IndvsAus : ऑस्ट्रेलियात रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिलसह 5 खेळाडू आयसोलेट

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियात पाच भारतीय क्रिकेटपटूंना खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे. मेलबर्नमध्ये एका इनडोअर रेस्टॉरंटमध्ये हे पाचही खेळाडू जेवण करण्यासाठी बसलेले असल्याचा एक व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता.
या व्हीडिओमुळे रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या पाच खेळाडूंनी बायो-बबल नियमाचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात होतं. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
तोपर्यंत पाचही खेळाडूंना खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे. दरम्यान, सर्व खेळाडू सरावासाठी उपलब्ध असतील, असंही संघ व्यवस्थापनाने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यामध्ये दोन सामने झाले असून आणखी दोन सामने होणं बाकी आहे. तिसरा कसोटी सामना 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे पाचही जण मेलबर्नमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. बायोबबलच्या नियमांचा भंग झाला आहे का? यासंदर्भात बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अॅडलेड कसोटीत भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. मात्र मेलबर्न कसोटीत दिमाखदार विजय मिळवत भारतीय संघाने त्या पराभवाची परतफेड केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल जेवणाकरता बाहेर पडले होते. ते ज्या हॉटेलात गेले होते तिथे नवलदीप सिंग नावाचा चाहताही होता. क्रिकेटपटूंना पाहून त्याला आनंद झाला. त्याने यासंदर्भात केलेल्या ट्वीटमुळे हे प्रकरण उजेडात आलं आहे.
माझ्या मागच्या टेबलावर टीम इंडियाचे स्टार खेळाडू बसले आहेत अशा आशयाचं ट्वीट नवलदीप यांनी केलं होतं. क्रिकेटपटूंना पाहून आनंदलेल्या नवलदीप सिंग यांनी खेळाडूंच्या जेवणाचं बिल परस्पर भरून टाकलं. क्रिकेटपटूंनी पैसे घेण्याची विनंती नवलदीप यांना केली. नवलदीप यांनी पैसे नको, सेल्फी देण्याची विनंती केली. खेळाडूंचा छोटा व्हीडिओही नवलदीप यांनी ट्वीटरवर शेअर केला. सेल्फी झाल्यानंतर ऋषभ पंतला मिठी मारली असंही नवलदीप यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन क्रिकेटपटूंवर कठोर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत संघाचा भाग नसलेल्या अनोखळी व्यक्तीला मिठी मारल्याने कोरोना नियमावलीचा भंग झाला आहे का? याचा तपास सुरू आहे. दरम्यान नवलदीप यांनी पुन्हा एक ट्वीट करत उत्साहाच्या भरात ऋषभला मिठी मारल्याचं म्हटलं आहे. मला प्रचंड आनंद झाला होता त्यामुळे मी तसं लिहिलं असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Alex Davidson
ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. सुदैवाने बॉक्सिंग डे ज्या ठिकाणी झाली त्या मेलबर्नमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने निर्बंध तितके कठोर नाहीत. मात्र खेळाडू तसंच संघातील अन्य खेळाडूंना नियमावली देण्यात आली आहे. त्याचं पालन करणं अनिवार्य आहे. बाहेर गेल्यास आऊटडोअर स्वरुप असलेल्या ठिकाणी खावं असाही एक नियम आहे. मात्र नवलदीप यांनी शेअर केलेल्या व्हीडिओतलं रेस्टॉरंट बंदिस्त स्वरुपाचं दिसत आहे.
कोण आहेत हे खेळाडू?
मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा वनडे तसंच ट्वेन्टी-20 मालिकेत खेळू शकला नाही. अडलेड आणि मेलबर्न कसोटीतही तो नव्हता. ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमांप्रमाणे 14 दिवसांचं क्वारंटीन संपवून रोहित भारतीय संघात दाखल झाला. शुक्रवारीच रोहितची उपकर्णधारपदी निवड जाहीर करण्यात आली होती.
ऋषभ पंत वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेचा भाग नव्हता. अडलेड कसोटीत भारतीय संघव्यवस्थापनाने वृद्धिमान साहाला प्राधान्य दिलं. मात्र साहाची कामगिरी लौकिकाला साजेशी न झाल्याने मेलबर्न कसोटीत पंतला स्थान देण्यात आलं. पंतने बॅटिंगमध्ये चांगलं प्रदर्शन केलं मात्र कीपिंगमध्ये त्याच्या हातून चुका झाल्या.

फोटो स्रोत, Visionhaus
शुभमन गिलने मेलबर्न कसोटीत पदार्पणातच चांगल्या खेळाने चाहत्यांना प्रभावित केला. U19कॅप्टन, भारत अ, पंजाब रणजी संघ, आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघ अशा विविध पातळ्यांवर सातत्याने धावा करणाऱ्या शुभमनची अडलेड कसोटीत निवड करण्यात आली नव्हती. मेलबर्न कसोटीत त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली.
पृथ्वी शॉ वनडे आणि ट्वेन्टी20 मालिकेत संघाचा भाग नव्हता. अडलेड कसोटीत पृथ्वीच्या तंत्रकौशल्यातील उणीवा स्पष्ट झाल्या. मेलबर्न कसोटीसाठी पृथ्वीच्या जागी शुभमनला संधी देण्यात आली.
नवदीप सैनी वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेत संघाचा भाग होता. मोहम्मद शमी आणि उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने सैनीला पदार्पण मिळण्याची शक्यता होती. मात्र सैनीऐवजी सिराजला पसंती देण्यात आली.
पाच खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याने सिडनी कसोटीत ते खेळणार का? यासंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
कसा आहे दौरा?
भारतीय संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका गमावली. त्यानंतर ट्वेन्टी-20 मालिका जिंकली. सध्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सामने सुरू आहेत. अॅडलेड कसोटीत भारतीय संघाचा दुसरा डाव 36 धावातच आटोपल्याने नामुष्की ओढवली होती.
भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. विराट कोहली अॅडलेड कसोटीनंतर पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत अमूलाग्र सुधारणा करत विजय मिळवला. मालिका 1-1 अशा बरोबरीत असून 7 तारखेपासून तिसरी कसोटी सिडनी इथे सुरू होत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























