पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेन्नई दौरा, स्वागत आणि विरोधाचे हॅशटॅग ट्रेंड

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई दौऱ्यावर आहेत. तिथल्या अनेक प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

ते विमानतळावरून थेट हेलिकॉप्टरने लष्करी तळ असलेल्या अडियारला गेले आणि तिथून ते कारने नेहरू स्टेडियमला गेले. या स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

ज्या रस्त्याने पंतप्रधानांचा ताफा गेला त्या रस्त्यावर पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. नेहरू स्टेडियमवरच्या कार्यक्रमानंतर दुपारी ते केरळच्या कोच्चीला रवाना होतील.

पंतप्रधानांच्या दक्षिण भारतातल्या या दोन राज्यांच्या दौऱ्यावर असताना संपूर्ण देशभरात ट्वीटरवर #GoBackModi आणि #PoMoneModi हे दोन हॅशटॅग पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात ट्रेंड होत आहेत.

हा हॅशटॅग गेल्या 15 तासांहूनही अधिक काळापासून पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे #TNWelcomesModi आणि #KeralaWelcomesModi हे दोन हॅशटॅग त्यांच्या स्वागतासाठीही ट्रेंड होत आहेत.

पंतप्रधानांचा चेन्नई आणि कोच्ची दौरा

पंतप्रधान आज दिवसभरात चेन्नई आणि कोच्ची या दोन शहरांचा दौरा करणार आाहेत. त्यापूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्याची माहिती देणारे दोन ट्वीट केले. तमिळ आणि मलयाळम या दोन भाषेत हे दोन ट्वीट्स आहेत.

प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी चेन्नईमध्ये तब्बल 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चेन्नईतल्या नेहरू इनडोर स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी 4,486 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय, 3,640 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजनही करणार आहेत. तसंच लष्कराला अर्जुन युद्ध टँक सुपूर्द करणार आहेत.

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुप्रतिक्षित मेट्रो सेवा आणि चेन्नई बीच ते अटीपट्टीपर्यंतच्या चौथ्या रेल्वे लाईनचंही उद्घाटन करणार आहेत.

या कार्यक्रमानंतर जवळपास साडे तीन वाजता पंतप्रधान कोचीला रवाना होतील.

आज चेन्नईत मेट्रो प्रवास मोफत

चेन्नईमध्ये आजपासून मेट्रोसेवा सुरू होत असल्याने आज दिवसभर मेट्रो सेवा मोफत असणार आहे. कुणालाही तिकीट काढण्याची गरज नाही.

चेन्नईत मेट्रो रेल्वे विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वॉशरमेनपेट ते विंबको नागा मार्ग आजपासून प्रवासासाठी सुरू होतोय. त्यामुळे मेट्रोच्या सर्व मार्गांवर रविवारच्या दिवशी मोफत प्रवासाची सोय मेट्रो व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिली आहे. दर रविवारी दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंतचा मेट्रो प्रवास मोफत करता येणार आहे.

#GoBackModi हॅशटॅग होतोय ट्रेंड

येत्या काही महिन्यात तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये विधानसभाा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या आजच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दौऱ्यामुळे राजकारण तापू लागताच ट्वीटरवरही याचे पडसाद बघायला मिळाले.

कालपासूनच ट्वीटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. तसंच केरळमधल्या दौऱ्याविरोधात #PoMoneModi हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

या दोन्ही हॅशटॅगसोबत लोक केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या भूमिकांचा कडाडून विरोध करत आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी आंदोलन करत आहेत.

तरीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. या मुद्द्यावरून ट्वीटरवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, घरगुती वापराच्या गॅसचे वाढते दर, समाजात तेढ निर्माण करणारं राजकारण, राज्यांच्या स्वायत्त अधिकारांविरोधात केंद्र सरकारची कारवाई, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हिंदी भाषासक्ती अशा मुद्द्यावरूनही लोकांनी हॅशटॅग वापरत मोदींचा विरोध केला आहे. या सर्व मुद्द्यांवरून ट्वीटरवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

एका यूजरने लग्नाच्या पहिल्या रात्रीसुद्धा कॉम्प्युटरवर काम करत बसलेल्या नवरदेवाचा फोटो टाकत हा मुलगा #GoBackCowrdModi, #GoBackSadistModi, #GoBackFacistModi ट्रेंड करण्यात बिझी आहे, अशी उपरोधिक टीका केली आहे.

तर एकाने "संपूर्ण भारतभर मोदींचा विरोध होतोय. मात्र, हा विरोध नेमका आणि दमदारपणे प्रकट करण्याचं धाडस केवळ तामिळनाडू आणि केरळच्या जनतेने दाखवल्याचं" म्हटलं आहे.

तर आंदोलनजीवी सवुक्कू शंकर यांनी ट्वीटरवर गेल्या 15 तासांपासून #GoBackModi पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत असल्याचा फोटो टाकत सर्वांनी हे ट्वीट शेअर करावं, असं म्हणत मोदींच्या दौऱ्याचा विरोध केला आहे.

#TNWelcomesModi

आर. के. राधाकृष्णन यांनी, "भाजपकडे सर्वात मोठं आणि ताकदवान आयटी सेल आहे. मात्र, तरीही ट्वीटरवर #GoBackModi पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय आणि #TNWelcomesModi हा हॅशटॅग कुठेतरी खाली आहे. पंतप्रधान जेव्हा जेव्हा तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर येतात त्यांना या अपमानाचा सामना करावा लागतो. भाजपचं आयटी सेल काय करतंय?", असा सवाल विचारात टोला हाणला आहे.

एकीकडे विरोध होत असताना भाजप नेते आणि मोदी समर्थकांनी #TNWelcomesModi असा हॅशटॅग चालवला आहे.

अभिनेत्री खुशबू पूर्वी काँग्रेसमध्ये असताना मोदींविरोधात बोलायच्या. मात्र, पक्षांतर करून भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी मोदींच्या कार्यावर स्तुतीसुमनं उधळायला सुरुवात केली. आजच्या हॅशटॅगच्या लढाईतही त्या उतरल्या.

खुशबू यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, "माझा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद. मी पूर्वी जिथे होते ती माझी चूक होती. द्रमुक आणि काँग्रेस अभद्र युती."

खुशबू यांच्याप्रमाणेच भाजप नेते एच. राजा, माजी आयपीएस अधिकारी आणि सध्या तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष असलेले के. अन्नामलाई, यासारख्या अनेक भाजप नेत्यांनी #TNWelcomesModi या हॅशटॅगवरून मोदींचं स्वागत केलं आहे. "विकास पुरुषाचं स्वागत" म्हणत तामिळनाडूतील भाजप नेते एच राजा यांनी मोदींचं स्वागत केलं आहे.

तर के. अन्नामलाई यांनी #TNWelcomesModi हा हॅशटॅग वापरून मोदींची स्तुती करणारी कविताच लिहिली आहे. यात ते भारताच्या ओजस्वी आणि उत्तुंग नेत्यामुळे भारतात नवी पहाट होत असल्याचं म्हटलं आहे. या महापुरुषाने आपला समृद्ध इतिहास विस्मृतीत जाण्यापासून वाचवला आहे. ज्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी अर्जुनासारखी क्षमता आहे आणि ज्याच्या प्रयत्नांनी तामिळनाडूत कमळ उमलणार आहे, अशा नेत्याचं स्वागत, असं अन्नामलाई यांनी लिहिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)