'थप्पड'ने लगावली मानसिकतेला थप्पड

    • Author, मनीषा पांडेय
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

हे 'थप्पड' चित्रपटाचं परीक्षण नाही. फक्त चित्रपटातून काही प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न मला भेडसावत राहिले, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत त्या प्रश्नांनी मनात काहूर माजवलं. असा प्रश्न जो सगळ्यांनी झाकला, जणू तो प्रश्नच नव्हता.

ही साधारण 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या नात्यातल्या एका व्यक्तीचं लग्न होतं. एका रात्री छान नाच-गाणं झालं. बराचवेळ हा आनंदोत्सव सुरु होता. हे सगळं सुरू असताना माझा भाऊ रागारागाने तिथे आला आणि त्याने वहिनीला जोरदार थप्पड लगावली.

त्या गोंधळात त्या थपडेचा आवाज इतका जोरात आला जणू कुणी गोळीबारच केला. हॉलमध्ये स्मशानशांतता पसरली. गाणं बंद झालं. सगळे चिडीचूप झाले. अचानक संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व लोक तिथून गायब झाले.

दुसऱ्या दिवशी सगळं पूर्ववत झालं. सगळे आनंदात होते. लग्नसमारंभ सुरु झाला. घरातल्या सगळ्या बायका पुरुष त्या आनंदात न्हाऊन निघाले. आदल्या रात्रीची घटना त्यांनी मनाच्या पटलावरुन गायब करुन टाकली होती.

मात्र त्याचे व्रण राहिले. अगदी मनातच नाही तर माझ्या वहिनीच्या गालावरही ते वळ उठले होते. माझा भाऊ चांगला धष्टपुष्ट होता. त्यामुळे वहिनीचा गाल चांगलाच सुजला होता. डोळ्याच्या खाली काळं वर्तुळं होतं.

त्याचा परिणाम असा झाला की ताईच्या लग्नात वहिनीचा एकही फोटो नव्हता. अगदी चुकूनही त्या घटनेचा उल्लेख केला नाही.

आईच्या मते त्या रात्री वहिनीचं हसणं खिदळणं दादाला आवडलं नाही. तिचा त्या लग्नातील फोटो त्या घटनेच्या आधीचा होता. मात्र वहिनीला कानशिलात लावण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न कुणाच्याही मनात आला नाही.

जुना इतिहास

देशाच्या इतर कुटुंबासारखंच आमच्या कुटुंबातही अशा प्रकारच्या मारहाणीचा इतिहास जुना आहे. ही नवीन गोष्ट नाही आणि फार मोठी गोष्टही नाही.

आमच्याकडे मारहाणीचा इतिहास भिंतीवर लागलेल्या पाण्याच्या डागासारखंच जुनं आहे. त्यावर आमच्या घरच्या बायका फक्त हसून पडदा टाकत आहेत.

वरणात मीठ कमी झालं तर कानशिलात लगावली. बाईने उलट उत्तर दिलं तर दिली थोबाडीत. कोणतीही गोष्ट पुरुषांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर थप्पड ठरलेलीच.

ती कशामुळेही मिळायची. त्याचं कोणतंच विशिष्ट कारण नव्हतं. गोष्ट फक्त विशेषाधिकाराची होती.

पुरुषांना तो अधिकार होता. त्याला तो दिला होता आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्याने सुरक्षित राखला होता. कानशिलात लगावणारे प्रश्न विचारत नाहीत. कानशिलात खाणाऱ्यांनीही प्रश्न विचारला नाही, कारण प्रश्न विचारला तर जाणार कुठे?

मोठा प्रश्न

प्रत्येक घरात कानशिलात लगावली जात आहे, मात्र एका थपडेमुळे घरातली महिला निघून गेली तर ती जाणार कुठे?

नॉर्वेच्या नाटककार हेन्रिक इब्सनच्या नोरा यांनी थप्पड न खाताच पती हेल्मर यांचं घर सोडून दिलं. कारण घरात आपली प्रतिमा एका बाहुलीपलीकडची नाही हे तिच्या लक्षात आलं.

