You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर: 'लॉकडाऊन लावल्यास आम्ही तोडू, तुरुंगात जाण्याचीही तयारी'
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं काही टप्प्यांमध्ये लॉकडाऊन लागू केलं होतं. आता 'अनलॉक'चे टप्पे सुरू झाले आहेत. मात्र, ज्या भागात अजूनही कोरोनाचा प्रसार होत आहे किंवा रुग्ण सापडत आहेत, तेथे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आल्याची टीका करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
31 जुलैनंतरही लॉकडाऊन लागू केल्यास तो तोडण्याचा इशारा आंबेडकरांनी दिलाय. त्यासाठी तुरुंगात जाण्यासही तयार असल्याचं ते म्हणाले.
केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारला उद्देशून प्रकाश आंबेडकर म्हणाले, "वंचित बहुजन विकास आघाडीकडून सरकारला इशारा देतो की, तुम्हाला लॉकडाऊन लावायचा असेल तर लावा, पण आम्ही लोकांना सांगू की, लॉकडाऊन तोडा."
लॉकडाऊन तोडण्याचा इशारा कसा अमलात आणायचा, हे आम्ही त्यावेळी ठरवू, असंही आंबेडकरांनी नमूद केलं.
अकोल्यातील सर्किट हाऊसवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरही त्यांनी संशय व्यक्त केला.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोरोना रुग्णाच्या आकडेवारीबाबत आधीही साशंक होतो आणि आजही आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मात्र, "लॉकडाऊन करायचं असल्यास आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवा. पोटापाण्याचा प्रश्न मिटवू शकत नसाल, तर आम्ही तो सोडवण्यात सक्षम आहोत. फक्त एवढंच आहे की, लॉकडाऊन आम्हाला मोडावा लागेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.
बीबीसी मराठीनंही याबाबत प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला. ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, सरकारनं लॉकडाऊन लागू केल्यास आम्ही तो मोडून काढू, हे आमचं ठरलंय आणि पूर्णपणे स्पष्ट इशारा आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काल (27 जुलै) लॉकडाऊन मोडून काढण्याचा इशारा दिला. मात्र, अजूनही राज्य सरकारकडून कुणीही प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाहीय. प्रकाश आंबेडकरांनीच याबाबत बीबीसीला माहिती दिली.
लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे आणि काय बंद आहे?
कोमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. 29 जूनला) राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याचं एका आदेशाद्वारे जाहीर करण्यात आलं होतं.
राज्यात कंटेनमेंट झोन बाहेरील निवासी व्यवस्था असलेल्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 8 जुलैपासून हॉटेल सुरू होणार आहेत. पण जितकी हॉटेलची क्षमता असेल त्याच्या 33 टक्केच लोकांना राहण्याची परवानगी दिली आहे.
शॉपिंग मॉल बंद राहतील असे राज्य सरकारने सांगितले आहे. कोल्हापूर जिल्हयात 20 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिलह्यात येण्यास वाहनांना जे ई-परवाने देण्यात येतात ते स्थगित करण्यात आले आहेत.
या गोष्टी बंद आहेत?
- शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
- मेट्रो रेल्वे
- ट्रेन्सची नियमित वाहतूक
- सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.
- कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
- विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं
- शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
- सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.
लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे 31 जुलैनंतर लॉकडाऊन नसावा असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)