You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : जिवलग मित्राला गमावल्यानंतर त्यांनी चाचणीसाठी घेतला पुढाकार
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सप्टेंबर महिन्यात मुंबईत राहणारे अनिल हेब्बर यांच्या जिवलग मित्राचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला. पाच दिवस तीन हॉस्पिटलमध्ये फिरूनही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
अनिल हेब्बर यांची वैद्यकीय उपकरणं बनवण्याची कंपनी आहे. अनिल हेब्बर यांचे मित्र 62 वर्षांचे होते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वीच अनिल यांनी अतिदक्षता विभागात जाऊन त्यांची भेट घेतली होती.
मात्र, अनिल हेब्बर यांनी कोव्हिड-19 मुळे गमावलेले हे एकमेव मित्र नव्हते. मार्च महिन्यापासूनच अनिल यांच्या जवळच्या ओळखीतल्या 10 जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
"त्यांच्या मृत्यूने मी पुरता हादरलो. मला वाटलं हे सगळं थांबलं पाहिजे आणि म्हणूनच मी कोव्हिड-19 लशीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली." 56 वर्षांचे अनिल हेब्बर सांगत होते.
अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ मिळून जी लस विकसित करत आहेत त्याच्या भारतातल्या चाचणीसाठी अनिल हेब्बर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला स्वतःची नोंदणी केली आहे.
चिम्पांझीला संक्रमित करणाऱ्या साध्या सर्दीच्या विषाणूपासून ही लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विषाणूमध्ये जनुकीय बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे मानवी शरीरात गेल्यानंतर त्यांची वाढ होत नाही. ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या डॉ. तानिया थॉमस यांनी ही माहिती दिली आहे.
आजच्या घडीला जगभरात जवळपास 180 कोव्हिड-19 लसींवर संशोधन सुरू आहे. त्यापैकी ऑक्सफर्ड तयार करत असलेल्या लशीकडून बऱ्याच आशा आहेत. मात्र, या 180 पैकी एकाही लशीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेली नाही.
ऑक्सफर्ड लशीच्या यूके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि भारतात होणाऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 20 हजारांहून जास्त स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये अनिल हेब्बर हेदेखील आहेत. भारतात जवळपास 1600 जणांवर या लशीची चाचणी होणार आहे.
भारतातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 70 लाखांच्या वर आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत जगात अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
या लसीमुळे शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा विषाणूविरोधात सक्रीय होते का आणि या लशीचे शरीरावर काही दुष्परिणाम होतात का, हे या चाचण्यांमधून तपासून बघण्यात येईल.
मात्र, चाचणीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेणं अनिल हेब्बर यांच्यासाठी सोपं नव्हतं. अशा चाचण्यांमध्ये बरीच जोखीम असते. त्यामुळे कुटुंबीयांकडून परवानगी मिळवण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला.
सामाजिक विज्ञान महाविद्यालयात डेव्हलपमेंटल स्टडीज विषयाच्या प्राध्यापिका असणाऱ्या त्यांच्या पत्नीला त्यांचा हा निर्णय आजिबात आवडला नव्हता. आपल्या 11 वर्षांच्या मुलीने चाचणीचे अनेक बारकावे आपल्याला विचारल्याचं ते सांगतात.
इतकंच नाही तर यूकेमध्ये दोन स्वयंसेवकांची प्रकृती बिघडल्याने जगभरातल्या चाचण्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळेही कुटुंबीयांची काळजी अधिकच वाढली होती.
मात्र, अनिल हेब्बर आपल्या निर्णयावर ठाम होते. ते म्हणतात, "मला अजिबात भीती वाटली नाही. माझा विज्ञानावर पूर्ण विश्वास आहे."
ऑक्टोबर महिन्याच्या अगदी सुरुवातीला त्यांनी मुंबईतल्या ज्या हॉस्पिटलमध्ये या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू होत्या, तिथे फोन करून विचारपूस केली. तोवर 55 जणांना सहाव्या महिन्यातल्या चाचणीसाठी नोंदणी केल्याचं त्यांना कळलं. मात्र, हॉस्पिटलला 100 स्वयंसेवकांवर चाचण्या करायच्या होत्या. त्यांच्याकडे फक्त 55 जणांनी नाव नोंदवलं होतं. उरलेले 45 स्वयंसेवक मिळवण्यासाठी हॉस्पिटलला बरेच कष्ट पडत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ते हॉस्पिटलला गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आणि कोव्हिड-19 चाचणीसाठी लाळेचे नमुनेही घेतले. क्लिनिकल ट्रायलसाठी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झालेली नसावी, त्याची प्रकृती उत्तम असावी आणि या चाचणीमध्ये एखाद्या महिलेला सहभागी व्हायचं असेल तर ती गर्भवती नसावी, असे काही नियम आहेत.
त्याच रात्री त्यांना हॉस्पिटलकडून फोन आला आणि तुम्ही चाचणीत सहभागी होऊ शकता, असं कळवण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना चाचणी कशी पार पडणार आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून एक संमतीपत्र घेतलं आणि त्यांना लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर पुढे अर्धा तास त्यांना हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगण्यात आलं. तापेचं औषध दिलं आणि चाचणीत सहभागी झाल्याबद्दल 500 रुपयांचं मानधनही दिलं.
लसीचा डोस दिलेल्या 55 पैकी तिघांना हलका ताप आल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. शिवाय इथून पुढे 6 महिने त्यांना दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करावी लागणार आहे. तसंच प्रकृतीविषयी काहीही तक्रार असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे.
हेब्बर सांगतात, "ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सहज आणि वेदनारहित होती. मला फक्त थोडा थकवा आला होता. कदाचित मी खूप जास्तवेळ गाडी चालवल्यामुळे असेल."
लस चाचणीसाठी पुढाकार घेणारे अनिल हेब्बर यांनी संपूर्ण लॉकडाऊनमध्येही कोरोनाग्रस्तांसाठी बरंच काम केलं आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे अनिल हेब्बर यांचीही कंपनी बंद झाली. कंपनीत काम करणाऱ्या 45 जणांना त्यांनी गावी पाठवण्याची व्यवस्था केली आणि नंतर ते स्वतः कोरोनाग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले.
ते म्हणतात, "ती अत्यंत भयावह परिस्थिती होती आणि तेवढ्याच चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती."
अनिल हेब्बर सांगतात, "या संपूर्ण काळात मी मुंबई आणि आसपास जवळपास 28 हजार किमी गाडी चालवली असेल. बेघर आणि नोकरी गेल्यानंतर मुंबईतच अडकून पडलेल्या हजारो लोकांना जेवण, जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली."
"या काळात मी झोपडपट्ट्यांमध्ये फिरलो. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागांना भेटी दिल्या. हजारो लोकांना भेटलो आणि गरजूंना अन्न आणि आवश्यक वस्तू पोहोचवल्या. मी सतत मास्क वापरायचो. पण मला विषाणूची अनावश्यक भीती कधीच वाटली नाही."
अनिल हेब्बर यांनी चाचणीसाठी स्वतःचं नाव तर नोंदवलं आहेच. शिवाय, आपल्या मित्रांनाही नाव नोंदवण्यासाठी तयार केलं.
याविषयी सांगताना ते म्हणतात, "हे जागतिक आरोग्य संकट माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव होता. ही लस यशस्वी होईल, अशी माझी खात्री आहे. आपण सगळे मिळून या विषाणूला नक्की हरवू."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)