इब्सन यांनी डॉल्स हाऊस हे नाटक 1879 मध्ये लिहिलं होतं. हेच नाटक पुढे स्त्रीवादी विचारांचं प्रतीक झालं. त्या काळातल्या लोकांची नाटकाबद्दल प्रतिमा अशी होती की नवरा बायकोला मारहाण करत नाही, त्याचं कुठेही अफेअर नाही, तो गुन्हेगार नाही. मग नोराला काय अडचण आहे?

ही मुलगी जास्तच नाटकं करत आहे असं चित्रपटाच्या मध्यंतरादरम्यान माझ्या बाजूला बसलेली दोन मुलं आपापसात बोलत होते. नवरा तर चांगला आहे. हे वागणं अति आहे.

गंमतीची गोष्ट अशी की दोन्ही मुलं एकेकटे चित्रपट पाहायला आले होते. त्यांच्याबरोबर बायको किंवा गर्लफ्रेंड नव्हती. हा चित्रपट बायको किंवा गर्लफ्रेंडला दाखवावा का याची रेकी करायला तर आले नसावेत...

इब्सन यांची गोष्ट नोराने घर सोडल्यानंतर संपली. त्यानंतर नोराचं काय झालं हे कुणालाच ठाऊक नाही. नोराकडे स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षण होतं? नोराच्या वडिलांनी संपत्तीतला अर्धा वाटा तिच्या नावावर केला का? असं एखादं घर होतं का जिथे ती हक्काने जाऊ शकेल, उपजीविका कमावू शकेल.

मि. हेल्मर सधन होते. नोराची ओळख मिसेस हेल्मर अशीच होती. ही ओळख सोडली तर तिच्याकडे असं काय होतं जे शिल्लक राहिलं होतं.

नोराची पुढची गोष्ट 2004 मध्ये साहित्याचं नोबेल पुरस्कारप्राप्त ऑस्ट्रियन लेखिका एल्फ्रिडे येलेनिक यांनी लिहिली. 1982मध्ये त्यांनी एक नाटक लिहिलं. 'व्हॉट हॅपन्ड अफ्टर नोरा लेफ्ट हर हजबंड' असं त्या नाटकाचं नाव होतं.

येलेनिक सांगतात की नोराने फक्त पतीचं घर सोडलं नाही. तिने असं ठिकाण सोडलं जिथे तिला मान होता, जिथे ती सुरक्षित होती.

त्यांच्या भरलेल्या संसारातून पतीचं घर सोडलं तर काम आणि मान मिळेल अशी जागाच नव्हती. वडिलांच्या घरीही हे मिळत नव्हतं. वडिलांच्या संपत्तीत कोणताही हिस्सा नव्हता. येलेनिक यांच्या नोराचा शेवट फॅक्टरीत काम करणारी आणि नंतर एका श्रीमंत माणसाची बायको होण्यात होतो.

गोष्टीत अनपेक्षित वळणं आहेत. जागोजागी रुढीवादी पुरुष प्रजासत्ताक व्यवस्थेचे पालन करणारे तिच्यावर कटाक्ष ठेऊन होते. एकट्या बाईला पाहिल्यावर प्रत्येक पुरुष संधी मिळायच्या प्रतीक्षेत असतात. प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न आहे- तू बाई आहेस, ते ठीक आहे. तू कोणत्या पुरुषाची बाई आहेस? जी बाई पुरुषाविना आहे, त्या बाईला प्रत्येक पुरुष आपल्याचा बापाचा माल समजतो.

इब्सनने नोराला घरातून बाहेर तर काढलं मात्र तू आता काय करणार हे विचारलं नाही. कुठे जाशील, काय करशील याबाबत उल्लेखच नाही. येलेनिकने सांगितलं तिच्याकडे शिक्षण नाही, कोणत्याही ठिकाणी काम करण्यासाठी समानता असेल अशी जागा नाही.

