You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र: नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन आधीच जाहीर करायला पाहिजे होता – जितेंद्र आव्हाड
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे काय उपाययोजना केल्या जात आहेत, यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी संवाद साधला.
पाहा ही संपूर्ण मुलाखत इथे -
या मुलाखतीचा संपादित अंश आम्ही इथे प्रसिद्ध करत आहोत....
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनामुळे मृतांचं प्रमाण कमी आहे. हा आकडा का वाढतोय? आपण त्यावर नियंत्रण का मिळवू शकलेलो नाही?
मुंबईची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या समजून घेणं आवश्यक आहे. मुंबईतली 50 टक्के लोकसंख्या त्यांना परवडणाऱ्या घरांमध्ये, म्हणजेच झोपडपट्ट्यांमध्ये राहते. लोकसंख्येची घनता प्रचंड आहे. कामकाजाच्या निमित्ताने लोकांचा एकमेकांशी येणारा संपर्क अधिक आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्यात, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
नियतीशिवाय आपल्याला कोणाला दोष देता येणार नाही. माझ्या मतदारसंघात कळव्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. त्याच जागी बसलेल्या अन्य काहीजणांना संसर्ग झाला. आता यात कोणाचा दोष म्हणायचा? प्रत्येक सरकार आपापल्यापरीने युद्धपातळीवर काम करते आहे.
कोरोनासंदर्भात तत्परतेने अंमलबजावणीचा विचार केला तर महाराष्ट्र सरकारचं नाव घ्यावं लागेल. केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित करण्याआधीच महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला होता. ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार काम करतंय, ते वाखाणण्याजोगं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, काही विशिष्ट मोहल्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. तिथे लॉकडाऊन पाळला जात नाहीये. त्यांनी मुंब्रा-कळव्याचं नाव घेतलं होतं. देवेंद्र यांनी तुमचं नाव घेऊन टीका केली होती. काही मंत्री लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असं ते म्हणाले होते. तुमचं यावर काय म्हणणं आहे?
त्यांनी उल्लेख केला त्या मोहल्ल्यात आतापर्यंत दोन पेशंट सापडले आहेत. मला माहीत नाही की देवेंद्रजींना कोणत्या व्याधीने पछाडलं आहे. सागर बंगल्यात बसून जसं धृतराष्ट्राला संजय बातम्या देत होता, तसा धृतराष्ट्र बनण्याचा प्रयत्न देवेंद्रजी करत आहेत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
देवेंद्रजींच्या माहितीसाठी सांगतो की, राज्यातल्या अनेक डॉक्टर्सनी पेशंट्सना तपासणं बंद केलं, तेव्हा पवार साहेबांनी अपील केलं की डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावं. कळव्यात 12 कम्युनिटी क्लिनिक्स सुरू झाले. मुंब्र्यात कोरोना हॉस्पिटल आणि कोरोना क्लिनिक सुरू झालं. अत्यंत शिस्तीने 400 मोटारसायकली जमा झाल्या आहेत. देवेंद्रजी असं का म्हणाले मला माहिती नाही.
जेव्हा दिवे लावण्याचा संदेश आला, तेव्हा त्याला विरोध करणाऱ्यांपैकी मी होतो. वैज्ञानिक काळात दिवे लावून काय मिळणार, मला माहिती नाही. जनतेला निधी गोळा करण्यासाठी अपील केलं असतं तर आपण एक फंड उभा केला असता.
मला देवेंद्रजींना विचारायचं आहे की - मी त्वेषाने का बोलतो? जेव्हा देशात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण आढळले. बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेली माणसं होती. हे लक्षात आलेलं असतानादेखील आपण ट्रंप यांच्या स्वागतासाठी 50,000 लोकांचा मेळावा घेत होतो, तेव्हा कोरोना पसरत होता. कोण महत्त्वाचं होतं- ट्रंप की आपल्या देशातला सर्वसामान्य माणूस?
