You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना सोलापूर: ग्रीन झोनमध्ये जाता जाता सोलापूर कसं बनलं कोव्हिड-19चं हॉटस्पॉट
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
सध्या जगभरात सगळीकडेच कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. रोजच वाढत असलेले आकडे पाहून कोरोनाचा प्रसार किती वेगाने होतो, याबाबतचे अहवाल, आकडेवारी आपल्याला रोज मिळत आहेत.
एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सोलापूरने पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुमारे 19 दिवस शून्य रुग्णसंख्येवर काढले. त्यामुळे शहरवासीयांच्या ग्रीन झोनमध्ये कायम राहण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
पण पहिलं लॉकडाऊन संपायला दोन दिवस उरले असतानाच शहरात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण 12 एप्रिल रोजी आढळला आणि त्यानंतर चित्र बदललं. फक्त दीड महिन्यातच सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सुमारे साडेपाचशेच्या वर गेली आहे.
एकीकडे राज्य सरकार रेडझोनबाबत शिथितला आणून इतर जिल्ह्यांना मोकळीक देत असताना मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबादप्रमाणे सोलापूरही रेडझोनमध्येच आहे.
सोलापुरात इतक्या कमी वेळेत कोरोनाचा प्रसार कसा झाला, त्यामागची कारणं नेमकी काय, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड-19 संदर्भातली आकडेवारी (23 मे 2020 पर्यंत)
शेकडो नागरिक पुणे-मुंबईतून परतले
सोलापूर जिल्हा राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. इथं मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातील अनेक नागरीक स्थायिक झाले आहेत. विशेषतः यंत्रमाग कामगार, मोजमजुरी करून जगणारे, बिडी कामगार, बांधकाम मजूर यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. याशिवाय शहरी गरीब मध्यमवर्गीय नागरिकही मोठ्या प्रमाणात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बहुतांश कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती कामाच्या निमित्ताने पुण्या-मुंबईत राहतो. हिंजवडीत काम करणाऱ्या इंजिनिअरपासून इतर छोटी-मोठी कामे करणाऱ्या मजूरांचा समावेश आहे. तसंच अनेक विद्यार्थी पुण्या-मुंबईत शिक्षण घेत आहेत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी जाणार?
दैनिक 'सांज'चे संपादक अविनाश कुलकर्णी सांगतात, "मुंबई-पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच अनेक नागरिक सोलापुरात परतत होते. या नागरिकांची नोंद ठेवणारं कुणीच नव्हतं. गावावरून नातेवाईक आल्याची माहिती अनेकजण क्वारंटाईन होण्याच्या भीतीने लपवत होते. याचाच परिणात आज कोरोना सोलापुरात इतका वाढला आहे.
शहरात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी आणि नंतर सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नागरिक पुण्या-मुंबईवरून परतल्याचं सांगण्यात येत आहे. पण मार्च महिन्यात पुण्या-मुंबईवरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाकडे पूर्णपणे उपलब्ध नाही. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातही याची अचूक माहिती नोंदवली गेली नाही.
या लोकांची अचूक माहिती उपलब्ध असल्यास आवश्यक उपाययोजना करून संबंधित नागरिकांवर विशेष लक्ष देता आलं असतं.
याबाबत सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे सांगतात, "प्रशासनाने पुणे-मुंबईवरून आलेल्या लोकांची नोंदणी करण्यासाठी एक पोर्टल बनवलं होतं. पण इथं फक्त 5 हजारांच्या आसपास नोंदणी झाली. मुळात यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक या शहरातून सोलापुरात दाखल झाले आहेत."
"नंतरच्या काळात शहरात दाखल होणाऱ्या लोकांची चेकनाक्यावरच महापालिकेकडून नोंद घेण्यात येत आहे. लक्षणं नसली तर 14 दिवस होम क्वारंटाईन आणि लक्षणं असतील तर संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे," असं तावरे सांगतात.
सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
लॉकडाऊननंतर शहरातील नागरिक कोरोनाबाबत फारसे गंभीर नव्हते, विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती, त्यामुळे कोरोनाला पाय फुटले, असं स्थानिक रहिवासी आणि अखिल भारतीय नागरिक-ग्राहक मंचचे योगीन गुर्जर यांना वाटतं
सुरुवातीचे काही दिवस राज्यात इतरत्र रुग्ण आढळत असतानासुद्धा सोलापुरात रुग्ण नव्हते. यामुळे सोलापुरात कोरोना पसरू शकतच नाही, असा अर्थ अनेकांनी घेतला. यादरम्यान गप्पा मारत गल्लीत जमणं, नातेवाईकांकडे जाणं, असे प्रकार घडत होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने कोरोनाचा प्रसार वाढला, असं गुर्जर सांगतात.
शिवाय, भाजी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर, धान्य घेण्यासाठी रेशन दुकानाबाहेर गर्दी होण्याचं सत्र सुरूच होतं. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याचं जाणकारांचं मत आहे.
दाटीवाटीचे कंटेनमेंट झोन
केवळ शहरातच नव्हे, तर काही प्रमाणात कंटेनमेंट झोनमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.
कोरोनाग्रस्त आढळलेला परिसर प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सीलबंद केला जात होता. पण झोनच्या आतील भागात सकाळ-संध्याकाळच्या वेळी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून आले. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी वारंवार बातम्या देऊन प्रशासनाचं लक्ष याकडे वेधलं.
'लोकसत्ता'चे पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांच्या मते, "सोलापुरात कोरोना व्हायरसचा शिरकाव झालेल्या भागात मोलमजुरी करणारी, झोपडपट्टी भागात राहणारी, सार्वजनिक शौचालयं वापरणारी लोक मोठ्या संख्येने राहतात. छोट्या गल्ल्या आणि दाट लोकवस्तीच्या या परिसरात कंटेनमेंट झोन केला तरी त्यांच्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची संकल्पना शक्य नाही."
आयुक्त तावरे यांनी याबाबत बोलताना प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणतात, "शहरातील झोपडपट्टी भागात कोरोना जास्त पसरला आहे. इथं एखादा कोरोना बाधिताच्या संपर्कातील संशयित रुग्ण असल्यास त्याच्या संपर्कातील 10 ते 12 लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांची सोय जवळच्या मंगल कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या जेवण्या-खाण्याची सोयही प्रशासनाकडूनच केली जात आहे."
नियम मोडणाऱ्यांची मोठी संख्या
लॉकडाऊननंतर देशभरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांबाबत बोललं जात असताना सुरुवातीला मात्र सोलापूरकरांमध्ये लॉकडाऊनबाबत अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसलं आहे. गल्लोगल्ली घोळका करून उभं राहणं, विनाकारण रस्त्यांवर फिरणं यांसारखे प्रकार दिसून आले. प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा इशारा वारंवार दिला. पण तरी रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या मोठी होती.
या कालावधीत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च ते 21 मे या कालाधीत पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत एकूण 2,692 व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. तर बॉर्डर सिलिंगदरम्यान विनापरवानगी प्रवास केल्याप्रकरणी 10 मार्च ते 21 मेदरम्यान 12,955 वाहनांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. तर सोलापूर आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊनचे नियम मोडून विनाकारण फिरताना आढळल्यामुळे 3,601 दुचाकी, 194 रिक्षा आणि 97 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
अहवाल येण्यापूर्वीच अनेकांचे मृत्यू
सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेच एक-दोन दिवसांतच मृत्युमुखी पडलेल्या किंवा थेट रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, अशा मृत्यूंची संख्या जास्त आहे.
याबाबत एजाज हुसेन मुजावर सांगतात, "सोलापुरात पहिला रुग्ण आढळला तेव्हा त्याचा आधी मृत्यू झाला आणि नंतर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्या व्यक्तीच्या संपर्कातील महिलेला आणि महिलेच्या घराजवळच्या सुमारे 20 ते 25 लोकांना लागण झाली. पुढच्या काळातही असेच प्रकार दिसून आले.
