You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : महाराष्ट्रात कर्फ्यू आणि उद्धव ठाकरेंच्या 10 महत्त्वाच्या घोषणा
संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या हालचाली पूर्णपणे बंद होणार आहेत. आता कोरोनाशी लढा निर्णायक टप्प्यावर आलाय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
त्यांनी केलेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा आणि मांडलेले मुद्दे:
- आजपासून राज्यभरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू. संचारबंदी म्हणजे काय?
- आता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
- खासगी वाहनं, बसेस यांची वाहतूक बंद. टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहनं फक्त अत्यावशक सेवांसाठीच चालतील.
- कोरोना विषाणूशी सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर आलाय. हा टर्निंग पॉइंट आहे.
- आत्ता रोखू शकलो नाही तर जगभर घातला तसा थैमान कोरोना विषाणू आपल्या इथे घालेल.
- जीवनावश्यक वस्तू - अन्नधान्य, औषधं, बेकरी, दवाखाने, पशुखाद्य, बियाणं इत्यादी दुकानं/सेवा सुरू राहणार.
- राज्यातली सर्व प्रार्थनास्थळं बंद - पुजारी पूजा करू शकतील, पण लोक जाऊ शकणार नाहीत.
- अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांना प्रशिक्षण दिलं जातंय.
- घाबरून जाऊ नका. सर्वांनी मिळून या संकटावर मात करायची आहे. संकट आटोक्यात आहे. आटोक्यात ठेवायचं असेल तर या गोष्टी टाळाव्या लागतील.
- थाळ्या वाजवल्यामुळे व्हायरस जात नाही. ते आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतोय. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडणं काही दिवस बंद करावं लागेल.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यसचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, विषाणुच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावे, मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्याप्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका
'मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे', या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
कामाची विभागणी करा
मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)