You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : मुंबईतला वाहनांसाठीचा कलर कोडिंगचा नियम रद्द - मुंबई पोलीस
मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रवास करणाऱ्या वाहनांच्या वर्गीकरणासाठीचा कलर कोडिंगचा निर्णय मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय.
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरची वाहनं कमी करत, त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून गाड्यांवर लाल, हिरवा वा पिवळा असे स्टिकर लावण्यास मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली होती.
पण आता हे रंगातलं वर्गीकरण बंद करण्यात आलं आहे. पण वाहनांची तपासणी सुरू राहणार असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय.
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरील वाहनं कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोडिंग सुरू केलं होतं.
- वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सेवा यांच्या गाड्यांसाठी लाल रंग
- भाजीपाला, किराणा, फळं आणि डेअरीच्या गाडीसाठी हिरवा रंग
- अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग
या गाड्यांवर लावण्यात येणारे हे 6 इंचाचं गोलाकार स्टिकर गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर हे स्टिकर लावण्यात येत होते.
काही टोलनाके आणि नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून हे स्टिकर मिळत होते.
स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे आदेश दिले होते.
"टोलनाक्यांवर तपासणीमुळे डॅाक्टर, अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय साधनांच्या गाड्या अडकत आहेत. यासाठी कलर कोड पॅालिसी सुरू करतोय. अत्यावश्यक सेवेतील लोकांना गाड्यांवर स्टिकर लावावे लागतील," असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं होतं.
पोलीस, महानगरपालिका, पत्रकार , डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून काहीजण फायदा घेत आहेत. त्यामुळे गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसाठी काम करत आहेत का, याची तपासणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
"महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन चांगल्याप्रकारे आपल्याला पार पाडायचा आहे," असंही हेमंत नगराळे म्हणाले होते.
दुसरीकडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले,"भाजी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसत नाही. जर जास्त गर्दी दिसत असेल, तर ते मार्केट एक-दोन दिवसात बंद केलं जाईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)