You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुढच्या दोन तीन दिवसांत हवामान कसं असेल? कुठल्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे?
मान्सूननं आज पुढे वाटचाल केलेली नाही, मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसानं तसंच मान्सून पूर्व सरींनी हजेरी लावली आहे. पुढच्या दोन तीन दिवसांत हवामान कसं असेल आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये उद्या यलो अलर्ट आहे, जाणून घेऊया.
मान्सूनच्या उत्तरी सीमेत आज दहा जून रोजी कुठलाही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात हर्णे आणि सोलापूरमध्ये मान्सूनची सीमा जाते आहे.
पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी आगेकूच करू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी दहा जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होतो, पण यावेळेस त्याला पुढे सरकायला थोडा वेळ लागतो आहे.
10 जून रोजी दुपारी भारताच्या इन्स्टॅट सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये महाराष्ट्रावर ठिकठिकाणी ढगांचं विरळ आवरण दिसतंय. आज सकाळच्या नोंदींनुसार दक्षिण कोकणात गुहागरमध्ये 79 तर संगमेश्वरमध्ये 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगरला राहुरीमध्ये 42 मिलीमीटर पाऊस पडलाय.
हवामान विभागाच्या भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसारही सध्या या परिसरात पावसाची शक्यता आहे. इथे तुरळक ठिकाणी वीजा आणि गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडू शकतो. तर मुंबई आणि राज्यातील इतर भागांत 13-14 जूनच्या आसपास चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या चोवीस तासांत इथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आता कमाल तापमानाची घट झाली आहे, पण उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान जाणवतंय. तर विदर्भात तापमान 40 ते 42 अंशांच्या आसपास राहील.
रात्रीच्या किमान तापमानात मात्र अजून घट होत नाहीये, आणि ही चिंतेची बाब आहे. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान 32 अंशा सेल्सियसवर राहतंय तर मुंबईसह किनारी भागांतही 28 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच 10 आणि 11 जून रोजी पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट आहे. 10 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत थंडरस्टॉर्म म्हणजे सोसाट्याचा वारा, विजा आणि हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.
11 जून रोजी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, धाराशीव, बीड, या जिल्ह्यांत तसंच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वीजा आणि गडगडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट आहे.
12 आणि 13 जूनला विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी थंडरस्टॉर्म आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)