You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाना पटोले: 'आरक्षण संपवण्याचा भाजप, आरएसएसचा डाव'- #5मोठ्याबातम्या
1) आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव- पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टी आणि रा. स्व. संघावर पुन्हा एकदा तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे.
सर्वांत जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या आहेत. त्यानंतर आरक्षण संपणार आहे. हा आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव असल्याचा पटोले', यांनी आरोप केला आहे.
धनगर समाजाला भाजपानं 5 वर्षांत आरक्षण दिलं नाही, या समाजाची फसवणूक केली असंही ते म्हणाले आहेत. ही बातमी टीव्ही9 ने दिली आहे.
2) पुण्यातील आणखी एका गुंडाला अटक
गजानन मारणे प्रकरणानंतर आता निलेश घायवळ या गुंडाला अटक करण्यात आली आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे. भिगवण येथे एकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री त्याला नगर जिल्ह्यातील जामखेडमधून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे.
एकेकाळी निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यामध्ये मोठे गँगवॉर्स झाली आहेत. निलेश गायवळ याच्यावर एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. घायवळची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पुढील एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
3) 'धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरुषार्थ'
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपल्याला धमक्या येत असल्याची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्वीट्समध्ये त्या म्हणतात, 'दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही.
मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेट मध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेन मध्ये लिहिलेला त्यावेळी त्यांना काय व कसे फोन करून त्रास दिला गेला ज्याची मी साक्षीदार आहे लढलेलो तेव्हाही. त्यांचा लढासुद्धा प्रस्थापितांविरोधात होता.' ही बातमी लोकमतने दिली आहे.
4) अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनसाठी गुजरात सरकारकडून मोठी रक्कम
अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनसाठी गुजरात सरकारने 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याचे अर्थमंत्री नितीन पटेल यांनी काल 2.27 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. नितीन यांचा हा नववा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात पटेल यांनी नगरविकास विभागासाठी 13.493 कोटी, जललंपदेसाठी 5494, पाणीपुरवठ्यासाठी 3947, शेतीसाठी 7232 कोटी रुपये दिले आहेत. हे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
5) शशिकला यांचा राजकारणाला रामराम
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री शशिकला यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना शशिकला यांनी द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घेण्यात यावी असं आवाहन केलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
शशिकला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, "जया जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. तिच्या मृत्यूनंतरही मी तसे करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल अशी मी प्रार्थना करते.''
त्या म्हणाल्या, की "मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. अम्मा (जयललिता) आणि तमिळनाडूच्या जनतेचे मी नेहमी कृतज्ञ आहे.''
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)