतर राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी नोकरीतील शिक्षकांना 31 मार्च 2019 ची डेडलाइन दिली होती. या तारखेपर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होतील, त्यांनाच सेवेत राहण्याची मुभा देण्यात आली होती.
राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)