'फोटो काढण्यासाठी विनवणी केली', या ट्रम्प यांच्या दाव्यावर जॉर्जिया मेलोनी यांनी असं दिलं प्रत्युत्तर

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

जी-7 शिखर परिषदेसाठी या आठवड्यात फ्रान्सला गेलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे इटली आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी सांगितलं की, ट्रम्प त्यांच्याबद्दल मनाला येईल त्या गोष्टी बोलले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका इटालियन टीव्ही वाहिनीशी बोलताना म्हटलं की, जी-7 शिखर परिषदेमध्ये त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मेलोनी यांनी त्यांना 'विनवणी' केली होती.

त्यांच्या या वक्तव्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

त्यांच्या या विधानावरून निर्माण झालेला वाद इतका विकोपाला गेला की, इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी या आठवड्याच्या शेवटी होणारा अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अँटोनियो ताजानी यांनी ट्रम्प यांच्यावर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल 'अपमानजनक' वक्तव्य केल्याचा आरोप केला. त्यांनी ही वक्तव्यं 'गंभीर आणि आक्षेपार्ह' असल्याचं म्हटलं.

मेलोनी यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून सांगितलं की, ट्रम्प यांच्या विधानामुळे त्यांना 'आश्चर्य' वाटलं आणि त्यांचं हे वक्तव्य 'पूर्णपणे खोटं' होतं.

विशेष म्हणजे, फ्रान्समधील जी-7 शिखर परिषदेत या दोघांमध्ये बऱ्यापैकी सौहार्द दिसून आलं आणि इराणसोबतच्या संभाव्य युद्धावरून निर्माण झालेल्या तणावानंतर त्यांचे संबंध काही प्रमाणात सुधारल्याचंही दिसून आलं.

ट्रम्प यांनी काय म्हटलं?

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 शिखर परिषदेतील एका व्हीडिओमध्ये मेलोनी आणि ट्रम्प एका लहान सोफ्यावर एकत्र बसून गंभीर चर्चा करताना दिसले होते.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी 'एलए7' (LA7) या टीव्ही वृत्तवाहिनीला सांगितलं की, "मी त्यांच्याशी (मेलोनी) बोललो, याचा कदाचित त्यांना आनंद झाला असेल. मला त्यांच्याशी बोलण्याची काहीच गरज नव्हती."

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच त्या पत्रकाराला इटलीच्या पंतप्रधानांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ही मुलाखत झाली.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार आणि 'एलए7'वरील वक्तव्यानुसार, ट्रम्प म्हणाले की, "त्यांनी मला फोटो काढण्याची विनंती केली होती. त्यांना माझ्यासोबत फोटो हवा होता. मी सहसा फोटोसाठी पोझ देत नाही, पण मला त्यांची दया आली."

रॉयटर्सनं वृत्त दिलं की, या वृत्तवाहिनीने मूळ ऑडिओ प्रसारित न करता केवळ डब अर्थात भाषांतरित केलेली आवृत्ती प्रसारित केली.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी या वादाबाबतचा एक व्हीडिओ त्यांच्या 'एक्स' (X) हँडलवर शेअर केला.

या व्हीडिओचं भाषांतर करताना रॉयटर्सनं लिहिलंय की, "त्या विधानांवर प्रतिक्रिया देताना मेलोनी म्हणाल्या, 'डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं पूर्णपणे खोटी आहेत. खरं सांगायचं तर, मला आश्चर्य वाटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या मित्रराष्ट्रांशी अशा प्रकारे का वागतात, हे मला समजत नाही. असो, असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.'"

मेलोनी पुढे म्हणाल्या, "मी इतकंच म्हणू शकते की, पाश्चात्य जग आणि अमेरिका यांच्या शत्रूंबाबत ते कठोर भूमिका घेत नाहीत, ही निराशाजनक बाब आहे. ते त्यांच्या नेत्यांशी मात्र खूपच सौम्यतेनं वागतात."

यासोबतच त्या म्हणाल्या की, "एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, मी किंवा इटली, यांपैकी कुणीही कधीच कुणाकडे कसलीही विनंती करत नाही."

दरम्यान, अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द करण्याची घोषणा करताना इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी 'एक्स' (X) वर लिहिलं की, "पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वापरलेले गंभीर आणि अपमानजनक शब्द हा संपूर्ण इटलीचा अपमान आहे."

ते म्हणाले की, "ट्रम्प ऐतिहासिक संबंध नष्ट करत आहेत."

