पुण्यात एस पी कॉलेज रोडवर लागलं 'उसको भेजो कब्रस्तान'चं पोस्टर : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या वर्तमानपत्रातील आणि वेबसाईटवरील प्रमुख बातम्या

1. ... उसको भेजो कब्रस्तान पोस्टरमुळे वाद

CAA आणि NRC कायद्याविरोधात बंगळुरूमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची रॅली झाली होती. या रॅलीत अमूल्या नावाच्या मुलीने 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. तिच्या घोषणा देतानाच्या फोटोसह 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान' असा मजकूर असलेलं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

बंगळुरूमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अमूल्या लियोना नोरोन्हा हिने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. निखिल पवार यांनी हे होर्डिंग ट्विट करून पुणे पोलिसांचं लक्ष वेधलं. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.

होर्डिंग्जच्या ट्विटची पुणे पोलिसांनीही दखल घेतली आहे. त्यांनी निखिल पवार यांना उत्तर दिलं आहे. "तुमची तक्रार मिळाली आहे. आम्ही हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडं वर्ग करत आहोत. संबंधित पोलीस याची चौकशी करून आवश्यक कारवाई करतील," असं पोलिसांनी म्हटलं आहे.

2. कोरोनाने जगाला धडा शिकवला - डॉ. प्रकाश आमटे

"वन्यप्राण्यांचे जतन आणि संवर्धन याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. हौस म्हणून आपण काय काय खाणार आहोत? कोरोना व्हायरस कोणत्या प्राण्यातून आला आहे, हे अजून कळलेलं नाही. जगाचा नाश करायला एक विषाणू पुरेसा आहे. कोरोनाने जगाला धडा शिकवला. आता तरी आपण जागे होणार आहोत का," असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी उपस्थित केला.

निसर्गाचा समतोल न साधल्यास ऑस्ट्रेलियातील जंगल जळण्यासारखे प्रकार आपल्याकडे घडायला वेळ लागणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

राजहंस प्रकाशनातर्फे टेरी इरविन यांनी लिहिलेल्या आणि सोनिया सदाकाळ काळोखे अनुवादित स्टीव्ह आणि मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी झाला. त्यावेळी डॉ. आमटे बोलत होते.

3. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिचा छळ करण्यात येत होता. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

4. अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पोलिसात तक्रार

'नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क,' असं वाक्य अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावर आक्षेप घेत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दिली आहे. तसंच लवकरात लवकर तिने माफी मागत ही पोस्ट डिलीट करावी, अशी मागणीही केली आहे.

'आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,' असं म्हणत अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी राज्यभरातील दलित बांधव बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र याविषयीच पोस्ट केल्याने केतकी चितळेवर टीका होते आहे. 'लोकमत न्यूज 18'ने ही बातमी दिली आहे.

5. आजपासून दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणाऱ्या दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल ७० टक्क्यांपर्यत घसरल्याने यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून, ८० गुण लेखी परीक्षेसाठी; तर २० गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नप्रत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणे राहणार असून, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. राज्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होईल. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेत ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा राज्यातून ११० तृतीयपंथी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ४९७९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यापैकी ८० संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)