You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटातील गॅस सोडताना दुर्गंधी का येते? जाणून घ्या कारणं आणि उपाय
- Author, के. शुभगणम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
पोटातील गॅस (वायू) सोडणं ही शरीराची सर्वात सामान्य प्रक्रिया आहे, पण तरीही याबद्दल फार कमी बोललं जातं.
प्रत्येकजण पोटातील गॅस शरीराबाहेर सोडत असतो. अनेक लोक दिवसातून अनेक वेळा हा गॅस सोडतात. काही संशोधनानुसार, हे प्रमाण दिवसाला 8 ते 25 वेळांपर्यंतही असू शकतं.
बहुतांश वेळा गॅस सोडल्याचं इतरांच्या लक्षातही येत नाही. परंतु, काहीवेळा तो मोठ्या आवाजात किंवा दुर्गंधीसह बाहेर पडतो आणि आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो.
कधी कधी शरीरातून गॅस बाहेर पडल्यानंतर तीव्र दुर्गंधी का येतो? दुर्गंधीयुक्त गॅस आपल्या आरोग्याबद्दल काय सांगतो? आणि ही समस्या कमी करता येऊ शकते का? किंवा यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते का? जाणून घ्या
गॅस सोडणे म्हणजे नेमकं काय?
वैद्यकीय भाषेत याला फ्लॅट्युलन्स किंवा फ्लॅटस असं म्हटलं जातं. यात पचनसंस्थेमध्ये तयार झालेला गॅस गुदद्वारातून बाहेर पडतो.
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मेडलाइनप्लस आणि जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार, पचनसंस्थेमध्ये प्रामुख्याने 2 कारणांनी गॅस तयार होतो. 1. खाताना किंवा पिताना हवा पोटात गेल्याने आणि 2. मोठ्या आतड्यात (कोलन) अन्नावर बॅक्टेरियाची (जीवाणू) प्रक्रिया झाल्याने.
बहुतेक वेळा पोटातील गॅसला कोणताही वास नसतो म्हणजेच ते गंधहीन असतात. त्यात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि कधीकधी मिथेनसारखे वायू असतात.
परंतु, आतड्यांतील बॅक्टेरियांमुळे तयार होणाऱ्या थोड्या प्रमाणातील सल्फरयुक्त (गंधक) वायूमुळे दुर्गंधी येते.
या सल्फरयुक्त वायूंमध्ये हायड्रोजन सल्फाइड हा वायू त्याच्या दुर्गंधीसाठी ओळखला जातो. कुजलेल्या अंड्यासारखा वास यामुळेच येतो.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या (पचनसंस्था) संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, गॅसमधील फारच कमी प्रमाणातील सल्फरयुक्त घटकच जास्त दुर्गंधीसाठी कारणीभूत असतात. विशेषतः हायड्रोजन सल्फाइडमुळेच वास अधिक येतो.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोट आणि आतड्यांवरील संशोधन करणारे तज्ज्ञ) डॉ. मायकेल लेविट यांच्या नेतृत्वाखालील टीमने 'द जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन'मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये देखील हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी आतड्यांतील गॅसवर पहिला मोठा अभ्यास केला आहे.
आतड्यांतील गॅस निर्मितीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, गॅसमध्ये दुर्गंधी निर्माण करणारे घटक 1 टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात असतात. पण तरीही अगदी कमी प्रमाणात असतानाही ते तीव्र दुर्गंधी निर्माण करू शकतात.
गॅसला तीव्र दुर्गंधी का येते?
तज्ज्ञांच्या मते, याचं मुख्य कारण म्हणजे आपण काय खातो आणि आपल्या आतड्यातील सूक्ष्म जिवाणू त्या अन्नावर कशी प्रक्रिया करतात यावर अवलंबून असते.
काही अन्नपदार्थांमध्ये सल्फरयुक्त घटक किंवा कार्बोहायड्रेट्स (कर्बोदके) जास्त असतात. हे पचवणं लहान आतड्यांसाठी कठीण काम असू शकतं. त्यामुळे न पचलेलं अन्न मोठ्या आतड्यात गेल्यावर तिथले बॅक्टेरिया त्यावर प्रक्रिया करतात आणि गॅस तयार होतो.
