'मी लवकरच घरी येईन, आपण अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करू', हल्ल्यावेळी पत्नीला धीर देणारा अखेरचा कॉल

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'मी सुखरूप घरी येईन, आपण लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा करूया…' हे मरीन इंजिनिअर पटनाला सुरेश यांनी आपल्या पत्नीला सांगितलेले शेवटचे शब्द ठरले.

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात सुरेश यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

"ते दररोज मला 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवायचे. व्हीडिओ कॉल करणं शक्य नसेल तर मेसेज मात्र नक्की करायचे. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याकडून कोणतीही माहिती आली नव्हती. आणि आता त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली," हे बीबीसीला सांगताना सुरेश यांच्या पत्नी भार्गवी यांना अश्रू अनावर झाले.

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमचे रहिवासी असलेले 44 वर्षीय सुरेश पटनाला हे ओमानच्या किनाऱ्याजवळ 'एमटी सेट्टेबेलो' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन भारतीय कर्मचाऱ्यांपैकी एक होते, अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिली.

विशाखापट्टणममधील श्रीहरीपुरम येथील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, मित्र, राजकीय नेते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने पोहोचले.

घराच्या भिंतींवर सुरेश आणि भार्गवी यांचे कौटुंबिक फोटो लावलेले दिसतात. घरातील कपाटांमध्ये ठेवलेली खेळणी त्यांच्या मुलांवरील प्रेमाची साक्ष देतात.

'घरी येतो म्हणाले होते, पण...'

"9 जूनला आमचं अखेरचं बोलणं झालं होतं. ते लवकरच घरी येतील असं म्हणाले होते. पण ते स्वतः येण्याऐवजी त्यांचा मृतदेह येईल, असं कधीच वाटलं नव्हतं," असं दोन मुलांना जवळ घेऊन रडत रडत भार्गवी म्हणाल्या.

"बुधवारी (10 जून) रात्री जहाजावरील एका खलाशाने ग्रूपमध्ये पाठवलेल्या मेसेजमधून जहाजावर हल्ला होऊन आग लागल्याचे समजलं. त्यात माझे पती आणि इतर दोघेजण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली," असं भार्गवी यांनी सांगितलं.

सुरेश यांना दोन मुलं आहेत. भार्गवी यांच्या बहिणीचे आणि तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन मुलींची जबाबदारीही सुरेश यांच्या कुटुंबाने स्वीकारली होती. त्यामुळे आता चारही मुलांच्या भविष्याबाबत कुटुंबीय चिंतेत आहेत.

"संपूर्ण कुटुंब त्यांच्या कमाईवरच अवलंबून होतं. आता मुलांचं शिक्षण आणि त्यांचा सांभाळ कसा करायचा, हेच मला समजत नाहीये," अशी खंत भार्गवी यांनी व्यक्त केली.

'मला आता नोकरी मिळणं कठीण'

39 वर्षीय भार्गवी सध्या आपल्या कुटुंबाच्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत.

"लग्नापूर्वी मी एका खासगी कंपनीत 6 वर्षे काम केलं होतं. पण आता चार मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. या वयात नोकरी मिळवणं सोपं नाही," असे त्या म्हणाल्या.

"मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर खूप खर्च येतो. तो खर्च कसा भागवायचा, हेच मला आता समजत नाही," असं त्यांनी सांगितलं.

हल्ल्यापूर्वी नेमके काय घडलं?

सुरेश हे मागील साधारण 15 वर्षांपासून मरीन इंजिनिअर म्हणून काम करत होते. नोकरीच्या निमित्ताने ते अनेक देशांमध्ये जात असत, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

"ते दर 2-3 दिवसांनी व्हीडिओ कॉल करायचे. जहाजावरील इतर सहकारी कर्मचाऱ्यांशीही आमची बोलणी करून द्यायचे. पण 5 जूनपासून व्हीडिओ कॉल येणं कमी झालं होतं. 9 जूननंतर तर ते पूर्णपणे बंद झालं. समुद्रात असल्यामुळे नेटवर्कची अडचण असेल, असं मला वाटलं होतं," असे त्या म्हणाल्या.

10 जूननंतर सुरेश यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही किंवा संपर्क झाला नाही.

जहाजावरील जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने तो तपासण्यासाठी सुरेश गेले होते. त्याच वेळी हल्ला झाल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, अशी माहिती जहाज व्यवस्थापनाने दिल्याचे भार्गवी यांनी सांगितले होते.

"खरं तर ते दुसऱ्या मुख्य अभियंत्याला मदत करण्यासाठी तात्पुरत्या कामावर गेले होते. परंतु, तेथील परिस्थितीमुळे त्यांची ड्युटी वाढवण्यात आली," असं त्या म्हणाल्या.

'सर्व बाजूंनी हल्ले सुरू'

अखेरच्या वेळी बोलताना त्या भागात तणावाची परिस्थिती आहे, असं सुरेश यांनी सांगितलं होतं, असं भार्गवी यांनी म्हटलं.

"मी ज्या ठिकाणी आहे तिथे आजूबाजूला हल्ले होत आहेत. काही जणांचा मृत्यूही झाला आहे. पण मला काहीही होणार नाही, मी सुरक्षित घरी परत येईन. आपण आनंदात लग्नाचा वाढदिवस साजरा करू," असं सुरेश यांनी म्हटल्याचं भार्गवी यांनी सांगितलं.

24 जूनला त्यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण होणार होते, असं त्या म्हणाल्या.

"ते वर्षातील बहुतांश वेळ समुद्रातच असत. मी त्यांना इथेच नोकरी शोधा असे सांगायचे. पण मुलांच्या भविष्यासाठी हेच चांगले आहे, असे ते म्हणायचे."

'मृतदेह सापडला नाही, म्हणून आशा जिवंत होती'

सुरेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असली तरी मृतदेह अद्याप सापडला नव्हता. त्यामुळे ते जिवंत असतील अशी आम्हाला आशा होती, असं भार्गवी यांचे काका रामकृष्ण यांनी सांगितलं.

"नंतर तीन भारतीयांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच भार्गवी यांचे दुःख शब्दांत मांडता येणार नाही," असं त्यांनी सांगितलं.

"सुरेश जहाजावर इन्चार्ज म्हणजेच मरीन चीफ इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांना सहा महिन्यांची सुट्टी मिळत असत. पण कामावरील आदर भावनेमुळे ते जास्त वेळ समुद्रातच राहणं पसंत करत. ते फक्त दोन-तीन महिन्यांचीच सुट्टी घेत असत," असं सुरेश यांचे वडील रामकृष्ण यांनी बीबीसीला सांगितलं.

कुटुंबाची अपेक्षा काय?

सुरेश यांचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणला जावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

"त्याची कमाई हाच आमच्या कुटुंबाचा आधार होता. सरकारने मृतदेह भारतात आणण्यासोबतच कुटुंबाला आर्थिक मदत करावी," असं वडील रामकृष्ण यांनी सांगितलं.

मृतदेह कधी भारतात आणला जाईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने काय म्हटलं?

सुरेश पटनाला यांच्यासह तीन भारतीयांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने शोक व्यक्त केला आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत एमटी सेट्टेबेलो जहाजावर झालेली घटना 'अत्यंत दु:खद' असल्याचं म्हटलं आहे.

सुरुवातीला बेपत्ता मानले गेलेल्या तीन भारतीयांचे मृतदेह नंतर सापडले. त्याबाबत त्यांच्या कुटुंबांना माहिती देण्यात आली आहे.

मृतदेह मायदेशी आणण्यासाठी आणि बचावलेल्या कर्मचाऱ्यांना देशात परत आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.