You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेळगावात कन्नड फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिके आक्रमक, शिवसेना नेत्याच्या गाडीवर हल्ला
बेळगाव सीमाभागात मराठी विरूद्ध कन्नड या संघर्षात नवा वाद सुरू झाल्याने पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
बेळगाव शहरात शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. रामलिंगखिंड गल्ली इथं शिवसेनेचं कार्यालय आहे. या कार्यालयात जात असताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवरच्या फलकाला कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा गोंधळ सुरू होता. यावेळी शिवसेना आणि कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यामध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना आवर घातला.
मात्र पोलिसांनी दुट्टपी भूमिका घेत केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले असा आरोप शिवसनेकडून करण्यात येत आहे.
बेळगाव सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक असल्यानं बेळगावमध्ये दुकानांवर इंग्रजीसह मराठी भाषेतील फलक आहेत. मात्र याला कन्नड संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून बेळगावमध्ये मराठी विरूद्ध कन्नड भाषिक यांच्यात नव्याने वाद सुरू झाला आहे.
"दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिर परिसरातील धर्मशाळेचा कन्नड भाषेतील फलक हटवण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. यावेळी काही फलक फडण्यात आले तर काहींना काळे फासण्यात आलं. याचा निषेध म्हणून कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून बेळगाव इथं प्रत्युत्तर देण्यात आलं," अशी प्रतिक्रिया कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक वृत्तवाहिन्याना दिली आहे
याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र कन्ऩड संघटनांनी आज (शुक्रवार) दुपारी शिवसेना नेत्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने मराठी भाषिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
"कन्नड संघटनानी पोलिसांसमोर गाडीवर हल्ला केला असताना पोलिसांनी त्यांना का अटक केली नाही," असा सवाल जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे.
तक्रार दिल्यानंतर कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं शिरोळकर यांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी दुट्टपी भूमिका घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमध्ये शिवसेनेसह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
"गेल्या ४ दिवसांपासून शिवसेना कार्यालयाला पोलिस संरक्षण दिलं आहे. अशावेळी पोलीस संरक्षणात कन्नड संघटनांनी हे कारस्थान केलंय," असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्या सरिता पाटील यांनी केलाय.
पोलिसांच्या समोर हा प्रकार घडलाच कसा असा सवाल करत पाटील यांनी पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला.
हा प्रकार घडला तेव्हा उपस्थित असेलेल्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच याबाबत लवकर कारवाई केली नाही तर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
"कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना मराठी माणसाकडून प्रत्यत्तर दिले जाईल. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाला स्वीकारावी लागेल," असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिलाय.
"महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वारंवार शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याने समितीकडून जिल्हा प्रशासानाला सहकार्याची भूमिका घेतली जाते. मात्र तरीही आज झालेला प्रकार हा निंदनीय आहे. गेले काही दिवस कन्नड संघटनेचे कार्यकर्ते मराठी व्यावसायिकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत, "असा आरोप शेळके यांनी केलाय.
कोल्हापुरातही पडसाद
दरम्यान कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेकडून याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
"संबंधित कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर कर्नाटक पासिंगची वाहनं रोखून धरण्यात येतील," असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय.
"अशा कार्यकर्त्यावर कर्नाटक प्रशासानने नियंत्रण ठेवणं गरजचे आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे प्रशासनाचं काम आहे. यात प्रशासनाला अपयश येत असेल तर आम्हाला पावलं उचलावी लागतील," असंही पवार यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)