You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: मुंबई इंडियन्स विजयी; दिल्लीवर 5 विकेट्सनी मात
कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल जेतेपदावर कब्जा केला.
मुंबईचे आयपीएल स्पर्धेचं पाचवं जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने याधी 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा जेतेपदांवर नाव कोरलं आहे.
गतविजेत्या मुंबईने दिल्लीला 156 रन्समध्ये रोखलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्माने ट्वेन्टी-20प्रकारात कशी बॅटिंग करावी याचा वस्तुपाठ सादर करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या अनुभवी जोडीने पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये दिल्लीच्या बॉलिंगवर वादळी आक्रमण केलं. रोहित-क्विंटनच्या या पवित्र्यामुळे दिल्लीला पहिल्या सहा ओव्हर्समध्ये पाच बॉलर्सचा उपयोग करावा लागला.
स्टॉइनसच्या बॉलिंगवर क्विंटन आऊट झाला. त्याने 12 बॉलमध्ये 20 रन्सची खेळी केली. रोहितने सूर्यकुमारच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 45 रन्सची भागीदारी केली. चोरटी रन घेण्याचा रोहितचा प्रयत्न होता. सूर्यकुमारने रोहितला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोहितसाठी सूर्यकुमारने क्रीझबाहेर निघत आपली विकेट समर्पित केली. सूर्यकुमारने 19 रन्स केल्या.
संपूर्णपणे फिट नसतानाही रोहितने चौकार-षटकार आणि एकेरी-दुहेरी यांची सुरेख सांगड घालत रन्स केल्या. सूर्यकुमार परतल्यानंतर इशानने रोहितला साथ दिली. इशानने नाबाद 33 रन्सची खेळी केली.
अँनर्रिक नॉर्कियाच्या बॉलिंगवर बदली खेळाडू ललित यादवने अफलातून कॅच घेत रोहितची खेळी संपुष्टात आणली. रोहितने 51 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4षटकारांसह 68 रन्सची खेळी साकारली.
दरम्यान त्याआधी, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या बळावर दिल्लीने आयपीएल फायनलमध्ये मुंबईसमोर 157 रन्सचं लक्ष्य ठेवलं.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्याच बॉलवर ट्रेंट बोल्टने धोकादायक मार्कस स्टॉइनसला आऊट केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये बोल्टने अनुभवी अजिंक्य रहाणेला आऊट केलं. पॉवरप्लेमध्ये बोल्ट सगळ्यात कुशल बॉलर मानला जातो.
राहुल चहरच्या जागी संघात संधी मिळालेल्या जयंत यादवने अनुभवी शिखर धवनला त्रिफळाचीत केलं. चौथ्या ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 22/3 अशी झाली.
मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत जोडीने एकेरी-दुहेरी रन्सचा रतीब घातला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनी चौकार-षटकार वसूल करायला सुरुवात केली.
फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत ऋषभने यंदाच्या हंगामातलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. पन्नाशी गाठल्यानंतर ऋषभ लगेचच आऊट झाला. त्याने 38 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारासह 56 धावांची खेळी केली.
ऋषभ आऊट झाल्यावर श्रेयसने धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. ट्रेंट बोल्टने दुसऱ्या स्पेलमध्ये शिमोरन हेटमायरला आऊट केलं. त्याला फक्त पाच रन्स करता आल्या. अक्षर पटेलने 9 रन्स केल्या.
श्रेयसने 50 बॉलमध्ये 65 रन्सची खेळी केली. श्रेयसने 6 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी सजवली. श्रेयसने या खेळीदरम्यान यंदाच्या हंगामात 500 रन्सचा टप्पा पूर्ण केला.
मुंबई इंडियन्सनतर्फे बोल्टने 3 तर नॅथन कोल्टिअर नीलने 2 विकेट्स घेतल्या. परपल कॅपच्या स्पर्धेत असलेल्या जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही.
दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा ओव्हर्समध्ये 41 रन्स केल्या. मधल्या म्हणजेच 7-15 ओव्हर्समध्ये 77 रन्स कुटल्या. मात्र शेवटच्या हाणीमारीच्या षटकात त्यांना 38 रन्स करता आल्या.
दुसरीकडे दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईचा संघ सहाव्यांदा अंतिम लढतीत खेळत आहे.
रोहित शर्माचा हा 200वा आयपीएल सामना आहे.
पुरस्कार
- मॅन ऑफ द मॅच- ट्रेंट बोल्ट
- इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर- देवदत्त पड्डीकल
- फेअरप्ले-मुंबई इंडियन्स
- मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर-जोफ्रा आर्चर
- परपल कॅप-कागिसो रबाडा
- ऑरेंज कॅप-के.एल. राहुल
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)