You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा रेड लाईट एरियालाही विळखा
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसीसाठी, कोलकत्याहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आशियातला देहविक्रीचा सगळ्यात मोठा बाजार असलेल्या कोलकात्यातील सोनागाछीमध्ये कधीच शांतता नसते. पण कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर इथंही भयाण शांतता पसरलीय. दिवस आणि रात्र एकसारखेच झालेत.
इथे राहाणाऱ्या सेक्सवर्कर्सवर उपासमारीची वेळ आलीय. अनेकजणी स्वतःच्या घराचं भाडंही देऊ शकत नाहीत.
कोलकातामधील सेक्सवर्कर महिलांची संघटना असणाऱ्या दुर्बार महिला समन्वय समितीचं म्हणणं आहे की, "आधी इथे रोज 40 ते 50 हजार ग्राहक यायचे. पण आता त्यांची संख्या 500 पेक्षाही कमी झालीय."
या देहव्यापारामुळे अनेक महिलांचं पोट भरायचं. त्यांचंच नाही तर हजारो एजंट, रिक्षावाले आणि दुकानदारांनाचीही उपजीविका त्यामुळे चालायची. पण आता त्यांचेही व्यवसाय ठप्प झालेत.
या भागातल्या घरांची भाडी 5000 ते 75 हजार इतकी आहेत. पण आता दोन वेळेच्या जेवणाचाच प्रश्न उभा राहिल्याने घरभाड्याचा विचार करणार तरी कोण? कोरोना व्हायरसने सतत गजबजलेल्या असणाऱ्या या भागाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
कोरोनाबद्दल अधिक माहिती-
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कलम 144 म्हणजे नेमकं काय?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
'संसर्गापासून संरक्षणाचा उपाय नाही'
पश्चिम बंगालमधल्या देहविक्री करणाऱ्या जवळपास 5 लाख महिलांसमोर जगायचं कसं, हा प्रश्न उभा राहिला आहे.
सोनागाछी भागात जवळपास 11 हजार महिला राहातात. याशिवाय कोलकाताला लागून असणाऱ्या उपनगरांमधून 3000 महिला इथे येतात, पण त्या इथे राहात नाहीत.
दुर्बार महिला समन्वय समितीच्या अध्यक्ष विशाखा लस्कर सांगतात, "लोकांमध्ये कोरोनामुळे भयाचं वातावरण आहे. लोक या भागात पाऊलही ठेवत नाहीत. संसर्गाच्या भीतीने इथल्या महिलांनीही सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसणाऱ्या अनेक ग्राहकांना नाही म्हटलंय.”
संस्थेशी संबंधित असणाऱ्या महाश्वेता मुखर्जी सांगतात की, “ग्राहकांची संख्या खूप कमी झालीय. इथल्या महिलांना ना मास्क मिळत आहेत ना, संसर्गापासून सुरक्षित राहाण्याचे इतर काही उपाय त्यांच्याकडे आहेत. रस्त्यांवर भयाण शांतता पसरली आहे.”
ही संस्था देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये कोरोनोविषयी जनजागृती व्हावी म्हणून अभियान चालवत आहे. इथल्या अनेक महिलांकडे मतदार ओळखपत्र आहे आणि निवडणुकांच्या काळात राजकीय नेते त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांची मतं निर्णायक ठरतात.
घरी पैसै कसे पाठवणार?
इथे देहविक्री करणाऱ्या बबिता (बदललेलं नाव) म्हणतात, "दोन वेळेची भाकरीही मिळत नाहीय. हीच परिस्थिती कायम राहिली तर मी घरी पैसे कसे पाठवणार?"
कोलकाताच्या वाटगंज भागात चालणाऱ्या रेडलाइट एरियात अशीच परिस्थिती आहे.
तिथली आणखी एक देहविक्री करणारी महिला सांगते की, "मी आजतागायत अशी परिस्थिती पाहिली नाहीय. माझ्याकडे आधी रोज चार ग्राहक यायचे, आता तर कित्येक दिवसांपासून इथे कोणी फिरकलं नाहीय. होळीपासून इथे हीच परिस्थिती आहे."
'या महिला उपाशी मरतील'
दुर्बार महिला समन्वय समितीचे संस्थापक आणि प्रमुख सल्लागार डॉ. समरजित जाना सांगतात की, "परिस्थिती खूपच गंभीर आहे. इथल्या महिलांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. महिला भीतीपायी ग्राहकांना सांगत नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे त्यांचं मोठं नुकसान होतंय."
जाना पुढे सांगतात की अशी परिस्थिती त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पाहिली नाही. "देहविक्रय करणाऱ्या अनेक महिला त्यांच्या लांबलांबच्या नातेवाईकांकडे निघून गेल्या आहेत. सरकारने त्यांची मदत केली नाही तर त्या उपाशी मरतील."
जाना यांनी या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी सरकारने जेवणाचा बंदोबस्त करावा यासाठी सरकारला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अजून या विषयावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण खाद्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "सरकार सध्या अस्तित्वात असणाऱ्या नियमांतर्गत विशेष परिस्थितीत या महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करू शकते, पण याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून आहे."
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री शशी पांजा म्हणतात, "सरकार सोनागाछीमध्ये राहाणाऱ्या महिलांना जेवण पुरवण्याचा विचार करत आहे."
दुर्बार महिला समन्वय समितीच्या सचिव काजल बासू सांगतात, "या महिलांचा व्यवसाय पूर्ण ठप्प पडला आहे. इथल्या सगळ्यांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. इथे ग्राहक येत नाहीत आणि मोटरसायकलवर कोणी आलंच तर पोलीस त्यांना लाठ्या मारून पळवून लावत आहेत."
पैसै नसल्यामुळे इथल्या महिला घराचं भाडंही भरू शकत नाहीत. संस्थेने घरमालकांना भाडं माफ करण्याची विनंती केली आहे.
काजल म्हणतात की परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर सोनागाछीचं नाव इतिहासाच्या पानांत लुप्त होईल.
"किती दिवस या महिला उपाशी राहतील? इथल्या महिलांना आपलं कुटुंब चालवायचं आहे आणि आपल्या मुलांना शिकवायचंही आहे. यांची कमाई बंद झाली तर यांचं काय होईल?" असे सवाल काजल उपस्थित करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)