You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी: आमचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झाले्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. आमचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं- राहुल गांधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं," असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
हरियाणामधल्या सभेत ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन चीननं हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, असं राहुल यांनी म्हटलं.
चीननं भारताचा भूभाग बळकावल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी म्हटलं, "पंतप्रधानीच चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. 1 हजार 200 चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली आणि मोदी स्वतःला देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली."
2. 'एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर राजकारणासाठी 80 हजार फेक अकाउंट्स बनवणं धक्कादायक'
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट अकाऊंट्स तयार करून त्याचा राजकारणासाठी वापर करणं हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
"तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल. पण असं कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार आहे. आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर गेलीये, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हाथरसप्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी योगी सरकारवर तसंच पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभं केलं.
"पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या नेत्यांशी सरकार आणि प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. प्रशासन आणि पोलिसांचं नेत्यांशी वागणं धक्कादायक असल्याचं सांगत याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद होती," असं सुळे यांनी म्हटलं.
3. कोरोनासंबंधी काळजी घेण्याबाबत आयुष मंत्रालयाच्या नवीन गाइडलाइन्स
केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या आहेत. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
कोरोनाची लक्षणं न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी आयुष-64 हे 500 मिलिग्रॅम औषध दिवसातून दोनदा कोमट पाण्यातून घ्यावं, असं आयुष मंत्रालयानं सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे औषध घ्यावं, असं आयुष मंत्रालयाने सांगितलं. याशिवाय कोरोनाची लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं, असा सल्लाही सरकारने दिला आहे.
कोरोनातून बरं झाल्यानंतर अश्वगंधाचा 500 मिलीग्रॅम रस किंवा एक ते तीन ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून घ्यावा, असंही आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे.
4. लॉकडाऊनचा फटका गुंतवणुकीला, गेल्या 16 वर्षांतील नीचांकी गुंतवणूक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा भारतामधील गुंतवणुकीला जबरदस्त फटका बसला आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील परिस्थिती सहा महिन्यानंतरही 'जैसे थे'च आहे. मुंबईमधील 'द सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या थिंक टॅकने यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. इंडिया टुडेनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
लॉकडाऊनच्या आधी सर्वाधिक गुंतवणूक ही सरकारच्या माध्यमातून झाली होती. सरकारी संस्थांनी त्यावेळीच्या एकूण गुंतवणुकीपैकी 44 टक्के गुंतवणूक केली होती, तर इतर हिस्सा हा खासगी क्षेत्रातील नवगुंतवणुकदारांचा होता.
CMIE ने दिलेल्या माहितीनुसार सरकारने 258 अब्ज रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. 258 अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीचे हा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या प्रस्तावांचा एकत्रित आकडा आहे.
CMIEच्या माहितीनुसार मागील 16 वर्षांमधील ही सर्वात कमी प्रस्तावित गुंतवणूक आहे. जून 2004 नंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी पहिल्यांदाच एवढ्या कमी प्रमाणात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. हा 16 वर्षांमधील नीचांक असल्याचे CMIE चं म्हणणं आहे.
5. नवीन रफाल खरेदी करण्यासंबंधी निर्णय नाही- एअर चीफ मार्शल भदौरिया
नवीन रफाल खरेदी करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिली आहे. बीबीसी हिंदीनं यासंबंधी बातमी दिली आहे.
सोमवारी (5 ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, विमान खरेदी हे एक गुंतागुतीचा व्यवहार असतो आणि हवाईदलाकडे त्यासंबंधी अनेक पर्याय आहेत.
भारतानं फ्रान्ससोबत 36 रफाल विमानांच्या खरेदीचा करार केल आहे. या करारानुसार पहिली पाच विमानं जुलै महिन्यात भारतात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)