पुणे : मुलाशी चॅटिंग केली म्हणून वडिलांनी आपल्या 2 मुलींना ट्रकखाली चिरडत स्वत: केली आत्महत्या

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

मुलगी कुठल्यातरी मुलाशी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असल्याचा राग आल्याने वडिलांनी आपल्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडून स्वतः आत्महत्या केली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मयत भरत ज्ञानदेव भराटे (40) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

भरत याची पत्नी सपना भराटे यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून नंदिनी भराटे (18) आणि वैष्णवी भराटे (14) अशी खून झालेल्या दोन मुलींची नावे आहेत.

कोणत्या तरी मुलासोबत चॅटिंग करून आमची मुलगी चुकीची वागली. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. कोणालाही दोषी न धरता आमचा अंत्यविधी एकत्र करावा, अशी चिठ्ठी भरत भराटे यांनी लिहून ठेवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भरत भराटे हा ट्रक ड्रायव्हर होता. तर त्याची पत्नी सपना या एका कंपनीत कामाला आहेत. रविवारी सकाळी 7 वाजता सपना कामावर गेल्या. संध्याकाळी कामावरुन आल्यावर भरतनं त्यांना सांगितलं की, मी आपल्या मुलीचा नंदिनीचा मोबाईल दुपारी चेक केला. तेव्हा ती कुठल्यातरी मुलाशी चॅटिंग करत असून तिचें बाहेर प्रेमप्रकरण असल्याचं माझ्या लक्षात आलं."

"रात्री जेवण झाल्यानंतर भरत याने एका वहीत काहीतरी लिहून त्यावर सपना यांची सही घेतली. वहीत काय लिहिले आहे ते वाचू द्या असं सपना यांनी म्हटल्यावर भरत त्यांच्यावर रागावला. त्यामुळे मग सपना यांनी अधिक विचारपूस केली नाही. रात्री एकच्या सुमारास भरत याने नंदिनी आणि वैष्णवी या दोघींना घराबाहेर नेलं. यावेळी ट्रकचा आवाज आल्यानं सपना यांना जाग आली. त्या घराबाहेर आल्यानंतर दोन्ही मुलींना भरत याने घरासमोरील रस्त्यावर झोपवल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर भरतनं या दोन्ही मुलींच्या अंगावर ट्रक चालवला. हा ट्रक सुरू असतानाचा भरतनं ट्रकसमोर उडी मारून आत्महत्या केली," लोंढे पुढे सांगतात.

दरम्यान, याप्रकरणाचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)