You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजय मल्ल्या, चोक्सी, रामदेवबाबांसह अनेकांची 68,000 कोटींची कर्जं माफ #5मोठ्या बातम्या
आज सकाळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. कर्जबुडव्यांची 68 हजार कोटींची कर्जं राइट ऑफ
देशातील बँकांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 68 हजार 607 कोटी रुपयांची कर्जे राइट ऑफ केली आहेत. त्यात मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्यासह 50 सहेतुक कर्जबुडव्यांचा समावेश आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.
ही बातमी मनी कंट्रोलने दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी रिझर्व्ह बँकेकडे ही माहिती मागितली होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या यादीत हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सचा क्रमांक पहिला असून, या कंपनीने 5 हजार 492 कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.
मला देशातील सर्वांत मोठ्या बँक चोरांची नावे सांगा, असा प्रश्न मी विचारला होता. अर्थमंत्र्यांनी त्याचं उत्तर देण्यास नकार दिला. आता आरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोकसीसह भाजपच्या मित्रांची नावे बँक चोरांच्या यादीत टाकण्यात आली आहेत. यासाठीच संसदेत हे सत्य लपविण्यात आलं, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
सर्वाधिक कर्जमाफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये चोक्सीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे.
2. साधू हत्या प्रकरणावरून ठाकरे-योगी आमनेसामने
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येवर चिंता व्यक्त केली आहे.
अशा घटनेचं राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये. आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली. तशीच कारवाई तुम्हीही कारवाई करावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी योगींना लगावला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
याप्रकरणी संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. उत्तर प्रदेशातील घटना भयंकर असून याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. पालघरमध्ये असा प्रकार झाला होता, असं ट्वीट राऊत यांनी केलं होतं.
संजय राऊत यांच्या टीकेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाद्वारे ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करू नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी - नितीन गडकरी
देशाच्या विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यांकडे केली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
विविध राज्यांच्या परिवहन मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडकरी यांनी संवाद साधला.
विषाणूंच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे. राज्यांच्या सीमेवर अनेक ट्रक उभे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. ही सीमाबंदी उठवण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
यामुळे जनसामान्यांचे जीवन सुसह्य होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसंच आरोग्यविषयक दक्षता घेण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.
4. फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त - गृहमंत्री
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे.
याचवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
नागपूर येथून मुंबईला जात असताना मंगळवारी (28 एप्रिल) सायंकाळी ते काही काळ जळगावात थांबले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत धावती आढावा बैठकही घेतली. यात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
5. वाधवान बंधूंच्या सीबीआय कोठडीत 4 मेपर्यंत वाढ
वाधवान बंधूंचा अंतरिम जामीन कोर्टाने फेटाळला आहे. DHFL चे प्रमोटर कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना अंतरिम जामीन नाकारण्यात आला आहे. या दोघांच्या सीबीआय कोठडीत 4 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचं प्रकरण समोर आलं होतं. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह 23 जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)