नितीन नांदगावकर : तडीपारीची नोटीस मिळालेला हा शिवसैनिक का असतो चर्चेत?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'जय महाराष्ट्र, मी शिवसैनिक', या वाक्यानं नांदगावकरांच्या व्हीडिओची सुरुवात होते आणि मग पुढे काय घडेल याची काही शाश्वती नसते.

आधीचे मनसे पदाधिकारी आणि आताचे शिवसैनिक असलेले नितीन नांदगावकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांनी मुंबईतल्या वांद्रे भागातल्या एका दुकानदारास त्याच्या दुकानाचं नाव बदलण्यासाठी दिलेल्या धमकी मुळे.

वांद्रे परिसरात कराची नावाचं एक मिठाईच दुकान आहे. या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी नंदगावकर यांनी केली आहे. मुंबईत कराची नावाने कोणताही व्यवसाय होऊ देणार नाही, असं नांदगावकर यांचं म्हणणं आहे.

या मुद्द्यावरून दुकान मालकाशी वाद घालतानाचा नांदगावकर यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. नांदगावकर चर्चेत येण्याची आणि वादात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही.

नांदगावकर उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यासाठी ते अनेकदा हातात कायदाही घेतात आणि प्रसंगी हाणामारी करतात. उत्तर भारतीयांवर केलेली दादागिरी ते सोशल मीडियावर दाखवतात आणि त्यांचे व्हीडिओ व्हायरलही होतात.

नितीन नांदगावकर हे सामान्य मराठी माणसाची बाजू घेतात, असं काही जणांना वाटतं, तर काहींच्या मते ते गुंडगिरी करतात.

पण, नांदगावकर कोण आहेत आणि त्यांच्यावरच्या आक्षेपांविषयी त्यांचं काय म्हणणं आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

नितीन नांदगावकर कोण आहेत?

नितीन नांदगावकर हे स्वत:ची ओळख राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता अशी करून देतात. सध्या ते शिवसेनेत आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यावेळी ते मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ते परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. परप्रांतीय रिक्षाचालकाला केलेली मारहाण असो की दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दिलेला दम असो, नांदगावकर कायमच फेसबुक व्हीडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात.

त्यांच्या कामाच्या या स्टाईलमुळे पोलिसांनी त्यांना मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.

नांदगावकर आधी केव्हा चर्चेत आले होते?

नांदगावकर यांनी 16 जुलैला मुंबईतल्या एका हॉस्टिपलला भेट दिली.

याविषयी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "मला सकाळी फोन आला आणि... एका रुग्णाच्या नातेवाईकानं सांगितलं की, 8 लाख भरा आणि मगच मृतदेह ताब्यात घ्या, असं हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलंय. मी त्यांना सांगितलं की, मला 2 तास द्या. मी येतो तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवा. मी येतोय, जे काही होईल ते समोरासमोर होईल."

एवढे पैसे न भरता आपण मृतदेह सोडवून घेतल्याचं ते सांगतात. हॉस्पिटल प्रशासन दादागिरी करत असल्याचा त्यांनी आरोप केला. या प्रकारानंतर आता आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार नांदगावकर यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

या घटनेपूर्वी त्यांनी मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात जाऊन तिथला मृतदेह ताब्यात घेतला होता. ही घटना त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडली होती.

ही झाली आताची घटना. पण नितीन नांदगावकर कायमच आक्रमक पद्धतीनं काम करत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी रिक्षामधील मीटरमध्ये गडबड केल्यामुळे भाडे वाढवून घेणाऱ्या रिक्षाचालकाची रिक्षा फोडली होती. तसंच एकदा एका परप्रांतीय रिक्षावाल्याला मारहाणही केली होती. हे सगळे व्हीडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

नांदगावकर हे सरकारचं अपयश?

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी मॅक्स महाराष्ट्रवर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, सत्ता शिवसेनेची आहे. सत्ता असतानाही नांदगावकर यांना बिलं कमी करण्यासाठी धमकवण्याचे प्रकार करावे लागत असतील तर मग हे अपयश कुणाचं आहे."

"रूग्णालयांची बिलं न परवडणारी आहेत, त्याला काहीच स्पष्टीकरण दिलं जात नाही. आयसीयू मध्ये ऑक्सिजनचेही पैसे लावण्यात येत आहेत. अशावेळी सामान्य जनतेला जर नांदगावकर योग्य वाटत असतील, तर हे सरकार फेल आहे यावरचं शिक्कामोर्तब आहे."

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, "हाणामारी आणि फोडाफोडी ही शिवसेनेची पूर्वीची स्टाईल होती. पण, उद्धव ठाकरेंच्या हातात पक्षाची धुरा आल्यापासून शिवसेना अशा पद्धतीनं काम करताना दिसत नाही. एखाद्याला मारहाण करणं, कॅमेऱ्यात त्याचं चित्रीकरण करणं आणि कायदा हातात घेणं, असं शिवसेनेत आता होत नाही. पण सामान्य माणसांना एक अमिताभ बच्चन लागत असतो. नांदगावकरांना लोकांचा प्रतिसाद मिळतो कारण लोकांमध्ये असंतोष आहे आणि नांदगावकर बच्चन बनून त्याचं प्रतिनिधित्व करताना दिसून येतात."

जे प्रश्न कायद्यानं सुटत नाही आणि ज्या प्रश्नांचा सामान्यांना त्रास होतो, तिथं नांदगावकर कायदा हातात घेताना दिसून येतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्यक्त करतात.

ते म्हणाले, "नितीन नांदगावकर सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी उभे राहतात. मग ते रिक्षा फोडणं असो की डॉक्टरला दम भरणं असो, जिथं लोकांची लुबाडणूक होते, तिथं नांदगावकर कायदा हातात घेतात. ऑन द स्पॉट प्रश्न निकाली जातात म्हणून त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळतो."

नांदगावकरांचं म्हणणं काय?

नांदगावकरांवरील आक्षेपांविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

पण तुम्ही कायदा हातात घेता या आक्षेपावर टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नांदगावकरांनी म्हटलं होतं, "कायद्याच्या चौकटीत राहून कामं करायला लागलो, तर होणार नाहीत. कायद्याचा आणि पोलिसांचा मान-सन्मान आहे, मला ठोकायला आवडतं. राज्यघटनेत ज्या गोष्टी आहेत, त्याचा आदर नक्कीच आहे, पण, मला असं वाटतं की, गोर-गरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांना न्याय मिळत नसेल, तर जिथं अन्याय दिसेल तिथं लाथ बसलीच पाहिजे.

"जो कुणी पीडित असेल त्याला न्याय देण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी पर्वा नाही.जिथं चुकीचं होत असेल, तिथं गुलाबाची फुलं मी देणार नाही, मी ठोकणार म्हणजे ठोकणार."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)