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसने त्यांच्या वेबसाइटवर स्पष्ट केलं, "काही पिष्टमय पदार्थ (कर्बोदके) लहान आतड्यात पूर्णपणे पचत नाहीत. ते पुढे मोठ्या आतड्यांमध्ये जातात. तिथे बॅक्टेरिया त्यांचे विघटन करतात आणि त्यामुळे गॅस तयार होतो. बीन्स, काही भाज्या आणि कडधान्ये ही गॅस वाढण्याची सामान्य कारणं मानली जातात."
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, अंडी, मांस, ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवरसारखे सल्फरयुक्त पदार्थ पचताना दुर्गंधीयुक्त गॅस तयार होऊ शकतो.
त्याचबरोबर, "ज्यांना दूधातील लॅक्टोज पचत नाही, त्यांना दुग्धजन्य पदार्थांमुळेही दुर्गंधीसह गॅस होऊ शकतो."
पोटातील गॅसवर संशोधन करणारे डॉ. मायकेल लेविट जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये स्पष्ट करतात की, सल्फरयुक्त अन्नामुळे आतड्यातील बॅक्टेरियांना हायड्रोजन सल्फाइडसारखे गॅस तयार करण्यास मदत होते. गॅस किती आहे यापेक्षा त्यातील हे गॅस दुर्गंधीचे मुख्य कारण ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती खूप गॅस सोडू शकते पण त्याला दुर्गंधी किंवा वास नसेल. दुसरीकडे कमी गॅसलाही तीव्र दुर्गंधी येऊ शकते. हे सर्व आतड्यात असलेल्या लाखो-कोटी सूक्ष्म जिवाणूंच्या प्रकारांवर अवलंबून असतं.
जानेवारी 2023 मध्ये जर्नल ऑफ फंक्शनल फूड्समध्ये प्रकाशित झालेल्या 'इंटेस्टाइनल गॅस प्रॉडक्शन बाय इनटेस्टिनल मायक्रोब्स - ए रिव्ह्यू' या शोधनिबंधात म्हटलं आहे की, आतड्यातील काही विशिष्ट बॅक्टेरिया गॅस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
यात बॅक्टेरॉइड्स, क्लॉस्ट्रिडियम, डेसल्फोविब्रिओ, मेथेनोप्रेव्हिबॅक्टर यांसारख्या सूक्ष्म जिवाणूंचा समावेश होतो.
आतड्यातील सूक्ष्म जिवाणूंची महत्त्वाची भूमिका
गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांना लक्षात आलं आहे की, गॅसची समस्या केवळ खाण्यापिण्याशी संबंधित नसून आतड्यामधील बॅक्टेरियांच्या संतुलनाशीही जोडलेली आहे.
मोठ्या आतड्यांमध्ये अनेक सूक्ष्म जिवाणू असतात. शरीराला न पचणारे कार्बोहायड्रेट्स हे जिवाणू विघटित करतात. या प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरित्या गॅस तयार होतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या माहितीनुसार, साखर, स्टार्च आणि फायबर्ससारखे (तंतुमय पदार्थ) काही कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे पचत नाहीत आणि मोठ्या आतड्यात जातात. "तिथे बॅक्टेरिया त्यांच्यावर प्रक्रिया करून गॅस तयार करतात."
काही लोकांच्या आतड्यातील बॅक्टेरिया जास्त मिथेन वायू तयार करतात, तर काहींमध्ये सल्फरयुक्त वायू जास्त तयार होतात.
काही जिवाणू हायड्रोजनसारखे वायू तयार करतात, तर इतर जिवाणू त्याचा वापर करतात. या जिवाणूंमधील संतुलनामुळे गॅसची दुर्गंधी किती तीव्र असेल हे ठरतं.
नेचर रिव्ह्यूज गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, हायड्रोजन तयार करणारे बॅक्टेरिया आणि मिथेन तसेच सल्फेट कमी करणारे सूक्ष्म जिवाणू यांच्यातील प्रक्रियेमुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आतड्यातील सूक्ष्म जिवाणू (मायक्रोबायोम रचना) वेगवेगळे का असतात, याचा शास्त्रज्ञ अजूनही अभ्यास करत आहेत.
आनुवंशिकता, आहार, जंतुसंसर्ग आणि दीर्घकालीन खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे हे जिवाणू बदलू शकतात, असं संशोधक मानतात.
हवा गिळल्याने गॅस होतो का?
