मुकेश खन्ना : #SorryShaktiman पण कोणत्याही महिलेला पुरुषासारखं व्हायचं नसतं

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शक्तिमान हे पात्र साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांच्या महिलांसंदर्भातील वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.

आता तर मला असं वाटायला लागलंय की हा वाद कालातीत आहे. बिग बँगच्या आधीपासून हा अस्तित्वात होता आणि सूर्याने आपल्या पृथ्वीला गिळून टाकलं तरी असेलच. इनफॅक्ट, बिग बँगमधल्या पहिला पार्टीकलचा स्फोट झाल्यानंतर युनिव्हर्स जेव्हा पसरायला लागलं तेव्हाही दुसरा पार्टिकल (याला आपण पुरुष पार्टिकल म्हणू, तसं पार्टिकल्सला लिंगभेद नसतात म्हणून ते त्यांचं काम शांततेत करू शकतात आणि विश्व साकारू शकतात) पहिल्या पार्टिकलला (हा अर्थातच स्त्री पार्टीकल असावा) म्हणाला असेल, तू बाहेर मर्यादेच्या पडलीस म्हणून असं झालं.

हं, आता ती बाहेर पडली म्हणून विश्व घडलं. तुम्ही, मी, मी लिहितेय तो लॅपटॉप आणि तुम्ही वाचताय तो स्मार्टफोन आला हा भाग अलहिदा. मुद्दा काय... तू बाहेर पडलीस.

तर अशी ही बाईच्या घराबाहेर पडण्याची कथा आणि त्याला पुरुषांचा 'काळजीपोटी' असणारा विरोध.

या कथेचं पुन्हा पारायण करायचं आठवलं कारण दोन दिवसांपूर्वी भारतातले टीव्हीवर अवतरलेले पहिले सुपरहिरो शक्तीमान उर्फ मुकेश खन्ना यांचं विधान... "महिलांचं काम असतं घर सांभाळणं. ही MeToo ची गोष्ट तेव्हापासून सुरू झाली जेव्हा पासून महिलांनी (घराबाहेर पडून) काम करायला सुरूवात केली."

म्हणजे काय तर बायांनो तुमचं लैंगिक शोषण करणाऱ्या पुरुषांची काही चूक नाहीये, तुम्ही घराबाहेर पडता ही तुमची चूक आहे. म्हणजे हे गृहितच धरलंय की पुरुष लैंगिक शोषण करणारच.

तुम्हाला त्यापासून वाचायचं असेल तर पुरुषांनीच घातलेली बंधन मान्य करायला हवीत. अत्याचार करणारेही तेच आणि बंधन घालून संरक्षण करणारेही तेच. मजाच आहे सगळी.

पुढे जाऊन मुकेश खन्नांनी असंही म्हटलंय की, "आजकालच्या बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं म्हणतात, प्रत्येक गोष्टीत पुरुषांसारखं व्हायचं म्हणतात. नाही, पुरुष पुरुष असतात आणि बायका बायका."

तात्पर्य त्यात बरोबरी नाही, आणि त्याची अपेक्षाही करू नका. हाही आरोप तसा जुनाच की बायकांना पुरुष व्हायचं असतं. त्या पुरुषांसारखं वागण्याच्या नादात स्वतःचं बाईपण हरवून बसतात. आणि दुसरीकडे या पुरुषांना आपल्या पुरुष असल्याचा कळत-नकळत अभिमानही असतो बरका. म्हणजे पुरुष असणं श्रेष्ठ हे वादातीत आहे असं त्यांना खात्रीलायक वाटत असतं.

काही वर्षांपूर्वी दिल्लीत पहिल्यांदा आल्यानंतर (दिल्लीची त्यावेळीची इमेज पाहता) काय वाटलं या विषयावर एका जवळच्या मित्राशी गप्पा चालू होत्या आणि बोलता बोलता त्याने अचानक विचारलं, यासगळ्यांत कधी वाटलं का की आपण पुरुष असतो तर बरं झालं असतं? मला हसावं का रडावं ते कळेना. त्याला हा प्रश्न विचारावासा वाटला यातच सगळं आलं. कोणती बाई विचारते काहो कोणा पुरुषाला, की तुला बाई असतो तर बरं झालं असतं असं वाटतं का?

त्यावेळस तर उडवून लावला तो विषय, पण आज बसलोच आहोत (चर्चेला) तर याचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू. कोणत्याही पुरुषाला कधी स्वप्नातही वाटत नाही की आपण बाई असतो तर किती छान झालं असतं, तसं कोणत्याही बाईला कधीही वाटत नाही की आपण पुरुष असतो तर 'कित्ती बाई (सॉरी बाबा) मज्जा आली असती!'

मुळात हे जे लोक म्हणतात ना की आजकालच्या बायका पुरुष व्हायला निघाल्या आहेत, तर सद्गृहस्थहो, बायकांना आपल्या शरीरात बदल व्हावा, किंवा मानसिकतेत बदल व्हावा अशी इच्छा नसते. पण पुरुषांना जे जगण्याचे मुलभूत अधिकार निर्विवाद मिळालेत ते आपल्यालाही मिळावे अशी अपेक्षा असते.

