You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक: नितिश बिहारची सत्ता राखणार की तेजस्वी, चिरागकडून चितपट होणार?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
बिहार निवडणुकीमध्ये 71 जागांसाठी आज (28 ऑक्टोबर) मतदान होत आहे. 1000 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर ही देशातली पहिली विधानसभा निवडणूक होत आहे.
चिराग पासवान यांचा लोकजन शक्ती पक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय जनता पक्ष हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे.
आज नितीश कुमार यांच्या जनता दलाचे 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे 29 उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. जनता दल आणि भाजपची बिहारमध्ये युती आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे 42 उमेदवार उभे आहेत. त्यांचे काँग्रेस आणि माकपसोबत युती आहे. काँग्रेसने पहिल्या टप्प्यासाठी 20 उमेदवार उभे केले आहेत.
लोक जनशक्ती पार्टीचे 41 उमेदवार उभे आहेत. ज्या ठिकाणी भाजप नाही त्या ठिकाणीच लोक जनशक्ती पक्षाने आपले उमेदवार उभे केले म्हणून जनता दलाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नितीश कुमार यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी मैदानात उतरली आहे. शिवाय, काही नवीन आघाड्यासुद्धा यावेळी आपलं नशीब आजमावत आहेत.
एक नजर टाकूया बिहार निवडणुकीच्या काही गोष्टींवर ज्या जाणून घेणं आपल्यासाठी गरजेचे आहे.
बिहार विधानसभा निवडणूक कधी आहे?
- मतदान - 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर
- 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 जागांसाठी मतदान होईल
- 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्यात 17 जिल्ह्यांमध्ये 94 जागांसाठी मतदान होईल
- 7 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यांमध्ये 78 जागांसाठी मतदान होईल
- मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार असून एकूण 7 कोटी 30 लाख मतदार आहेत.
2015 बिहार विधानसभेचे चित्र
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर 122 आहे.
बिहारमध्ये जनता दल यूनायटेड आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. जदयूचे नेता नितीश कुमार राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर भाजपचे नेते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री आहेत.
2015 मध्ये खरं तर नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जदयूने लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलसोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी जदयू, राजद, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांसोबत महाआघाडी स्थापन करण्यात आली होती. त्यांची सत्ताही आली. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले तर लालू यादव यांचा पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले.
दरम्यान, 2017 मध्ये नितीश कुमार राजदसोबत फारकत घेऊन आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हा भाजपकडे 53 आमदारांचे संख्याबळ होते.
काँग्रेसने मागील निवडणूक राजद, जदयू आणि इतर पक्षांच्या महाआघाडीसोबत लढली होती. त्यांना 27 जागांवर जिंकता आल्या. भाजपचा मित्रपक्ष लोकजनशक्ती पार्टी केवळ 2 जागांवर विजयी झाली.
2020 मध्ये महाघाडीची परिस्थिती
यावेळच्या निवडणुकीत चार आघाड्या मैदानात आहेत. एनडीए आणि महाआघाडीव्यतिरिक्त बिहारमध्ये यावेळी ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट आणि प्रगतिशील लोकशाही आघाडी निवडणुकीच्या मौदानात आहे.
सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राजदने गेल्या निवडणुकीतच महाआघाडी बनवली होती. भाजप आणि जदयूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीने यावेळी डाव्या पक्षांनाही सोबत घेतले आहे. महाआघाडीमध्ये राजद 144 जागांवर, काँग्रेस 70 जागांवर आणि डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढणार आहेत.
भाजप, संयुक्त जनता दलासोबत व्हीआयपीचे अध्यक्ष मुकेश साहनी, हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी यांनीही युतीत प्रवेश केला आहे. लोजपा यावेळी युतीचा भाग नाही. या पक्षांमध्ये जागा विभागल्या गेल्या आहेत.
जदयू 122 आणि भाजप 121 जागांवर निवडणूक लढवत आहे. जदयूने आपल्या खात्यातील सात जागा जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीला दिल्या आहेत, तर भाजप मुकेश साहनी यांच्या व्हीआयपींना 11 जागा देत आहे.
महाआघाडी आणि एनडीएव्यतिरिक्त तिसरी युतीही आहे. रालोसपाचे उपेंद्र कुशवाहा, बहुजन समाज पक्षाच्या मायावती, आयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, पीपल्स पार्टी सोशालिस्टचे संजय चौहान आणि सोहेल देव यांच्या भारतीय समाज पक्षानेही युती केली आहे. याला ग्रँड डेमोक्रटिक सेक्युलर असे नाव दिले आहे.
पब्लिक राइट्स पार्टीचे (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात पीडीए स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या युतीमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पक्ष, एमके फैजी, एसडीपीआय आणि बीपीएल मातंग यांच्या बहुजन मुक्ती पक्षाचा समावेश आहे. इंडियन युनियन मुस्लीम लीग आता या युतीचा भाग राहिलेली नाही. बिहारमधील मुख्य स्पर्धा एनडीए आणि महाआघाडी यांच्यात आहे.
निवडणुकीच्या मैदानातले महत्त्वाचे चेहरे
महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा मोठा भाऊ तेजप्रताप यांनी आपला महुआ हा मतदारसंघ बदलून हसनपूरमधून मैदानात उतरले आहेत. या दोघांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
दुसरीकडे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचे एनडीएने स्पष्ट केले आहे. जेडीयूकडून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय.
चंद्रिका राय यापूर्वी राष्ट्रीय जनता दलात होते. ते राजदचे मंत्रीही होते. चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्याचा विवाह तेजप्रताप यांच्याशी झाला आहे. राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह यांच्या मुलालाही जदयूने मैदानात उतरवले आहे.