आधी मृत्यू आणि नंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त असे प्रकार वारंवार घडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी पावलं उचलली. लोक अतिशय गंभीर स्थितीत रुग्णांना दाखल करत आहेत. त्याऐवजी एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणं दिसल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात यावं, असं आवाहन प्रशासनाने स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून केलं होतं.
'पालकमंत्री दोनवेळा बदलल्याचा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम'
एकीकडे राज्य कोरोना संकटाला तोंड देत असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या कालावधीत दोनवेळा बदलण्यात आले.
राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम पालकमंत्रिपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होतं. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे पद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आलं. सोलापूरचं पालकमंत्रिपद मिळताच आव्हाड यांनी शहरात दाखल होत नियोजनाचा आढावाही घेतला होता. पण नंतर त्यांनाच कोरोनाने ग्रासल्याने ते क्वारंटाईन झाले.
दरम्यान, त्यांच्याकडून हे पद काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.
कोरोनाचा प्रसार होत असताना महत्त्वाच्या काळात दोन वेळा पालकमंत्रीपद बदलण्यात आल्याने त्याचा प्रशासनाच्या नियोजनावर परिणाम झाल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख व्यक्त करतात. देशमुख हे मागच्या फडणवीस सरकारमध्ये माजी आरोग्य राज्यमंत्री आणि सोलापूरचे माजी पालकमंत्री होते. ते सध्या भाजपचे शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत.
विजयकुमार देशमुख सांगतात, "कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिले दोन महिने महत्त्वाचे होते. यावेळीच योग्य नियोजन करून कोरोना नियंत्रणात आणता आला असता पण या दरम्यान दोनवेळा पालकमंत्री बदलण्यात आले. याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर झाला आहे."
विजय देशमुख यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं मत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. पालकमंत्री बदलल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम झाला नाही असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शहरातील कोरोना संकट हाताळताना प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप होऊ लागला होता.
ते सांगतात, "शहरातील सिव्हिल रुग्णालयात कोव्हिड-19 शी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. या काळात खासगी डॉक्टरांनी आपली सेवा देणं बंद केलं होतं. त्यामुळे बाधित, संशयित आणि संपर्कातील रुग्णांसह इतर लोकांनाही सिव्हील रुग्णालयातच जावं लागत होतो. यामुळे सिव्हील रुग्णालयावर प्रचंड ताण येत होता."
"सुरुवातीलाच जर प्रशासनाने योग्य नियोजन केलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. प्रशासनात समन्वय नाही, त्यामुळे कोरोना स्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडलं, असा आरोप आमदार देशमुख यांनी केला.
दरम्यान, पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर भरणे यांनी नियोजन बैठक घेतली होती. स्थिती हाताळण्यासाठी इथं अनुभवी अधिकारी असावा, असं मत बनल्यानंतर त्यांनी एक IAS स्तरावरील अधिकारी सोलापूरला पाठवण्याची विनंती शासनाकडे केली. त्यानंतर पी. शिवशंकर यांना सोलापुरात निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशासनात समन्वय नसल्यामुळेच वरीष्ठ अधिकारी बोलवावा लागल्याची चर्चा पत्रकारांसह लोकांमध्ये आहे. पण प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे फेटाळून लावतात.
या सर्व आरोपांवर प्रशासनाची बाजू स्पष्ट करताना त्या सांगतात, "राज्यात सर्वच ठिकाणी केस वाढत आहेत. सिव्हील रुग्णालयावर सुरुवातीला प्रचंड ताण पडत होता. त्यानंतर कोव्हिड-19 साठीची रुग्णालयं वाढवण्यात आली आहेत."
"प्रशासनाचं काम योग्य पद्धतीने चाललेलं आहे. आता खासगी डॉक्टरांबाबतचा प्रश्नही आता मिटला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची वाढ लवकरच आटोक्यात येईल," असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
महापालिका आयुक्त सांगतात, "कोरोना स्थितीबाबत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका होतात. चर्चा करून आवश्यक ते निर्णय तातडीने घेण्यात येत आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)