म्हणजे काय तर स्वतःच्या मर्जीने वागण्याचा अधिकार, आपलं मत मांडण्याचा अधिकार, पैसे कमवून स्वयंपूर्ण होण्याचा अधिकार, आपल्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार, आपला जोडीदार स्वतः निवडण्याचा अधिकार (तो आपल्या देशात अजून पुरुषांनाही नाही त्यामुळे हा डाव भूताला सोडू), रस्त्याने चालताना आता कोणी हल्ला करेल की नंतर करेल अशा भीतीखाली न राहाता मोकळेपणाने चालण्याचा अधिकार, जे पटलं नाही त्याला नाही म्हणण्याचा अधिकार, आपल्याबाबत भेदभाव न होण्याचा अधिकार... ही यादी वाढतंच जाईल पण तात्पर्य एवढंच की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार.

पण मज्जा किनई अशी आहे की, आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेला मान्य नाही की बाई माणूस आहे. दुसरी गोष्ट त्यांना पटत नाही की पुरुष आणि या व्यवस्थेने पुरुषांना बहाल केलेले हे वरचे अधिकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

मग मुकेश खन्नासारखा जेष्ठ लोकांचा किती गोंधळ होतो. त्यांना वाटतं हे अधिकार मागणाऱ्या बायका पुरुष व्हायला निघाल्या आहेत. स्वातंत्र्य पुरुषालाच, बाईला कसलं आलंय डोंबल्याचं स्वातंत्र्य... त्यामुळे जी बाई स्वातंत्र्य मागतेय ती पुरुष व्हायला पाहातेय असं काहीसं समीकरण असतं त्याचं.

त्यामुळे एकट्या मुकेश खन्नांना कशासाठी दोष द्यायचा? मान्य आहे की त्यांचं शक्तिमान पाहून एक पिढी मोठी झाली, त्यांनी पहिला सुपरहिरो भारतीय पडद्यावर आणला. शक्तीमानची इतकी क्रेझ होती की मुलं तशी उडी मारायला जायचे.

मुलं जखमी व्हायला लागले तसा शक्तीमान पडद्यावर येऊन सांगायला लागला की असं करू नका. मग काही दिवसांनी मुलांमध्ये चांगली मूल्य रूजावीत म्हणून एपिसोडच्या शेवटी 'गोष्टी सांगेन चार युक्तीच्या' असं करायचा. या गोष्टींमध्ये बहुधा स्त्री-पुरुष समानतेची गोष्ट राहून गेली असेल.

आता यावरून अनेकांनी सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्यावर टीका केलीये. यात सोना महापात्रा, चिन्मयी श्रीपादा आणि दिव्यंका त्रिपाठीसारख्या सेलिब्रिटीही आहेत.

काही लोकांनी म्हटलं की 'शक्तिमानही किल्विश है.' पण हे लोक एक विसरले, सत्ता, धन, जमीन आणि वर्चस्वासाठी 'पुरुषांनी, पुरुषांसाठी केलेल्या लढाईला' आपण 'बाईवरून झालेलं झालेलं महाभारत' म्हणतो, त्याच महाभारताच्या टीव्ही अवतारात त्यांनी 'भीष्म पितामहांची' भूमिका केली आहे. म्हणजे ते अगदीच आऊट ऑफ कॅरेक्टर गेले असं म्हणता येणार नाहीच ना.

या सगळ्या प्रकरणावर मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणालेत की, "मी महिलांनी नोकरी करण्याच्या विरोधात नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. महिलांचा आदर माझ्यापेक्षा जास्त कोणीच करत नाही."

चलो ये भी ठीक है. मुद्दा जसा ट्रेडिंग झाला होता तसा विरूनही जाईल. पण याही पलीकडे 'बायका बाहेर पडतात म्हणून...'या वाक्याचा प्रतिध्वनी कानावर पडत राहील. मोठ्या शहरांमध्ये नाही कदाचित पण लहान गावांमध्ये. परवाच बीबीसीने बदायूंच्या बहिणींच्या 2014 साली झालेल्या हत्येवर आणि त्यानंतरच्या न्यायप्रक्रियेवर एक बातमी केली.

या बहिणींची हत्या, आधी लावलेली आणि नंतर हटवलेली बलात्काराची कलमं आणि सहा वर्षं चाललेली न्यायप्रक्रिया या सगळ्यांत बदायूंमध्ये काय बदललं माहितेय? तिथे नवा नियम लागू झाला, 'मुलगी एकटी घराबाहेर पडणार नाही.' म्हणजे शिक्षणात अडथळा, नोकरी तर लांबचा विषय... आणि घरात किती दिवस मुलगी बसवून ठेवायची, मग टाका उजवून असं म्हणत बालविवाह, वयाआधी बाळंतपण वगैरे वगैरे विषय आहेत.

मुद्दा ट्विटरवर गाजला आणि संपला तरी यांचं आयुष्य बदलत नाही. पण तरीही परिस्थितीशी लढणाऱ्या जिंकणाऱ्या पोरी गावखेड्यात अधूनमधून कोणालाही हार न जाणाऱ्या बाभळीसारख्या उगवून येतात याचं काय ते किंचित समाधान. याच आहेत 'अद्‌भूत, अदम्य साहस की परिभाषा'. त्यामुळे आपण '#SorryShaktiman आम्ही तर बाहेर पडणार' असं म्हणायचं आणि कामाला लागायचं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)