जदयूने मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मंजू वर्मा यांनाही उमेदवारी दिली आहे. बालिका गृह प्रकरणात मंजू वर्मा यांना मंत्रिपद गमवावे लागले. आता त्यांना चेरियाबरियापूरमधून पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे.
बिहारच्या पोलीस महासंचालकपदावरून निवृत्ती घेऊन जदयूपासून आपली राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी मिळाली नाही.
यावेळी बिहार निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी यांच्याही नावाची जोरदार चर्चा होत आहे. स्वत:ला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची उमेदवार असल्याचं सांगणारी पुष्पम प्रिया चौधरी पाटण्यातील बंकीपूर आणि मधुबनीतील बिसाफी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पुष्पम प्रिया ही जदयूचे आमदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे.
पुष्पम प्रिया यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दरभंगा येथे पार पडले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या परदेशी गेल्या. लंडनहून परतल्यानंतर त्या थेट बिहारच्या निवडणुकीत उतरल्या. या निवडणुकीत त्यांनी प्लूरल्स नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता श्रेयसीसिंह जमुई भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. श्रेयसी ही बिहारच्या राजकारणात दादा नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे.
यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्यं
रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांच्यावरही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. चिराग सध्या बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली लोकजनशक्ती पक्ष कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
निवडणुकीच्या वीस दिवस आधी लोजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. चिराग पासवान यांनी यावेळी एनडीएमध्ये प्रवेश न करण्याचा आणि स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिराग पासवान राजकीय वारसा पुढे कसा नेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
बिहारमध्ये पहिल्यांदाच लालू प्रसाद यादव निवणुकीपासून दूर आहेत. लालू यादव सध्या तुरुंगात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अतिशय सक्रिय होते आणि नितीश कुमार यांना महाआघाडीत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. बिहार निवडणुकीत प्रथमच गांधी मैदानात लाखो लोकांना संबोधित करणारी कोणतीही निवडणूक रॅली होणार नाही. डिजिटल रॅलींसह प्रचाराची पद्धत आता पूर्णपणे बदलली आहे.
या मुद्यांवर लढवली जात आहे निवडणूक
कोरोना काळात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे संसर्गाची भीती कायम असल्याने मतदार मतदान केंद्रावर किती प्रमाणात पोहोचतील हेही पाहावे लागेल. मतदारांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. जनता त्यांच्या कामावर किती समाधानी आहे हे निकालावरून स्पष्ट होईल.
नितीश सरकार 15 वर्षांपासून सत्तेत असल्याने त्यांना अँटी इन्कम्बन्सी लाटेचाही सामना करावा लागत आहे. राज्यातील शिक्षकांना 'समान काम समान वेतन' न दिल्याने नाराजी आहे. बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्यव्यतिरिक्त या निवडणुकांमध्ये स्थलांतरित कामगारांचा मुद्दाही जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
कोरोनामुळे लाखो स्थलांतरित कामगार राज्यात परतले आहेत. पण त्यांच्या हाताला काम नाही. या निवडणुकीत त्यांची मतंही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे भांडवल करण्याचाही प्रयत्न केला गेला.
या निवडणुकीचे राष्ट्रीय महत्त्व
देशाच्या राजकारणात बिहारचे महत्त्व कोणापासूनही लपून राहिलेली नाही. केंद्रातील काँग्रेसची मुळं हादरवणारे जेपी आंदोलन इथूनच सुरू झाले होते. इथे राज्य आणि राष्ट्रीय निवडणुकांच्या मतदान पद्धतीत मोठे अंतर दिसून येते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 40 पैकी 39 जागा जिंकल्या. या निवडणुकीत एनडीए आघाडी अशीच कामगिरी करू शकेल का? याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.
जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची ही दुसरी विधानसभा निवडणूक आहे. यापूर्वी दिल्लीत निवडणुका झाल्या होत्या, ज्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत त्यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे.
सीएए-एनआरसीला विरोध, 370 हटवणे, नव्या कृषी विधेयकाला विरोध - एनडीएच्या दुस-या कार्यकाळात केंद्र सरकारने घेतलेल्या या सर्व वादग्रस्त निर्णयांकडे जनता कशी पाहते? हे सुद्धा या निवडणुकीच्या निकालातून समोर येईल.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना आरोग्य संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कामावर जनता समाधानी आहे का हेही या निकालातून स्पष्ट होईल.
कोरोनासंदर्भातील नियोजन
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडणूक आयोगाने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होईल.. ही मार्गदर्शक तत्त्वे सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आली आहेत.
- उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासह फक्त दोनच व्यक्ती उपस्थित राहतील. उमेदवार आपले उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरू शकतात आणि ऑनलाईन निवडणूक लढवण्यासाठी हमीची रक्कमही जमा करू शकतात.
- रोडशोदरम्यान कोणताही उमेदवार पाच वाहनंच वापरू शकेल.
- मतदानाच्या दिवशी मतदाराला कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्यास त्यांना एक टोकन दिले जाईल आणि त्या टोकनच्या माध्यमातून ते मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान करू शकतील.
- ईव्हीएममध्ये मतदान करण्यापूर्वी मतदारांना हँडग्लोव्ह्ज दिले जातील.
- एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदार मतदान करू शकतील.
- सर्व मतदारांना मास्क घालणे बंधनकारक असेल. पण ओळख पटण्यासाठी काही वेळ मास्क काढावे लागेल.
- कोरोना रूग्ण आणि क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. संसर्ग टाळण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील.
- साथीच्या रोगामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. आता सर्वात संवेदनशील भाग वगळता बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.
दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये व्हर्च्युअल रॅली आणि डिजिटल मोहिमांबद्दल फार काही बोलले जात नाहीय. राज्यातील नऊ विरोधी पक्षांनी जुलै महिन्यात भाजपच्या डिजिटल अभियानासंदर्भात प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)