राजनाथ सिंह यांचा चीन-पाकिस्तानला इशारा : 'आम्हाला डिवचलं तर सोडणार नाही'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

"पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष सीमा रेषेवरील वादाबाबत चीनसोबत चर्चा सुरू होती. पण त्यामध्ये अद्याप यश मिळालं नाही," असं भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

या सीमेवर भारत आणि चीनदरम्यान सध्या जैसे थे स्थिती कायम असून पुढच्या फेरीत लष्करी पातळीवर चर्चा होणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली.

ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानवर टीका केली. "जैसे थे स्थिती राहिली तर सीमेवरच्या सैनिकांची संख्या बिलकुल कमी केली जाणार नाही," असं सिंह म्हणाले.

"एखादा देश विस्तारवादी आहे आणि तो भारताच्या भूमीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपली जमीन दुसऱ्यांच्या हाती जाऊ न देण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, अशी कोणतीच गोष्टी भारत सहन करणार नाही," असंही राजनाथ सिंह म्हणाले.

लष्कराचं कौतुक

राजनाथ सिंह यांनी यावेळी भारतीय लष्कराचं कौतुक केलं. "आपल्याला कुणी डिवचलं तर त्याला आपण सोडणार नाही. सर्वांसोबतच आपले संबंध चांगले असावेत, असा आपला प्रयत्न असतो," असं ते म्हणाले.

भारताशी लागून असलेल्या सीमेवर चीन वेगाने बांधकामं करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्य केलं. पण भारतही अशीच कामं करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रीय सुरक्षेबाबत मागच्या सरकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची इच्छा नाही. पण नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानचा उल्लेख

मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानने शेकडो वेळा सीज-फायर आदेशांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तान तयार झाल्यापासूनच भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला. पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. फक्त आपल्याच सीमेमध्ये नव्हे तर सीमेपलिकडे जाऊन शत्रूला प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतामध्ये आहे."

कृषी कायद्यांबाबत

केंद्र सरकारने मंजूर केलेल तीन कृषी कायदे योग्य असल्याचं सांगत राजनाथ सिंह यांनी सरकारची बाजू लावून धरली.

"कृषी क्षेत्राशी संबंधित हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांचं हित केंद्रस्थानी बनवले आहेत. आधीच्या सरकारांच्या तुलनेत या सरकारने MSP मध्ये वाढ केली. या तिन्ही कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असं ते म्हणाले.

"आंदोलनादरम्यान शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होत आहे. यामधून तोडगा निघेल, असा विश्वास वाटतो. मी कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, हे मी सांगू शकतो," असं सिंह म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)