You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षणाविनाच होणार राज्यातली चालू वर्षातली शैक्षणिक प्रक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने तूर्तास राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाअंतर्गत होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.
9 सप्टेंबर 2020ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला 'तूर्तास स्थगिती' दिली.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेश रखडले होते.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत चार याचिका दाखल केल्या आहेत.
राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून स्थगित असल्याने अखेर सरकारला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
प्रवेश प्रक्रियेचे नियम
राज्य सरकारने आज (25 नोव्हेंबर) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार,
- 9 सप्टेंबर 2020 नंतरची सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गाकरीता मराठा आरक्षण न ठेवता पार पाडावी.
- 9 सप्टेंबर 2020 पूर्वी विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्यास आणि त्यांना प्रवेश दिले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश द्यावा.
- हे सर्व नियम राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांच्या आणि अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहतील.
- हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील.
- या निर्णयानुसार आता पुन्हा एकदा राज्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.
पोलीस भरती असो वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा, प्रत्येकवेळी मराठा आरक्षण स्थगितीचा मुद्दा समोर आला. आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील या निर्णायनंतरही पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)
.