You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी 'डूम्सडे मॅन', निर्मला सीतारामन यांचा घणाघात #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. राहुल गांधी ' डूम्सडे मॅन', निर्मला सीतारामन यांचा घणाघात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी भारतासाठी 'डूम्सडे मॅन' बनत चालल्याचं त्या म्हणाल्या. डूम्सडे मॅन म्हणजे विनाशाला कारणीभूत ठरणारी व्यक्ती. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. प्रभात वृत्तपत्राने ही बातमी छापली आहे.
घटनात्मक पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचा सतत अवमान करून आणि विविधी विषयांवर दिशाभूल करणारी माहिती सादर करून राहुल गांधी देशासाठी 'डूम्सडे मॅन' बनत चालल्याचं त्या म्हणाल्या.
"काँग्रेसचे माजी अध्यक्ष विविध विषयांवर खोटी माहिती आणि गैरसमज पसरवत आहेत. पण, त्यांनी केलेल्या आरोपांवर सरकारकडून दिली जाणारी उत्तरं ऐकण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. आपण काँग्रेस पक्षाच्या या दोन प्रवृत्ती लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांचा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारवरील विश्वास पूर्णपणे नाहीसा झाला आहे", असं सीतारामन म्हणाल्या.
गुरुवारी लोकसभेत राहुल गांधी अर्थसंकल्पाऐवजी कृषी कायद्यांवर बोलले. त्यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, "ते कदाचित भारतासाठी 'डूम्सडे मॅन' (विनाशकारी) बनत चालले आहेत."
ते अर्थसंकल्पातल्या किमान 10 मुद्द्यांवर ते बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते त्यातल्या एकाही मुद्द्यावर न बोलता केवळ कृषी कायद्यांवर बोलल्याने निराशा झाल्याचं त्या म्हणाल्या.
2. …तर दिल्लीची गादी हस्तगत करू, जानकरांचा पवारांसमोर प्रस्ताव
मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि धनगर नेते महादेव जानकर यांनी एकप्रकारे शरद पवार यांच्यासमोर लोकसभेचा प्रस्ताव मांडला.
जेजुरी गडावर अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याप्रसंगी जानकर बोलत होते. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
शिवरायांनी मराठा आणि होळकर समाजाची सोयरीक केली होती. याचा आधार घेत महादेव जानकर म्हणाले, "आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो."
3. 'दाढी वाढवून शिवरायांशी तुलना करणाऱ्यांना शिवरायांचा राजधर्म कळणार नाही'
शिवजयंती सोहळ्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत चांगलंच सुनावलं.
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे, हे विसरता कामा नये."
इतकंच म्हणून ते थांबले नाहीत. आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच आम्ही घेत आहोत. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांसोबत तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही."
यावर्षी शिवजयंती अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांमध्ये साजरी करण्यासंबंधी एक पत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. यावरून भाजपने शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलं आहे. सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेकदा लोटांगण घातलं आहे आणि आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधनं घालून शिवसेनेने 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा नवा प्रयोग सादर केला, अशी जोरदार टीका भाजपने केली आहे. त्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. सरकारनामाने ही बातमी दिली आहे.
4. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन
राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी केली जाईल आणि गरज असेल त्यांच्यावर योग्य कारवाईदेखील केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडिया स्टार असलेली 22 वर्षांची पूजा चव्हाण या तरुणीचा काही दिवसांपूर्वी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या कथित आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्यात बरीच चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणात थेट शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अखेर या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी केली जाईल आणि गरज असले त्यांच्यावर कारवाईदेखील केली जाईल. पण, गेले काही दिवस लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5. न्यायालयात न्याय मिळत नाही, माजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली खंत
न्यायालयात न्याय मिळत नाही, अशी टीका माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
या कार्यक्रमात बोलताना माजी सरन्यायाधीश गोगोई म्हणाले, "देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही."
गोगोई सरन्यायाधीश असताना त्यांच्याच कार्यालयातील एका महिलेने त्यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा त्यांनी स्वतः केला होता, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केला होता. या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, असा सवाल कार्यक्रमात विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना गोगोई म्हणाले, "मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळणार नाही."
अयोध्या आणि राफेल प्रकरणात सरकारला अनुकूल निकाल दिल्यामुळेच राज्यसभेची खासदारकी मिळाली, या आरोपासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गोगोई म्हणाले, "मी असल्या गोष्टींचा विचार करत नाही. मी माझ्या विवेकाशी कटिबद्ध आहे. संसदेचं वेतन मी घेत नाही. माध्यमं आणि टीकाकार त्याची चर्चा करत नाही."
ते पुढे म्हणाले, "भाजप सरकारच्या बाजूने मी निकाल दिला, असं म्हटलं जातं. पण, त्या निकालांचा आणि राज्यसभेची खासदारकी यांचा काहीही संबंध नाही. सौदा करायचा असता तर राज्यसभेच्या जागेवर कुणी समाधान मानले असते का? राज्यसभेच्या खासदारकीसाठी मी एक रुपयाही मानधन घेत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)