E85, E100, विमा, उसाचा रस? इथेनॉलवर तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं

इथेनॉल
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, नवी दिल्ली
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे
  • खरंच तुमच्या गाडीच्या टाकीत किती पेट्रोल आहे आणि किती इथेनॉल?
  • खरंच इथेनॉलमुळे आपल्या गाड्यांचा ॲव्हरेज कमी झाला आहे का?
  • आणि भविष्यात देशात फक्त इथेनॉलवरच धावणाऱ्या गाड्या असतील का?

असे काही प्रश्न सध्या तुम्हालाही पडले आहेत का? कारण या गोष्टी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनल्या आहेत.

पण हे इथेनॉल आहे तरी काय? 'उसाचा रस म्हणजेच इथेनॉल', असं गमतीने म्हटलं जाणं कितपत योग्य आहे.

E85 हे इंधन कोणत्या वाहनांमध्ये टाकलं जाऊ शकतं? आणि आता E100 ही काय भानगड आहे?

समजून घेऊ या सोप्या शब्दांमध्ये, 10 प्रश्तोत्तरांमधून...

New Delhi, Jun 05 (ANI): Union Minister for Petroleum and Natural Gas Hardeep Singh Puri fills E85 fuel in a car during the during the launch of E85 fuel (a blend of 85% ethanol and 15% petrol) on World Environment Day at an Indian Oil fuel station on Pusa Road, in New Delhi on Friday. (ANI Photo/Naveen Sharma)

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 5 जून 2026 ला देशात E85 इंधन लाँच करण्यात आलं, ज्याची किंमत सामान्य E20 पेट्रोल पेक्षा प्रतिलिटर 20 रुपये कमी सांगण्यात आली आहे.

1. इथेनॉल काय आहे?

इथेनॉल एक प्रकारचं अल्कोहोल आहे. Ethyl Alcohol – C2H5OH.

या द्रव्याला रंग नसतो, ते Clear liquid म्हणजे पारदर्शक असतं.

ऊस, मका यावर होणाऱ्या प्रक्रियेतून इथेनॉल तयार होतं. ते ज्वलनशील असतं म्हणून ते पेट्रोलमध्ये मिसळून त्याचा इंधनासारखा वापर करण्याला सरकार प्रोत्साहन देतंय. या मिश्रणाला ब्लेंडिंग म्हणतात.

किती प्रमाणात ब्लेंडिंग केलं जातं, त्यानुसार इंधनाचं नाव ठरतं – म्हणजे 10 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं की E10, 20 टक्के मिसळलं तर E20.

2. इथेनॉल ब्लेंडिंग का केलं जातंय?

फक्त नफ्याच्या हेतूने दुधात पाणी मिसळणं याला भेसळ म्हणता येईल. जेव्हा अभ्यासकरून एखादा पदार्थ दुसऱ्यात मिसळला जातो - त्याला ब्लेंडिंग म्हणतात.

इथेनॉल ब्लेंडिंग अभ्यासपूर्वक केलं जातंय.

सरकारने त्याची काय कारणं सांगितली आहेत?

  • भारतामध्ये कच्चं तेल आयात केलं जातं, त्यासाठीचे पैसे डॉलर्समध्ये मोजावे लागतात. आणि जर ब्लेंडिंगमधून 20 टक्के इथेनॉल इंधनात गेलं, तर तितकीच शुद्ध पेट्रोलची आणि परिणामी कच्च्या तेलाची गरज कमी भासेल.
  • इथेनॉलची निर्मिती मका आणि ऊसापासून केली जाते. त्यामुळे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही या मिश्रणातून हातभार लागतोय. केंद्र सरकारची आकडेवारी सांगते की जून 2026 पर्यंत देशभरातल्या ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी यातून 1.58 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
  • इथेनॉल जळताना पेट्रोलपेक्षा कमी धूर निर्माण करतं. त्यामुळे एकूणच कार्बन डायॉक्साईडसह इतर हरित वायूंचं उत्सर्जन 61 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे.
ऊस

फोटो स्रोत, Getty Images

3. इथेनॉल मिश्रणासाठीचं सरकारचं टार्गेट काय आहे?

भारत सरकारने 2014 पासून पेट्रोलमध्ये 1.5 टक्के इथेनॉल इथेनॉल मिसळायला सुरुवात केली. जून 2022 मध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट गाठलं गेलं, आणि मग 2023 हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत गेलं.

2025 मध्ये देशभरात E20 ब्लेंडिंगचं लक्ष्य गाठण्यात यश आलं आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं. आधी यासाठी 2030 हे वर्ष निर्धारित करण्यात आलं होतं.

आज भारतात जी BS6 Emission Standards लागू असलेली पेट्रोल वाहनं विकली जातात, त्यांमध्ये E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉलयुक्त पेट्रोल वापरण्याची परवानगी असते. त्यापेक्षा जास्त ब्लेंडिंगचं इंधन गाडीसाठी योग्य नाही.