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
नरेंद्र मोदींना या आजाराचं गांभीर्य वेळीच लक्षात आलं नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
होय, माझं हे स्पष्ट मत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आजाराचं गांभीर्य लक्षात आलं नाही. 19 आणि 20 फेब्रुवारीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनासंदर्भात ट्वीट केलं. "हा विषाणू विनाशकारी आहे, भारताला उद्ध्वस्त करू शकेल, अशी या विषाणूची ताकद आहे" असं त्यांनी म्हटलं होतं. तेव्हा नरेंद्र मोदींचं ट्वीट होतं - 'लिट्टी चोखा खाया, बहुत मजा आया.'
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं होतं की सॅनिटायझर, मास्क यांच्या तयारीत लागणारा कच्चा माल बाहेर पाठवू नका. 19 मार्चपर्यंत आपण या गोष्टी बाहेर पाठवत होतो. आज त्याचंच दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.
स्थलांतरित कामगारांसाठी तुम्ही काय उपाययोजना केलीत? तुम्ही एक दिवस अचानक घोषणा केलीत - आजपासून सगळं बंद होतंय. हा देश स्थलांतरित मजुरांचा आहे. हा देश शोषितांचा आहे. हा देश दलितांचा आहे. हा देश आदिवासींचा आहे. हा देश भटक्याविमुक्तांचा आहे. गल्लोगल्ली जाऊन काम करणाऱ्यांचा देश आहे. आज त्यांचे प्रचंड हाल होत आहेत, याच्याबद्दल कोण बोलणार?
सोशल डिस्टन्सिंगसारखे शब्द बोलायला चांगले वाटतात, पण पोटाची आग स्वस्थ बसू देत नाही. या लोकांच्या मनात काय येत असेल, याचा विचार करा.
नरेंद्र मोदींनी वेळीच गांभीर्य ओळखून लॉकडाऊन आधी लागू केलं असतं तर आज रुग्णांची संख्या कमी असती किंवा आतापेक्षा कमी वेळासाठी लॉकडाऊन करावं लागलं असतं, असं तुम्हाला वाटतं का?
आंतरराष्ट्रीय विमानसेवा वेळीच रोखायला हवी होती. इंटरनॅशनल फ्लाईट्स न रोखल्याने आपल्याला प्रचंड अडचणी आल्या. माझा डायलॉगच आहे-पासपोर्टवाल्यांमुळे रेशन कार्डवाल्यांना मार खावा लागतो आहे. मलेशियात कोरोना रुग्ण होते, मलेशियातून लोकांना इथे येऊ देण्याची गरज काय होती?
निझामुद्दीन पोलीस, जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहखात्याच्या अंतर्गत येतात, त्याच्याशी केजरीवालांचा काहीच संबंध नाही. अमित शहांनी ते उद्ध्वस्त का केलं नाही? शाहीनबाग अर्ध्या तासात गुंडाळू शकता तर तुम्ही ते संमेलन सुरू असताना का उधळून लावलं नाहीत? तिथल्या सहभागींना ताब्यात का घेतलं नाही? तुमचा त्यामागचा उद्देश काय होता?
देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर आरोप केला होता, तुम्ही काही मोहल्ल्यांमध्ये जाऊन लॉकडाऊनसंदर्भात योग्य माहिती देत नाही, असं ते म्हणाले होते. तुम्ही म्हणताय की कळवा-मुंब्रा परिसरात बंदचे व्यवस्थित पालन होतं आहे. बंदचं पालन नीट होत असेल तर तुम्हाला तिथे जाऊन वारंवार आवाहन का करावं लागत आहे? तुमच्या ट्विटर टाईमलाईनवरही त्याचे उल्लेख आहेत, या भागांमध्ये बंदचं पालन नीट होत नाही का?
आपल्या घरी लहान मुलाला ताप आला तर आई आरामाचा सल्ला देते. 'विश्रांती घे नाहीतर ताप परत येईल,' असं वडीलधाऱ्यांचं म्हणणं असतं. मी माझ्या मतदारसंघावर मुलाबाळाप्रमाणे प्रेम करतो. ही मुलाखत संपल्यावरदेखील मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे.
