विकास दुबे चकमक: देवेंद्र मिश्र यांचा काँस्टेबल ते पोलीस उपअधीक्षकपदापर्यंतचा प्रवास

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

साधारणपणे कॉन्स्टेबल पदावर पोलीस विभागात भरती झालेला कर्मचारी पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण कानपूरमध्ये विकास दुबेविरुद्ध झालेल्या चकमकीचं नेतृत्व करणारे देवेंद्र मिश्र यांनी ही कामगिरी करून दाखवली होती.

उत्तर प्रदेशात बांदा जिल्हातील रहिवाशी असलेले देवेंद्र मिश्र यांनी 1981 मध्ये कॉन्स्टेबल पदापासून आपली उत्तर प्रदेश पोलीस विभागातील कारकीर्द सुरू केली. विभागीय परीक्षा पास करून ते पोलीस उपनिरीक्षक बनले.

2005 मध्ये उन्नाव जिल्ह्यातील आसिवन पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम सांभाळलं. यादरम्यान त्यांनी एका सराईत गुन्हेगाराचं एनकाऊंटर केला होता. या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना 'आऊट ऑफ टर्न' प्रमोशनची संधी मिळाली. या पदोन्नतीनंतर देवेंद्र मिश्र पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचले.

पोलीस निरीक्षक पदावरही मिश्र यांची उत्तम कामगिरी सुरू होती. 2012 मध्ये त्यांनी रेल्वेत दरोडा टाकणाऱ्या गँगला पकडून त्यांच्याकडून लुटीचं साहित्य हस्तगत केलं.

देवेंद्र मिश्र यांच्या या कामगिरीचं बक्षीस मिळालं. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केलं.

2013 मध्ये देवेंद्र मिश्र वाराणसी कँटोनमेंट विभागात जीआरपी निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका जहरखुरानी गँगचा पर्दाफाश करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

देवेंद्र मिश्र यांच्यासोबत मिळून काम केलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिली.

ते सांगतात, "आपल्या कार्यकाळात देवेंद्र हे अनेकवेळा गुन्हेगारांविरुद्धच्या चकमकीत सहभागी असत. विभागात त्यांना एक धाडसी आणि हुशार अधिकारी म्हणून ओळखलं जात असे."

पोलीस विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल देवेंद्र मिश्र यांना पुढे आणखी एक बक्षीस मिळालं.

2016 मध्ये त्यांना आणखी एक आऊट ऑफ टर्न प्रमोशन मिळून त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी बढती झाली.

देवेंद्र मिश्र सध्या बिल्हौरमध्ये विभागीय अधिकारी पदावर कार्यरत होते. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात ते निवृत्त होणार होते.

सध्या बांदा जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदावर काम करत असलेल्या ब्रजेश यादव यांनीही देवेंद्र मिश्र यांच्यासोबत काम केलं आहे.

यादव यांच्या मते, "जीआरपीमध्ये पोलीस निरीक्षक पदावर असताना देवेंद्र मिश्र यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे सर्वांचं मन जिंकलं होतं. ते केवळ धाडसी अधिकारीच नव्हे तर एक मनमिळावू व्यक्तीही होते. कोणत्याही व्यक्तीचं मन जिंकण्याचं कसब त्यांच्याकडे होतं."

बांदा जिल्ह्यातील सहेवा गावात देवेंद्र मिश्र यांचे नातेवाईक राहतात. तर त्यांची पत्नी आणि दोन मुली कानपूरमध्येच राहतात.

गावात देवेंद्र यांचे लहान भाऊ राजीव मिश्र आणि रामदीन मिश्र राहतात. देवेंद्र यांचे वडील एक प्राध्यापक होते.

पोलीस अधिकारी सध्या तरी विकास दुबे ऑपरेशनबाबत स्पष्टपणे माहिती देत नाहीत. पण विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पथकात अनुभवी, तज्ज्ञ आणि तरूण अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं आहे.

यामुळेच देवेंद्र मिश्र यांच्याकडे या पथकाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. पण असं असूनही हे ऑपरेशन कसं अयशस्वी ठरलं, याविषयी कोणतेही अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत.

कानपूरमध्ये देवेंद्र मिश्र हे बराच कार्यरत होते. इथं विविध पोलीस ठाण्यांचे ते प्रभारी राहिले आहेत.

त्यांचं शेजारी गाव जखिनी इथं राहणारे उमाशंकर पांडेय सांगतात, "देवेंद्र मिश्र शिपाई म्हणून पोलिसांत दाखल झाले. अभ्यासात ते प्रचंड हुशार होते. नोकरी मिळवली तेव्हासुद्धा ते पदवीधर होते. त्यांचे प्राध्यापक वडील गरीब होते. पण त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही. यामुळेच सगळी मुलं पुढे चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली. 2016 मध्ये देवेंद्र यांचं प्रमोशन पोलीस उपअधीक्षक पदावर झाल्यानंतर गावातली लोक खूप आनंदी झाली होती.

प्रमोशननंतर देवेंद्र मिश्र यांची बदली कानपूरमध्ये झाली. ते स्वरूप नगरचे प्रमुख म्हणून आले. काही दिवसांपूर्वी ते बिल्हौरचे प्रमुख होते.

उत्तर प्रदेश पोलिसांतून सेवानिवृत्त झालेले माजी पोलीस महासंचालक व्ही. एन रॉय सांगतात, "कॉन्स्टेबल पदावर पोलीस भरती झालेला कर्मचारी जास्तीत जास्त पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचू शकतो. पण पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारणं, ही नक्कीच मोठी कामगिरी आहे. यातूनच त्या कर्मचाऱ्याने पोलीस विभागात राहून किती महत्त्वाची सेवा केली, यावर शिक्कामोर्तब होतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)