ताजानी यांना मेलोनी यांचे सर्वात जवळचे राजकीय सहकारी मानले जाते. ते सहसा प्रसारमाध्यमांच्या झोतात राहणं टाळतात.

त्यांनी ट्रम्प यांच्यावर अशा सुरात टीका केली आहे, जी यापूर्वी अकल्पनीय वाटत होती.

संबंधांमध्ये कटूता

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान कार्यालयातील अवर सचिव जिओव्हानबॅटिस्टा फॅझोलारी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "(डोनाल्ड ट्रम्प) अमेरिका आणि युरोपमधील ऐतिहासिक संबंध जाणीवपूर्वक नष्ट करत आहेत की त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, हे अस्पष्ट आहे."

त्यांनी पुढे म्हटलं की, "आपल्या अनुचित आणि कठोर विधानांद्वारे त्यांनी एक कठीण कामगिरी साधली आहे. ती म्हणजे संपूर्ण युरोप खंडात अमेरिकेची लोकप्रियता कमी करणं. अशी कृती, ज्यामुळे युरोपचे नव्हे, तर खुद्द अमेरिकेचेच सर्वाधिक नुकसान झाले आहे."

मेलोनी या एकेकाळी ट्रम्प यांच्या समर्थक होत्या आणि 2025 मधील त्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणाऱ्या त्या एकमेव युरोपीय नेत्या होत्या.

युरोपियन युनियनमधील मेलोनी यांचे अनेक सहकारी मेलोनी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संबंध सुधारण्यासाठीचा एक संभाव्य दुवा म्हणून पाहत होते.

तरीही, मेलोनी यांनी इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या युद्धाला उघडपणे विरोध केला आहे. एप्रिलमध्ये इटालियन वृत्तपत्र 'कोरिएरे डेला सेरा' (Corriere della Sera) सोबतच्या दूरध्वनीवरील मुलाखतीत ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, "मला वाटलं होतं की त्यांच्यात हिंमत आहे, पण मी चुकीचा होतो."

जेव्हा ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे यांच्यावर "गुन्हेगारीच्या बाबतीत मवाळ आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अत्यंत अपयशी" असल्याचा आरोप केला, तेव्हा मेलोनी यांनी त्यांचं हे विधान अस्वीकारार्ह असल्याचं म्हटलं होतं.

इटलीमध्ये व्यापक प्रतिक्रिया

ट्रम्प यांच्या अलीकडील मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना, इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांनी मेलोनी यांना फोन करून आपला पाठिंबा दर्शविला. त्याच वेळी, इटलीतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली.

विरोधी पक्ष असलेल्या 'डेमोक्रॅटिक पार्टी'चे डाव्या विचारसरणीचे सिनेटर फिलिपो सेन्सी यांनी म्हटलं की, इटलीच्या पंतप्रधानांशी अशा उद्धट सुरात बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.

'फाईव्ह स्टार मुव्हमेंट'चे नेते ज्युसेप्पे कोंटे यांनी म्हटलं आहे की, इटली अशा अपमानास पात्र नाही. वॉशिंग्टनकडून सवलती मिळवण्याचा कोणताही प्रयत्न राष्ट्रीय सन्मान आणि हितांच्या किंमतीवर कधीही होऊ नये, असंही त्यांनी नमूद केलं.

मेलोनी यांच्या 'ब्रदर्स ऑफ इटली' या पक्षाचे सिनेटमधील गटनेते लुसिओ मालान यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प यांची ही विधाने विविध युरोपियन नेत्यांबद्दल त्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांच्या मालिकेचाच एक भाग आहेत.

त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, या विधानांमुळे प्रामुख्याने ट्रम्प यांची स्वतःची प्रतिमा आणि विश्वासार्हता मलीन होत आहे.

मालन यांनी नमूद केलं की, जी-7 शिखर परिषदेचा व्हीडिओ ट्रम्प यांनी सांगितलेल्या गोष्टीपेक्षा अगदी वेगळीच कथा मांडताना दिसतो.

जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा वॉशिंग्टनला 'नाही' म्हणण्यास न कचरण्याच्या मेलोनी यांच्या धोरणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कदाचित नाराज झाले असावेत, असेही त्यांनी सुचवले.

सरकारमधील आघाडीचा पक्ष असलेल्या 'लीग'चे नेते मॅटिओ साल्विनी म्हणाले, "जो कोणी जॉर्जिया यांच्यावर हल्ला करतो, तो आमच्या सर्वांवरच हल्ला करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)