मतदारसंघातल्या मशिदी बंद झाल्या पाहिजेत, मतदारसंघातले बाजार बंद झाले पाहिजेत, यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडतोय. त्यात मी तसूभरही दुजाभाव करत नाही.
देवेंद्र फडणवीस हिंदू भागाला मोहल्ले कधीपासून म्हणू लागले? फारच बदल झालेला दिसतोय. कळव्यात हिंदू राहतात, मुंब्यात मुसलमान राहतात, पण दोन्हीकडे माणसंच राहतात. मी मानवतेची सेवा करतो.
कळव्यात 12 क्लिनिक सुरू झाले. हिंदू-मुस्लिम असा भेद मी करत नाही. 80,000 लोकांना जेवण पुरवलं जात आहे. हे जेवण कोण जेवतंय, हे मी पाहत नाही. डॉक्टर कोणाची सेवा करत आहेत मला माहिती नाही. मंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली. काल मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 15,000 घरांची उपलब्धता गृहनिर्माण विभागातर्फे करून देण्यात येईल, असं मी जाहीर केलं.
तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे कारण मी मोदींना बोललो. ट्रंप भारतात आले तेव्हाच पंतप्रधान मोदींनी देशाकडे लक्ष दिलं असतं तर कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा झाला नसता. इंटरनॅशनल फ्लाईट्स आधीच बंद करायला हव्या होत्या. आपण दुर्लक्ष केलं आणि त्याची फळं भोगावी लागत आहेत.
भाजपकडून याला धार्मिक रंग दिला जातोय, असं तुम्हाला वाटतं का?
भारतीय जनता पार्टी ही भारत जलाओ पार्टी आहे. धार्मिक द्वेष, जातीय द्वेष एवढंच त्यांना माहिती आहे. माझं जाहीर आव्हान आहे कळव्यामध्ये येऊन एकातरी महाराष्ट्राच्या वस्त्यांमध्ये हे काम केलंय का भाजपवाल्यांनो ते दाखवा.
भाजप धार्मिक तेढ निर्माण करतं असं तुम्ही म्हणालात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे का? तुमच्या मतदारसंघात कडकडीत बंद पाळला जातो आहे, असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल का?
मी छातीठोकपणे सांगू शकतो की बंदचं पालन केलं जात आहे. जी गर्दी दाखवण्यात आली ती भाजीमार्केटची होती. मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की - भाजीमार्केटची गर्दी पुण्यात होत नाही का? भाजीमार्केटची गर्दी कल्याणमध्ये होत नाही का? दादरमध्ये होत नाही का? नागपुरात होत नाही का?
केवळ एका वर्गाला लक्ष्य करण्यासाठी तुम्ही हे व्हीडिओ व्हायरल करणार असाल आणि त्यातून आपली मानसिकता तयार करणार असाल तर तुमच्याकडे प्रगल्भता नाही, मॅच्युरिटी नाही.
राज्य सरकारमध्ये समन्वय नाही असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. कोणता मंत्री काय करतोय हे इतरांना ठाऊक नसतं. मुख्यमंत्री काय म्हणत आहेत हे मंत्र्यांना ठाऊक नसतं. विविध पक्षांचे नेते आपल्या पक्षप्रमुखांना बांधील आहेत, मुख्यमंत्र्यांप्रति उत्तरदायित्व नाही असं त्यांचा आरोप होता. तुमचं यावर काय म्हणणं आहे?
आम्ही मुख्यमंत्र्यांना उत्तरदायी आहोत. आमचे नेते पवारसाहेब आहेत, संसदीय लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे. ते लोकशाहीचे भक्त आहेत. आम्ही काहीही बोलतो तरी ते आधी सांगतात, 'जितेंद्र, आधी मुख्यमंत्र्यांशी बोल'. आमचं
सरकार म्हणजे भाजपचं ऑटोक्रॅटिक सरकार नाही, जे फॅसिझममध्ये विश्वास ठेवतं. सगळे अधिकार एकाच माणसाकडे हे नरेंद्र मोदीच करू शकतात. हे उद्धव ठाकरे करू शकत नाहीत.
