You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक : शेवटच्या टप्प्यातलं मतदान का ठरेल निर्णायक?
बिहारमध्ये 7 नोव्हेंबरपासून तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.
तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. यात मुख्यत्वे सीमांचल आणि मिथिलांचल प्रदेशातील भागांचा समावेश आहे.
बिहारमधील जवळपास निम्मे मुस्लीम लोक या क्षेत्रात राहतात.
पण, या टप्प्यातील मतदान यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथं अनेक जागांवर फक्त दोन नाही तर अधिकाधिक पक्षांचा सामना होणार आहे.
या टप्प्यात उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी, असदद्दुीन ओवैसी यांची एमआयएम, मायावती यांची बसपा आणि माजी खासदार पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी रिंगणात आहेत.
2015मध्ये 78 जागांपैकी 54 जागांवार जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. तर एनडीएमधील भाजप, एलजेपी, आरएलएसपी आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाला 24 जागांवर विजय मिळाला होता. पण, यात सगळ्यात जास्त 19 जागा भाजपला मिळाल्या होत्या.
यावेळेस महाआघाडीत जेडीयू नाहीये आणि एलजेपी एनडीओतून बाहेर पडली आहे..
तिसऱ्या टप्प्यासाठी भाजपनं 35, तर जेडीयूनं 37 उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. यासोबत मुकेश सहन यांच्या विकासशील इन्सान पार्टीचेही 5 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत.
राजदनं 46, तर काँग्रेसनं 25 जागांवर उमेदवार दिले आहेत.
नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्री तिसऱ्या टप्प्यातील मतदानात उमेदवार म्हणून आहेत.
तिसऱ्या टप्प्यासाठी सीमांचल भाग केंद्रस्थानी राहिल. इथं राजदचे पारंपरिक मतदार आहेत. यात यादव आणि मुस्लिमांचा समावेश होतो.
2010च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपनं 243 पैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. पण, सीमांचल आणि किशनगंज त्यांच्या हातातून निसटलं होतं. तेव्हा राजद आणि काँग्रेसला किशनगंजमधून 4 जागा मिळाल्या होत्या.
गेल्या वर्षी किशनगंजमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमनं बिहारमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला होता.
मिथिलांचलमधल्या दरभंगा, मधुबनी, समस्तीपुर, मधेपुरा, सहरसा, सुपौल आणि सीतामडी जिल्ह्यांतील 34 जागांवर मतदान होईल. गेल्या निवडणुकीत मिथिलांचलमधून भाजप फक्त 6 जागा जिंकलं होतं. त्यामुळे यावेळेस भाजपला इथं कडवं आव्हान आहे. यावेळी भाजपनं इथं राजनाथ सिंग, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ अशा स्टार प्रचारकांच्या सभा घडवून आणल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)