You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : IPL 2021 मधून रवीचंद्रन अश्विनसह 'या' 5 खेळाडूंची माघार
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतात एकीकडे कोव्हिडच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. अशात आयपीएलचे सामने सुरू ठेवावे की नाही, असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
एकीकडे कोरोना विषाणूमुळे मोठं आरोग्य संकट भारतावर असताना दुसरीकडे सामन्यांचं आयोजन काही जणांना खटकतंय. तर सगळं काही बंद असताना आयपीएलचे सामने हा एक चांगला विरंगुळा ठरत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
अश्विन, अँड्र्यू टायची माघार
गेल्या काही दिवसांतल्या एकदोन घटनांमुळे ही चर्चा पुन्हा सुरू झालीय. त्याचं झालं असं, की भारताचा अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने आयपीएलमधून काही काळासाठी माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
त्यानं ट्विटरवरून याविषयीची माहिती देताना म्हटलं आहे, की मी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून काही काळ विश्रांती घेत आहे. माझे कुटुंबीय आणि नातलग कोव्हिडविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी त्यांच्याबरोबर असावं असं मला वाटतं. गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळायला परतेन. धन्यवाद.
यंदाच्या मोसमातून अशी माघार घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
पण अश्विननं हा निर्णय जाहीर करण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पा या तिघांनीही आयपीएलमधून माघार घेतली. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आपल्या सीमा बंद करण्याची भीती पाहता त्यांनी माघारी परतायचं ठरवलं.
तर इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टनही बायोबबलचे नियम पाळणं थकवणारं असल्याचं सांगत आयपीएलमधून काही दिवसांपूर्वी बाहेर पडला.
लोकांसाठी खेळाचा विरंगुळा
यादरम्यानच अडम गिलख्रिस्टनं शनिवारी ट्वीट केलं आणि प्रश्न विचारला. गिलख्रिस्ट म्हणाला, "कोव्हिडची रुग्णसंख्या भयावह आहे. अशात आयपीएल सुरू आहे हे अयोग्य आहे? की रोज रात्री लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणारं महत्त्वाचं 'डिस्ट्रॅक्शन' आहे? तुमचं मत काहीही असलं, तरी माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.
गिलख्रिस्टच्या ट्वीटवर अनेकांनी आयपीएल मॅचेसविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या आसपास कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळे काहीसं निराशेचं वातावरण आहे. काहीजण क्वारंटानईमध्ये आहेत आणि घरातच एका खोलीत अडकून पडले आहेत. ते सगळं दुःख मॅचचे काही तास विसरायला होतं, असं अनेकांनी म्हटलंय.
कुटुंबियांसोबत आयपीएल पाहणं ही एकच सकारात्मक गोष्ट सध्या देशातल्या घराघरात होते आहे, असं मधू सांगतात.
तर महेश यांच्यामते आयपीएलमुळे लोक तासंतास घरातच बसून राहू शकतायत.
तर अभिनेत्री श्रेया धन्वंतरीनं काहीशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल सुरू आहे आणि त्याविषयी कोणी बोलत नाहीये, ही गोष्ट सध्या देशात एक मानवी वैद्यकीय राजकीय संकट सुरू असल्याचं विसरायला लावते असं ती म्हणाली आहे. https://twitter.com/shreya_dhan13/status/1386263944130670596
आयपीएल सुरू ठेवावी की नाही?
दरम्यान, काही वृत्तपत्रांनी आयपीएलचं कव्हरेज कमी केलं आहे, याचीही चर्चा सुरू आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसनं आयपीएलच्या बातम्याच बंद केले् आहेत. 'देशात एवढी भीषण परिस्थिती असताना व्यावसायिक उद्देशानं बायोबबलच्या कवचात खेळाचा सोहळा भरवणं योग्य नाही. खेळाला विरोध नाही, पण ही वेळ चुकीची आहे.' अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दुसरीकडे आयपीएलच्या मॅचेस उशीरापर्यंत चालतात, तोवर कर्मचाऱ्यांना काम करत राहावं लागतं, जे सध्याच्या काळात योग्य नाही असं काहींना वाटतं. त्यामुळेही काही वृत्तपत्रांनी आयपीएलचं कव्हरेज कमी केलं आहे.
तर काहींच्या मते अशी भूमिका खेळासाठी योग्य नाही, कारण त्यामुळे क्रीडापत्रकारांच्या नोकरीवरही पुढे गदा येऊ शकते.
प्रश्न फक्त पत्रकारांच्या नोकरीचा नाही. भारतीय क्रिकेटचं सगळं अर्थकारण आयपीएलवर अवलंबून आहे. इतकं की, काही झालं तरी ही स्पर्धा खेळवणं, बीसीसीआयला भाग पडलं. म्हणूनच गेल्या वर्षी दुबईत ही स्पर्धा भरवण्यात आली.
यंदा खरं तर स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच ती खेळवावी की नाही, अशी चर्चा रंगली होती. विशेषतः मुंबईत. पण बायोबबलचे नियम आणि कडक अटीशर्तींवर आयपीएलच्या आयोजनाला परवानगी मिळाली.
त्याविषयी बोलताना काहींनी आयपीएल आणि निवडणुकीच्या प्रचारसभांविषयी दुजाभाव होत असल्याचं मत मांडलंय. एकीकडे गर्दीत नियमांचं पालन होताना दिसत नाही, तरीही निवडणुकीच्या प्रचारसभा आणि कुंभ मेळ्याला परवानगी मिळते. मग आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना, सगळे नियम पाळून खेळवले जात अ्सताना, त्याला हरकत का घ्यावी असाही प्रश्न काही चाहते विचारत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)