शाहिद आफ्रिदीच्या वयाचा जांगडगुत्ता का होतो?

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

निवृत्तीनंतर शाहिदी आफ्रिदीच्या वयाची चर्चा का सुरू झाली आहे?

शाहिद आफ्रिदी हे नाव क्रिकेट रसिकांना नवीन नाही. बॅटने बॉलर्सना बुकलून काढणारा, आपल्या स्पिन बॉलिंगने भल्याभल्या बॅट्समनला नांगी टाकायला लावणारा आणि उत्तम फिल्डर ही आफ्रिदीची मैदानावरची ओळख.

पण पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूच्या वयाचा विषय निघाला की गोष्टी रंजक होऊ लागतात. पंधरा वर्षांहून अधिक काळ मैदान गाजवलेल्या आफ्रिदीचं नेमकं वय किती? हे त्यालाही उलगडलं नसल्याचं परवा स्पष्ट झालं.

आफ्रिदीच्या वयाची चर्चा आता का सुरू झाली?

1 मार्च हा आफ्रिदीचा वाढदिवस. जगभरातल्या चाहत्यांनी आफ्रिदीला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आफ्रिदीने लिहिलं, "तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मन:पूर्वक धन्यवाद. आज मी 44 वर्षांचा झालो.

"माझे कुटुंबीय आणि तुम्ही सगळे चाहते ही माझी ताकद आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मुलतानसाठी खेळताना मी अतिशय आनंदी आहे. मुलतान संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल".

आफ्रिदीने विनम्रपणे चाहत्यांना अभिवादन केलं मात्र ट्वीटमध्ये त्याने स्वत:चं जे वय सांगितलं त्यावरून धुरळा उडाला.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे आफ्रिदीची जी अधिकृत माहिती आहे त्यानुसार त्याची जन्मतारीख 1 मार्च 1980 अशी आहे. ही तारीख प्रमाण मानली तर 1 मार्च 2021 रोजी आफ्रिदीचं वय 41 असायला हवं. पण आफ्रिदीने तर स्वत: केलेल्या ट्वीटमध्ये 44 वर्षांचा झाल्याचं म्हटलं.

गोष्ट इथे संपत नाही. 2019 मध्ये आफ्रिदीचं आत्मचरित्र गेमचेंजर या नावाने प्रकाशित झालं. त्यात आफ्रिदीने पदार्पणावेळी स्वत:चं वय 16 नव्हे तर 19 होतं असं लिहिलं आहे. 1975 मध्ये जन्म झाल्याचंही आफ्रिदीने म्हटलं आहे.

आफ्रिदीने पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आधारभूत मानल्या तर पदार्पणावेळी त्याचं वय 21 भरतं. आफ्रिदीने 2 ऑक्टोबर 1996 रोजी नैरोबीत केनियाविरुद्ध पदार्पण केलं. पहिल्या मॅचमध्ये आफ्रिदीला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नाही. बॉलिंग करताना आफ्रिदीने 10 ओव्हरमध्ये 32 रन्स दिल्या. त्याला एकही विकेट पटकावता आली नाही.

दुसऱ्या मॅचमध्ये आफ्रिदीच्या कामगिरीची समस्त क्रिकेटविश्वाने दखल घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये आफ्रिदीने 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि 11 षटकारांसह 102 रन्सची अविश्सनीय खेळी केली.

आफ्रिदीने अवघ्या 37 बॉलमध्ये शतकाला गवसणी घातली. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अशा खेळी बॅट्समन सातत्याने साकारतात मात्र 25 वर्षांपूर्वी अशी खेळी साकारणं अद्भुत होतं.

त्यावेळी आफ्रिदीचं वय लहान होतं. विदेशातल्या खेळपट्यांवर आंतराष्ट्रीय दर्जाच्या बॉलर्ससमोर खेळणं नेहमीच आव्हानात्मक असतं. त्यावेळच्या बातम्यांनुसार वनडेतलं वेगवान शतक आफ्रिदीने 16 व्या वर्षी झळकावलं होतं.

वेगवान शतकाचा सनथ जयसूर्याचा विक्रम आफ्रिदीने मोडलाच मात्र सगळ्यांत कमी वयाचा वनडे शतकवीर होण्याचा मानही आफ्रिदीने मिळवला. स्मार्टफोनच्या ईएमआय नंबरप्रमाणे आफ्रिदीच्या खेळीचं विवरण होतं.

अफ्रिदीने त्या इनिंगमध्ये प्रत्येक बॉलवर काढलेले रन्स पुढील प्रमाणे आहेत. 0610400600661166264400661411041606024100. हे पाहिले की कुणीही थक्क होऊन जाईल.

आजही वनडेतला सगळ्यांत कमी वयाचा (16) शतकवीर हा विक्रम आफ्रिदीच्याच नावावर आहे. मात्र आफ्रिदीनेच लिहिलेल्या पुस्तकानुसार आफ्रिदीचं पदार्पणावेळचं वय 19 होतं. पण आफ्रिदीने जन्मवर्ष 1975 म्हटलं आहे. त्यामुळे पदार्पणावेळी त्याचं वय 21 होतं असा अर्थ होतो. यामुळे आफ्रिदीचं नेमकं वय किती? आणि खरंच तो सगळ्यात कमी वयाचा वनडेतला शतकवीर आहे का? यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.

जन्मवर्ष 1975 ग्राह्य धरलं तर आफ्रिदीचं 1 मार्च 2021 रोजी वय 46 होतं. पण आफ्रिदीने सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये 44 वर्षांचा झाल्याचं म्हटलं आहे.

जन्मवर्ष 1980 ग्राह्य धरलं तर आफ्रिदीचं 1 मार्च 2021रोजी वय 41 होतं पण आफ्रिदीने स्वत:च 44 वर्षांचा झालो असं म्हटलं आहे.

त्यामुळे आफ्रिदीच्या नेमक्या वयाभोवतीचं गूढ वाढतच चाललं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)