You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांचे राजनाथ सिंह यांना प्रत्युत्तर, 'आमच्या सर्कसमध्ये विदूषक हवाय' : #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. आमच्या सर्कसमध्ये विदूषक हवाय- पवार
आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत परंतु विदुषकाची कमतरता आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे सर्कस आहे अशी टीका राजनाथ यांनी केली होती. 'सामना'ने ही बातमी दिली आहे.
दोन दशकांमध्ये राष्ट्रवादीने अनेक चढउतार पाहिले. स्वत:च्या सत्तेसाठी पक्ष सोडून गेले. त्याचा परिणाम पक्षावर झाला नाही. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांमुळेच पक्ष कधीच संपला नाही असंही त्यांनी नमूद केलं.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा दौरा शरद पवार यांनी केला. तेव्हा ते बोलत होते. शिवसेनेनेही राजनाथ यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं काम सुसुत्रतेने सुरू असून, उलटपक्षी गुजरातमध्येच सर्कस सुरू असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
2. सलून सुरू करून नाभिक समाजाला न्याय द्या- फडणवीस
राज्यात जवळपास 20 लाख सलून व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकट आहे. त्यामुळे सरकारने सलून सुरू करून नाभिक समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'टीव्ही9' ने ही बातमी दिली आहे.
राज्यातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसंच वेलनेस उद्योगातील प्रतिनिधी यांच्याशी फडणवीस यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.
3. प्रत्येकाने कोरोना वॉरियर व्हायला हवं- डॉ. रमण गंगाखेडकर
कोरोना लसीची वाट न पाहता प्रत्येकाने फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम केलं पाहिजे असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.
प्रत्येकाला कोरोना वॉरियर होण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर लसीसाठी जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र त्यासाठी 2021 साल उजाडू शकतं. हात धुणे, सॅनिटायझर लावणे, मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी करायलाच हव्यात असं त्यांनी सांगितलं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या वतीने आयोजित कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा कृषी शिक्षणावर परिणाम या विषयावर आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.
4. गणेशोत्सवाबाबत सरकार घेईल तो निर्णय मान्य
गणेशोत्सवाबाबत सरकार घेईल तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका गणपती मंडळांनी घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा करायचा की नाही याचा निर्णय शासन दरबारी सोपवण्यात आला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांकडून गणेशोत्सवाबाबत सूचना जाणून घेतल्या. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
5. अदानी ग्रुपला 45000 कोटींचं सोलर प्रोजेक्टचं कंत्राट
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला जगातील सर्वांत मोठ्या सौर प्रकल्पाचे कंत्राट मिळालं असून, हा करार 45 हजार कोटींचा आहे.
अदानी कंपनी 8 जीडब्ल्यू सौर प्रकल्प विकसित करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चार लाख लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल.
या प्रकल्पामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन 90 दशलक्ष टनांनी कमी होईल असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)