You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : उमरखेड ते त्रिची- 7 तरुणांचा घर गाठण्यासाठी 1000 किमीचा पायी प्रवास
- Author, प्रभुराव आनंदन
- Role, बीबीसी तामीळ प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात काम करणाऱ्या तामिळनाडूतील थिरुवरुर आणि नागापट्टणम इथल्या सात तरुणांनी तब्बल हजार किलोमीटरचं अंतर पायी कापत गाव गाठलं आहे.
महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडमधून या 7 तरुणांनी 29 मार्च रोजी चालायला सुरुवात केली. तब्बल आठ दिवसांनंतर रविवारी दुपारी त्रिचीजवळच्या आपापल्या गावांमध्ये ते पोहोचले.
"मी बीएसस्सी (केमिस्ट्री) ग्रॅज्युएट आहे. महाराष्ट्रातल्या उमरखेड इथल्या खाजगी कंपनीत सुपरव्हायजर म्हणून काम करतो. 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाला. उमरखेड परिसरातल्या कंपन्या बंद झाल्या आणि कामगारांना कामावर येऊ नका असं सांगण्यात आलं," असं राहुल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
राहुलसोबत 22 रुममेट्स होते. बाजूच्या खोलीत 46 जण एकत्र राहत होते. त्यातले बहुतांश तामिळनाडूचेच होते. महाराष्ट्र सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी कँप सुरू केला आणि या सगळ्यांना तिथं राहण्यास सांगितलं होतं.
मात्र, राहुल सांगतात, "आम्हाला मराठी येत नाही. त्यामुळे पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधणं अवघड झालं. स्थानिकांनी आम्हाला गावी परत जा, अशी धमकी दिली. त्यामुळे आम्ही स्थलांतरितांसाठी उभारलेल्या कँपमध्ये राहू शकलो नाही."
"याव्यतिरिक्त महाराष्ट्रात कोरोना व्हायरस केसेसची संख्या वाढत चालली होती. आम्हालाही कोरोनाचा संसर्ग होईल अशी भीती वाटू लागली होती. त्यामुळेच आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला. घरी सुरक्षित पोहोचणं हेच आमचं उद्दिष्ट होतं," राहुल सांगतो.
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
लॉकडाऊनमुळे घरी जाण्यासाठी बस, ट्रेन काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातल्या त्या कँपमधून 50 जणांनी चालायला सुरुवात केली. आपल्याला वाटेत पोलीस अटक करतील अशी भीती काहीजणांना वाटली, त्यामुळे काहीजण तिथेच थांबले.
"कँप सोडल्यावर आम्ही नांदेडच्या दिशेने चालायला सुरुवात केली. उमरखेडहून नांदेड अंतर 240 किलोमीटर आहे. तिथून आम्ही सोलापूरला आलो. सेलम जिल्ह्यातून आम्ही तामिळनाडूत प्रवेश केला. 1,000 किलोमीटरचं अंतर चालत आम्ही त्रिचीत घरी पोहोचलो", असं राहुलने सांगितलं.
"चालत असताना अनेकदा पोलिसांनी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थांबवलं. जवळच्या रिलीफ कँपमध्ये राहण्याची विनंती केली. परंतु आम्हाला घरीच जायचं होतं. स्थानिकांनी आम्हाला तामिळनाडूत प्रवेश करायला मदत केली. चालत असताना सगळीकडे बंद दुकानं, मार्केट दिसत होते. चालत असताना सरकारी कँप किंवा स्वयंसेवी संस्थांकडून आम्हाला खायला मिळालं," असं राहुलने सांगितलं.
फक्त दोन दिवसांची झोप
"काही ठिकाणी दुकानं उघडी होती. तिथून आम्ही ब्रेड, बिस्किटं घेतली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. या प्रवासादरम्यान दोन दिवस आम्हाला झोपायला मिळालं. बाकी दिवशी न झोपता आम्ही चालतच होतो.
"पहिल्या दिवशी चालून आम्ही खूप दमलो. मग चालताना आम्ही गप्पा, गोष्टी करू लागलो. चांगल्या गोष्टींबद्दल बोलू लागलो, जेणेकरून निराश वाटणार नाही. हजारभर किलोमीटरचं अंतर आम्ही कसं पार केलं, याचं आम्हालाही आश्चर्य वाटतं", अशी आठवण राहुल सांगतो.
तो पुढे म्हणाला, "आम्ही आमच्या पालकांना कसे आलो याबाबत सांगू शकत नाही. लॉकडाऊनमध्ये आम्ही चालत इथवर पोहोचले हे कळलं तर त्यांना काळजी वाटेल. उमरखेड कँपमध्ये आहोत असंच आम्ही दररोज घरच्यांना सांगायचो.
"या प्रवासादरम्यान मोबाईल बॅटरीने त्रास दिला. जेव्हा आमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत असे तेव्हा आम्ही रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकवाल्यांची मदत घेतली. त्यामुळे दिवसातून एकदा घरच्यांशी बोलणं व्हायचं, त्यानंतर फोन स्विच ऑफ व्हायचा. काही ठिकाणं पार करताना आमच्या मनात धाकधूक होती. आम्हाला फक्त घर दिसत होतं. त्यामुळे घरी पोहोचण्यासाठी जे करावं लागेल ते करायचं हे आम्ही ठरवलं."
ही तरुण मुलं त्रिचीला पोहोचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते अरुण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितली.
"डोक्यावर सामान घेतलेली, दमलेली मुलं त्रिची-चेन्नई हायवेवर मी पाहिली. मी त्यांच्याशी बोललो तेव्हा महाराष्ट्रातून इथवर चालत आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्याने मला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून तामिळनाडूत येताना जीव गमावलेला तरुण आठवला. ही मुलं अशीच चालत राहिली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात आलं. मी प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या मित्रांशी बोललो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी याची कल्पना दिली. ही मुलं नक्की कुठे आहेत, कधीपर्यंत पोहोचतील हे सांगितलं," असं अरुण म्हणाले.
"या मुलांना वाहनाने नेण्याची मला परवानगी मिळाली. मी त्या सगळ्यांना थिरुवरुर इथल्या सरकारी रुग्णालयात नेलं. त्या सगळ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे या सगळ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे," असं अरुण यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)