पोटातील गॅस होण्यामागे फक्त बॅक्टेरियांची प्रक्रिया कारणीभूत नसते. काहीवेळा खाताना किंवा पाणी-पेय पिताना लोक थोडी हवा देखील गिळत असतात.
खूप वेगाने खाणं, च्युइंग गम चघळणं, धूम्रपान करणं किंवा शीतपेये पिणं यामुळेही पोटात जाणाऱ्या हवेचं प्रमाण वाढू शकतं.
जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते, ही जास्तीची हवा पचनसंस्थेतून पुढे जाते आणि शेवटी गॅसच्या रूपात बाहेर टाकली जाऊ शकते.
ताणतणाव आणि चिंता यामुळेही गॅसची समस्या वाढू शकते. क्लीव्हलँड क्लिनिक डेटानुसार, तणावात असलेले लोक नकळत जास्त हवा गिळतात, त्यामुळे पोट फुगणे आणि गॅसचा त्रास वाढू शकतो.
दुर्गंधीयुक्त गॅस आरोग्याबद्दल काय सांगतो?
तज्ज्ञांच्या मते, गॅस सोडणे ही शरीराची पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. अधूनमधून दुर्गंधीयुक्त गॅस होणे हे बहुतेक वेळा आजारामुळे नाही, तर खाण्यापिण्याच्या सवयी किंवा आहारामुळे होतं.
पण जर गॅसच्या समस्येत सतत बदल दिसत असतील आणि त्यासोबत पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता, वजन कमी होणे किंवा पोट फुगणे अशी लक्षणेही असतील, तर ते पचनसंस्थेतील एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात, असा सल्ला ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्व्हिस देते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस, डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (आयबीएस), लॅक्टोज न पचणे, सेलियाक रोग किंवा काही पोटाच्या संसर्गांमुळे गॅस जास्त तयार होऊ शकतो किंवा गॅसचा त्रास अधिक जाणवू शकतो.
लॅक्टोज न पचण्याची समस्या अनेकांना असते म्हणजे ती एक सामान्य समस्या आहे. दुधातील लॅक्टोज ही साखर नीट पचली नाही तर मोठ्या आतड्यातील बॅक्टेरिया त्यावर प्रक्रिया करतात. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि जुलाब होऊ शकतात.
याशिवाय, गॅससोबत शौचातून रक्त येणे, सतत पोटदुखी, अचानक वजन कमी होणे, दीर्घकाळ जुलाब, उलट्या किंवा खूप पोट फुगणे अशी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी शिफारस राष्ट्रीय आरोग्य सेवा करते.
आहारात बदल केल्याने फायदा होऊ शकतो का?
जास्त गॅस किंवा दुर्गंधीयुक्त गॅसची समस्या कमी करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ काही सोपे आणि व्यावहारिक उपाय सुचवतात.
यात "थोड्या प्रमाणात अन्न खाणं, अन्न हळूहळू चावून खाणं, नियमित व्यायाम करणं आणि वारंवार गॅस वाढवणारे पदार्थ टाळणं" यामुळे फायदा होऊ शकतो.
त्याचबरोबर, शरीरात पुरेसं पाणी असणं देखील महत्त्वाचं आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शौचाची प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
संशोधनानुसार, काही लोकांना कार्बोनेटेड शीतपेये, कृत्रिम गोड पदार्थ आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न कमी खाल्ल्यास गॅसच्या त्रासातून आराम मिळू शकतो.
परंतु, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून आहारात मोठे बदल करू नयेत, असा इशारा डॉक्टर देतात. कारण अनेक पदार्थ टाळल्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य आहारासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच अधिक योग्य ठरते.
तज्ज्ञांच्या मते, गॅस सोडणे हे पचनक्रिया व्यवस्थित सुरू असल्याचं एक सामान्य लक्षण आहे.
विशेषतः सामाजिक परिस्थितींमध्ये लोकांना गॅस थांबवून ठेवण्याची सवय लागते. पण गॅस अडवून ठेवला तर पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते, असा इशारा तज्ज्ञ देतात.
आतड्यांमध्ये अडकलेल्या गॅसमुळे पोट फुगणे, पोटात मुरड येणे (पेटके येणे) आणि पोटावर (ओटीपोटात) दाब जाणवणे यासारखे त्रास होऊ शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)