You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस: 'महाराष्ट्रातील जनता मला योग्य वेळी पुन्हा सत्तेत आणेल' #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1) जनता मला योग्य वेळी पुन्हा सत्तेत आणेल - फडणवीस
"राज्यातील जनतेने मला पुन्हा सत्तेत आणले होते. पण राजकीय वजाबाकीने घरी बसवलं आणि विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागलं. जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही. योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच," असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 'लोकसत्ता'च्या वेबसंवादात ते बोलत होते.
"विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो, तरीही 144 चा जादुई आकडा गाठता आला असता. आमची तेवढी ताकद होती," असं फडणवीस म्हणाले.
मात्र, "लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही शिवसेनेशी युती केली होती. लोकसभेला युती केली, पण विधानसभेला पुन्हा 2014 च्या धर्तीवर युती केली नाही तर भाजप हा संधीसाधू पक्ष असल्याची टीका होण्याची शक्यता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असा स्वार्थीपणा करू नका, असा सल्ला दिला होता. यामुळेच आम्ही युती केली," असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
2) पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील आरोपीला कोरोना व्हायरसची लागण
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या तिघांच्या हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या एका 55 वर्षांच्या आरोपीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी सध्या वाडा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यासोबत इतर 21 आरोपीही आहेत.
आरोपीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने कोरोनामुक्त वाडा तालुक्यात आता खळबळ माजली आहे. त्याच्या संपर्कात आलेले इतर आरोपी आणि पोलीस यांच्यासहीत काही जणांचे अलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आलीय. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
मॉब लिंचिंगच्या या प्रकरणात एकूण 110 आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 22 आरोपींना कोरोनापासून संरक्षणासाठी वाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 26 मार्चला सर्व आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल एक तारखेला प्राप्त झाला. ज्यामध्ये एका आरोपीला कोरोना झाल्याची माहिती आहे. संबंधित रुग्णाला पालघर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
3) 'मिशन कोटा'नंतर आता 'मिशन दिल्ली'
लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकलेले राज्यातले विद्यार्थी नुकतेच स्वगृही परतले आहेत. त्यानंतर आता दिल्ली येथे UPSC परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आपल्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना दिल्लीत राहताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी दिल्लीतून मुंबई किंवा पुण्याकडे रेल्वे पाठवावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केलीय तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
दिल्लीत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना रेल्वे अथवा बसने परत आणण्याचा विचार सुरु आहे. शासन स्तरावर याबाबत लवकरच निर्णय होईल असा विश्वास श्रीकांत शिंद यांनी व्यक्त केलाय.
दिल्लीच्या राजेंद्रनगर परिसरात दीड ते दोन हजार मराठी विद्यार्थी राहतात. 31 मे रोजी नियोजित पूर्वपरीक्षेबाबत दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
4) भारतातील कोरोना साथीचा सर्वांत वाईट काळ संपुष्टात - प्रकाश जावडेकर
कोरोना साथीचा भारतातील सर्वांत वाईट काळ संपुष्टात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. या आरोग्य संकटावर प्रभावी लस शोधली जात नाही, तोपर्यंत सोशल डिस्टंसिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करणे या 'न्यू नॉर्मल' सवयींचे पालन कायमस्वरुपी अंगवळणी पाडून घ्यावे लागेल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट जात नाही तोपर्यंत मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना लढ्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत भारताची स्थिती जगाच्या तुलनेत चांगली आहे. पण स्वच्छतेच्या या नियमांची आपल्याला सवय करुन घ्यावी लागेल असंही ते म्हणाले.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
5) कोरोनामुळे वृत्तपत्रांना चार हजार कोटींचा फटका
कोरोनाचे आरोग्य संकट आणि त्यामुळे देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र व्यवसायाला गेल्या दोन महिन्यात चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे, अशी भीती वृत्तपत्रांची संघटना इंडियन न्यूजपेपर सोसायटीने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या व्यवसायावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 30 लाख लोकं अवलंबून असून, वृत्तपत्र व्यवसाय आणि पर्यायाने या लोकांचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज देणे आवश्यक आहे, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)