आदिवासी पाडे, ग्रामीण भाग तसंच शहरी भागातही रेशनचं धान्य मिळायला नागरिकांना अडचणी येत आहेत अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाकडे रेशन कार्ड असेलच असं नाही. विशिष्ट कालावधीत शिधा घेतला नसेल तर आता धान्यपुरवठा होणार नाही अशा तक्रारी येत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार काय करतं आहे? लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांना काम नाहीये. मोफत दिलं जात आहे त्यावर त्यांचं घर चालणार आहे. तेही त्यांना मिळत नसेल तर?
खजिना रिता करावा लागला तरी चालेल पण कोणीही माणूस उपाशी राहता कामा नये, यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत पाठपुरावा करू. सर्व रेशनकार्डधारकांना धान्य मिळायला हवं.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांकरता तुमची काही योजना आहे का?
अस्थायी रेशनकार्ड असाही प्रकार असतो. तूर्तास रेशनकार्ड धारकांना पुरेसं धान्यपुरवठा करणं हे उद्दिष्ट असेल.
पक्षाच्या भूमिकेबद्दल प्रश्न आहे. नरेंद्र मोदींनी नऊ तारखेला नऊ वाजता दिवे लावण्याचं आवाहन केलं. त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे सांगितलंत की मी दिवे लावणार नाही. तुम्ही तुमच्या अपेक्षा व्यक्त केल्यात. पण तुमच्याच पक्षातल्या रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलं. तुम्ही केंद्र सरकारवर टीका करताय. तुमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतात की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं पालन करा. तुमच्या पक्षात हा वैचारिक गोंधळ आहे का? का ही तुमच्या पक्षाची रणनीती आहे?
वैचारिक गोंधळ नाही. पक्षाची भूमिका नाही. मोदीसाहेबांनी 22 तारखेला कर्फ्यू पाळायला सांगितला तेव्हा आम्ही त्याचं पालन केलं. मोदी साहेब सांगतात त्याचं आम्ही नागरिक म्हणून पालन करत आहोत. पण ज्या उणिवा आहेत त्याच्याबद्दल बोलायचं नाही का? उणिवा आहेत की नाहीत?
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करायला हवं होतं. आतापर्यंत या चाचण्या सुरी करायला हव्या होत्या. आपल्याकडे टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे. भरपूर टेस्टिंग झालं तर आजारी लोकांवर पटकन उपचार सुरू होऊ शकतील. अंतिम टप्प्यात म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये जाईपर्यंत वाट का पाहायची?
देवेंद्र फडणवीस यांनी आपलं वजन वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टेस्टिंग वाढवण्यासंदर्भात सांगायला हवं. खासदार आपल्या फंडातून मतदारसंघात टेस्टिंगसाठी व्यवस्था केली असती. 10 मिनिटांत कोरोना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे हे सांगणाऱ्या किटला आपण परवानगी देत नाहीयोत. अजून टेंडर अमुक तमुक यातच आपण गुंतलो आहोत. कशाला हवेत टेंडर्स?
राज्य सरकारकडून केंद्र सरकारवर आरोप केले जात आहेत. केंद्र सरकार राज्य सरकारवर आरोप करत आहेत. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची आहे का समन्वयाची आहे? आणि तो समन्वय घडवून आणण्यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं?
सरकारच्या वतीने मोदी साहेबांवर टीका करण्यात आलेली नाही. किंबहुना शांत, संवेदनशील उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत स्वत:ची भूमिका सोडून अन्य गोष्टींबद्दल ते बोलतच नाहीत. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. समन्वयाबद्दल बोलले, रेशनबद्दल बोलले. तुम्ही खाजवणार असाल तर आम्हाला खरूज दाखवावी लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)