You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, सेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा - राऊत
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय. शिवसेनेचा पंतप्रधान व्हायला हवा," असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात व्यक्त केला. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
"बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलेलं आहे, हा साचा वेगळाच असून, तो कुठेही मिळणार नाही," असं म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, "त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच 105 आमदार घरी बसवले, आता त्यांचे 105 ठीक आहेत, पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील,"
यावेळी संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही वक्तव्य केलं. "मुंबई महापालिकेत ज्यांनी आव्हान दिले आहे की शिवसेनेचा भगवा उतरवू, त्यांच्या छाताडावर उभे राहून भगवा फडकवून दाखवू," असं संजय राऊत म्हणाले.
2) धवलसिंह मोहिते पाटलांनी नरभक्षक बिबट्याला केलं ठार
सोलापुरातील करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी बंदुकीच्या गोळीने ठार केले. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत. अकलूजमधील स्थानिक राजकारणात ते सक्रीय असतात.
करमाळा परिसरात या बिबट्याने दहशत माजवली होती. त्यामुळे बारामतीतले शार्पशूटर तावरे हे बिबट्याला ठार करण्यासाठी आले होते. त्यावेळी डॉ. धवलसिंह यांनी त्यांना साथ दिली.
वांगी येथील केळीच्या बागेत बिबट्याला घेरल्यानंतर बिबट्यानं धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 15 फुटांवर असलेल्या बिबट्याला धवलसिंह यांनी बंदुकीच्या 3 गोळ्या झाडून ठार केलं.
3) अजित पवार स्वकर्तृत्वावर एक ग्रामपंचायत सदस्यही जिंकवू शकत नाहीत - नीलेश राणे
अजित पवार स्वत:च्या कर्तृत्वावर एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाहीत, याची आम्हाला खात्री आहे, असं वक्त्व्य माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
दुसऱ्या पक्षात गेलेल्यांनी परत यावं महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊन त्यांना आपण निवडून आणू, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी टीका केली
"एका वर्षानंतर मागे जे काही झालं त्यावरून लोकं मागचं विसरली, असं अजित पवार यांना वाटत असावं. आज आमदारांना येण्यास जे ते सांगतायत त्यांना वर्षभरापूर्वी स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत," असं निलेश राणे म्हणाले.
अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात, अशी टीकाही राणेंनी केली.
4) मोदी-शहा एक दिवस हुकूमशहा बनतील - सुशीलकुमार शिंदे
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'हुकूमशहा'ची उपमा दिलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.
"पंचवीस दिवस झाले तरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे तर एकदिवस हुकूमशहाच बनतील," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
"देशातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे आता राष्ट्रपतींनी यामध्ये निर्णय घेण्याची गरज आहे," असं मतही शिंदेंनी व्यक्त केलं.
5) काँग्रेस पत्र पाठवणाऱ्या त्या 23 नेत्यांसोबत सोनिया गांधींची बैठक
पक्षाला कायमस्वरूपी नेतृत्त्व आणि संघटनात्मक बदल अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्र लिहिणाऱ्या 23 काँग्रेस नेत्यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी भेटणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
शनिवारी (19 डिसेंबर) सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत सोनिया गांधी या 23 नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या नेत्यांनी चार महिन्यांपूर्वी पत्र लिहिले होते आणि पक्षातील अंतर्गत बदलांची अपेक्षा केली होती.
या बैठकीसाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पी. चिदंबरम, राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधीही या बैठकीत हजर राहणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)