You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : भारतात नव्या कोरोनाचे आणखी 14 रुग्ण आढळले, एकूण संख्या 20 वर पोहोचली
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार स्ट्रेनचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. भारतात आणखी 14 रुग्ण आढळल्याने या नव्या स्ट्रेनच्या बाधितांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.
या 20 रुग्णांपैकी 8 रुग्ण एकट्या दिल्लीत आहेत, तर बंगळुरूतील लॅबमध्ये सात रुग्णांची नोंद झालीय.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून भारतात परतणाऱ्यांना ट्रेस केलं जात आहे.
दुसरीकडे, सात जानेवारीपर्यंत युकेतून भारतात आणि भारतातून युकेत अशा फ्लाइट्स बंद असतील.
आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा नवीन स्ट्रेन हा अधिक वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक असेलच असे नाही असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
भारतात आतापर्यंत एक कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्येत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
"कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार स्ट्रेन हा विध्वंस घडवून आणू शकतो आणि आपली आरोग्य यंत्रणा नियंत्रणाबाहेर जाऊ शकते," असे मत क्रिटिकल केअर एक्सपर्ट डॉ. ए. फथाहुद्दीन यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केले होते.
कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या सहा भारतीयांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू आहे.
देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर युकेतून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची RT-PCR टेस्ट करण्यात येत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे नमुने जिनोम सीक्वेंससाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. याठिकाणी नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे निष्पन्न होते.
गेल्या महिन्याभरात युकेहून 33 हजार प्रवाशी भारतात पोहचले आहेत. यापैकी 114 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.
कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात पुन्हा एकदा पर्यटनावर निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापर्यंत कॅनडा, जपान, स्पेन, स्वीडन आणि फ्रांसमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळला आहे.
युकेमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (28 डिसेंबर) यूकेत 41,385 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर 357 लोकांचा मृत्यू झाला.
कोरोनाचा नवीन प्रकार काय आहे?
सप्टेंबर महिन्यात दक्षिण इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नव्या व्हेरिएंटमध्ये लंडन, दक्षिण-पूर्व इंग्लंड आणि इंग्लंडच्या पूर्व भागात अलीकडच्या काही आठवड्यांत पॉझिटिव्ह केसेसमध्ये वाढ झाल्याने नवीन व्हायरस वेगाने पसरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ONS) म्हटले आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकारात तीन बाबी एकत्र येताना दिसून येत आहेत.
- नवीन स्ट्रेन व्हायरसच्या इतर आवृत्त्यांची वेगाने जागा घेत आहे.
- नव्या प्रकारातले म्युटेशन विषाणूच्या काही भागांवर परिणाम करणारे आहे.
- पेशींमध्ये संसर्ग वाढवण्याची क्षमता विषाणूमध्ये वाढवण्यासाठी असे काही म्युटेशन यापूर्वी प्रयोगशाळेत दिसून आले आहेत.
या कारणांमुळे नवा स्ट्रेन अधिक वेगाने पसरू शकतो अशी शक्यता बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी व्यक्त केली आहे. लस परिणामकारक असेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)