Fuel Cap with E20 sticker
फोटो कॅप्शन, गाड्यांमध्ये पेट्रोल टाकीच्या झाकणावरच किती टक्के इथेनॉलचं किती कमाल प्रमाण असावं, याची माहिती दिलेली असते.

4. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे माझ्या गाडीचा ॲव्हरेज कमी होतो का?

इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा असते. त्यामुळेच तुमच्या दुचाकी किंवा कारचं मायलेज कमी होऊ शकतं. तज्ज्ञांनुसार इंजिनमध्ये जरा तांत्रिक बदल करून, काही अतिरिक्त पार्ट जोडून यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते, पण सध्या हे तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध नाही.

E20 इंधनामुळे गाड्यांचं माइलेज फक्त 2 ते 6 टक्के कमी होत असल्याचा दावा भारत सरकारने केलेला आहे. पण प्रत्यक्ष वापरकर्त्यांची तक्रार आहे की गाडीचा ॲव्हरेज 30-50 टक्के कमी झाला आहे.

हे अर्थात ज्याच्या-त्याच्या गाडी चालवण्याच्या सवयीनुसार, ट्राफिकनुसार आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार बदलू शकतं, त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो.

5. E85 ही काय भानगड आहे?

जसं 20 टक्के इथेनॉलयुक्त पेट्रोलला E20 म्हटलं जातं, तसंच 85 टक्के इथेनॉल असलेल्या पेट्रोलला E85 म्हटलं जातं.

5 जून 2026 ला देशात E85 इंधन लाँच करण्यात आलं, ज्याची किंमत सामान्य E20 पेट्रोल पेक्षा प्रतिलिटर 20 रुपये कमी सांगण्यात आली आहे.

HP Petrol Pump in Delhi selling E85 Fuel
फोटो कॅप्शन, E85 इंधन इंडियन ऑईल, HP आणि भारत या तीनही सरकारी कंपन्यांनी विक्रीसाठी आणलं आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, "काही बाबतीत E85 जास्त चांगलं आहे, पण कॅलरिफिक व्हॅल्यू (इंधनाची ऊर्जा साठवण्याची क्षमता) वगैरे पाहता इंजिनची शक्ती कमी असेल, पण यात शंका बाळगू नका की किमतीच्या बाबतीत जो मोबदला मिळतोय तो शक्ती किंवा ऊर्जेची कमतरता भरून काढेल."

म्हणजेच हे इंधन 20 टक्के स्वस्त असलं, तरी ना E85 इंधन सर्वत्र उपलब्ध आहे, ना त्यावर चालणारी वाहनं.

3 जूनलाच हिरो मोटोकॉर्पने फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या दोन टू-व्हीलर लाँच केल्या – स्प्लेंडर आणि HF डीलक्स. त्यानंतर 4 जूनला मारुती सुझुकीने त्यांच्या वॅगन-आर या गाडीचा फ्लेक्स फ्युएल अवतार बाजारात लाँच केला. एक संदर्भ म्हणून, वॅगन-आरच्या सामान्य पेट्रोल (E20) व्हर्जनपेक्षा फ्लेक्स फ्युएल व्हर्जनची किंमत 86 हजार रुपये जास्त आहे.

म्हणून नवीन तंत्रज्ञानासाठी दुर्मिळ इंधन आणि जास्त किंमत, अशी दुहेरी जोखीम आहे.

6. E85 इंधन सामान्य गाड्यांमध्ये टाकलं तर...?

E85 इंधनात बुहतांशी इथेनॉल असल्यामुळे पेट्रोलसाठी किंवा आता अगदी E20साठी तयार करण्यात आलेल्या यंत्रांमध्ये बिघाड होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञ देतात.

त्यातच, इथेनॉल हे Hygroscopic आहे, म्हणजे हे द्रव्य हवेतली आर्द्रता शोषून घेतं. त्यामुळे इथेनॉल युक्त इंधनामुळे इंजिनाचे भाग, फ्युएल लाईन्स, इंधनाची टाकी, पाईप, टाकीचे सील अशा गोष्टींचं नुकसान किंवा झीज होण्याची शक्यता असते, विशेषतः जुन्या गाड्यांमध्ये. परिणामी या गाड्यांचा देखरेखीचा, मेन्टेनन्सचा खर्च वाढतो, ज्याचा भार ग्राहकांवर नकळतपणे पडतो.

त्यामुळे आत्ताच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकीच्या झाकणावरच किती टक्के इथेनॉलचं किती कमाल प्रमाण असावं, याची माहिती दिलेली असते.

7. इथेनॉल वापरामुळे गाडीचा विमा अवैध ठरतो का?

नुकत्याच काही ठिकाणी अशा बातम्या आल्या की काही विमा कंपन्यांनी E20 इंधनाच्या वापरामुळे नुकसान झाल्यावर विमा दिला जाणार नाही.

ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने 9 जूनला प्रकाशित केलेल्या एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की, "E20 सज्ज गाड्यांमध्ये E20 इंधन वापरलं, तर तुमचा विमा वैध राहतो, आणि क्लेमवर कुठलाही परिणाम होणार नाही... ...पण जर तुम्ही तुमच्या गाडीत असं इंधन वापरत असाल जे तुमच्या गाडीसाठी बनलेलं नाहीये, तर त्याला गैरवापर किंवा निष्काळजीपणा म्हटलं जाईल. अशा परिस्थितीत विमा देणारे त्या दृष्टिकोनातून क्लेमचं आकलन करून, तुमचा क्लेम नाकारू शकतात."

ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने 9 जूनला प्रकाशित केलेल्या एका ब्लॉगमध्ये असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, ICICI Lombard Blog

फोटो कॅप्शन, ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने 9 जूनला प्रकाशित केलेल्या एका ब्लॉगमध्ये

या ब्लॉगपोस्टवरून वादंग झाल्यानंतर अखेर कंपनीने स्पष्ट केलं की, "वाहनांचा विमा हा एखाद्या अडीअडचणीला कामी येतो, जसं की अपघात प्रसंगी किंवा चोरीनंतर. वाहनात कोणतं इंधन भरलं जातंय, त्याचा याच्याशी काहीएक संबंध नाही. त्यामुळे पारंपरिक इंधन वापरल्यामुळे जो क्लेम मान्य केला जाऊ शकतो, तोच क्लेम E20 इंधन वापरल्यावरही मान्य केला जाऊ शकतो. ICICI लोंबार्ड तुम्ही वापरलेल्या इंधनाच्या आधारे कोणताही क्लेम नाकारणार नाही."

ICICI Lombard Clarification

फोटो स्रोत, ICICI Lombard

फोटो कॅप्शन, ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीचं स्पष्टीकरण

12 ऑगस्ट 2025 मध्ये केंद्र सरकारनेही अशा अफवांना नाकारत स्पष्ट केलं होतं की, "E20 इंधनाच्या वापराचा वाहनांच्या विम्यावर परिणाम होत नाही."

8. इथेनॉल डिझेल गाड्यांमध्येही वापरलं जाऊ शकतं का?

नाही, सध्या इथेनॉल हे पेट्रोलमध्येच मिश्रणासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे डिझेल अजूनही बऱ्यापैकी शुद्ध आहे, असं म्हणता येईल. मात्र याच आधारे डिझेलमध्येही आयसोब्युटेनॉल नावाचं आणखी एक अल्कोहोल मिश्रित करून वापरता येईल का, याचा विचार केला जात आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं.

9. E100 काय आहे?

E100 चा सोपा सरळ अर्थ आहे 100 टक्के इथेनॉल. यात इतर कोणतंही इंधन मिश्रित केलं जाणार नाही. नितीन गडकरींनी 10 जूनला नागपुरात बोलताना सांगितलं की त्यांच्या सरकारने 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांनाही हिरवा कंदिल दाखवला आहे, आणि लवकरच मारुती सुझुकी, MG, ह्युंदाई आणि टोयोटा सारख्या कंपन्या त्यांच्या गाड्यांचे E100 व्हर्जन लाँच करतील.

आता हे कितपत यशस्वी ठरतील, आणि यांचा वापर किती होऊ शकतो, हे या इंधनाच्या आणि वाहनांच्या स्वीकारार्हतेवर आणि उपलब्धतेवर अवलंबून आहे. कारण यासाठी वाहन आणि तेल कंपन्यांना बरींच गुंतवणूक करून संशोधन आणि निर्मिती करावी लागणार आहे.

आणि E85 पेक्षाही हे इंधन आणखी कमी दरात उपलब्ध होऊ शकतं, पण तरीही त्यासाठी लागणारी वाहनं जास्त खर्च करून घ्यावी लागू शकतात, हीसुद्ध एक शक्यता आहे.

10. एक लीटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं?

इथेनॉल हे मक्यापासून आणि उसापासून बनवलं जातं. ही दोन्ही पिकं जगभरात जिथेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात, तिथे इथेनॉलंच उत्पादनही तितक्याच प्रमाणात पाहायला मिळतं, उदाहरणार्थ अमेरिका आणि ब्राझीलसारखे लॅटिन अमेरिकेतले देश.

भारत सरकारच्या इथेनॉल वापरासंदर्भातल्या एका अधिकृत दस्तावेजानुसार, एक टन उसापासून 100 किलो साखर आणि 70 लीटर इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. एक लीटर इथेनॉलसाठी साधारण 3000 लीटर पाणी लागतं.

Roadmap for Ethanol Blending in India: 2020-2025

या दस्तावेजात असंही म्हटलंय ती मक्याच्या पिकाला तुलनेने कमी पाणी लागतं (साधारण 2570 लीटर), जे इतर धान्यापासून इथेनॉल तयार करण्यापेक्षा जास्त परवडणारं आहे. भात आणि गव्हाच्या शेतीतून एक लीटर इथेनॉल तयार करायला साधारण 4480 लीटर ते 4900 लीटर पाणी लागतं, असं 2016 मधल्या एका अभ्यासाच्या आधारे या दस्तावेजात सांगण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)