कोर्ट-कचेरीच्या कागदपत्रांवर पुरुषांच्या नावाने चालणाऱ्या संसाराच्या मालमत्तेत तिचा वाटा नाही. ती कुठे जाणार? काय करणार? 1982 मधल्या ऑस्ट्रियात विचारले गेले होते.

हा प्रश्न 2020च्या भारतात मी विचारत आहे. माझी वहिनी थप्पड खाल्ल्यानंतर घरातून बाहेर पडली असती तर कुठे गेली असती? तिच्या वडिलांची शेकडो एकर जमीन होती. मात्र त्यातली तिला सुईच्या अग्रावर एवढी देखील मिळाली नसती.

शेकडो एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर आहे. मात्र बायकोच्या नावे काहीच नाही. पैसा, सुखसोयी सगळं काही आहे. आरामाचं आयुष्य आहे. सिल्रच्या साड्या, भरजरी दागिने सगळं काही आहे. पण हे लक्षात घ्यायला हवं की अमुकची बायको आहे म्हणून हे वैभव मिळालं आहे.

महिला मारहाण का सहन करत आहेत?

पत्नी म्हणून दर्जा काढून घेतला तर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. परिस्थिती बदलली तर कानशिलात लगावायला जराही वेळ लागत नाही. सगळ्या घरातल्या माणसांसमोर, गोतावळा जमलेला असताना तुमच्या चेहऱ्याला तडाखा बसू शकतो. गाल सुजला तर बर्फाने शेका. थोड्या वेळात सगळं काही ठीक होईल.

खरा प्रश्न हा नाहीये की महिला मार खात आहेत हा नाही. महिला का मार खात आहेत? हा सवाल आहे. काय केलं तर महिलांना अशा माराला सामोरं जावं लागणार नाही. काय बदलेले जेणेकरुन त्यांना भीती वाटणार नाही, त्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहतील, अन्य कोणापेक्षाही त्या स्वत:ला सुरक्षित राखू शकतील, अन्य कोणापेक्षाही स्वत:चा सन्मान त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल.

या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत. ट्रेलर किंवा प्रमोशनचे व्हीडिओ पाहून वाटतं, हा चित्रपट अमृताने खाल्लेल्या थपडेविषयी नाहीयेच. हा चित्रपट वडिलांबद्दल आहे. हा चित्रपट त्या घराबद्दल आहे, जिथे तिचा जन्म झाला, मोठी झाली, जिथे तिचे वडील राहातात, आई आहे.

एखाद्या मुलीच्या आयुष्यात वडील हे केवळ बाबाच नसतात. तिच्या आयुष्यात येणारा तो पहिला पुरुष असतो. तोच शिकवतो की पुरुष रागीट असतो, प्रेमळ असतो. पुरुष आदेश देतो की कामात हातभार लावतो? पुरुष अधिकार गाजवतो तर की स्वत:चं मीपण सोडून देतो? पुरुष हात उचलतो का उगारलेला हात रोखतो?

तो घरात शिरताच सगळे बिळात उंदीर लपावेत तसे लुप्त होतात किंवा त्याच्या कुशीत सामावतात. तो त्याचे निर्णय ऐकवतो का तुमच्या निर्णयामागे ठामपणे उभा राहतो? तो प्रेम करतो का अहंकार दाखवतो? तो धमकी देतो का आधार देतो? तो आशास्थान आहे का भीती वाटावा असा आहे?

मुलींना विश्वास त्याच्याकडूनच मिळतो, त्यांना भीती वाटण्याची जाणीव तिथूनच होते.

अमृतानेही विश्वास तिथूनच मिळवला आहे. ती लढते कारण ती इब्सनची नोरा नाहीये. तिच्याबरोबर तिचे वडील आहेत. बाकी लोकांची विचित्र नजर तिच्यावर असताना, उलटसुलट प्रश्न विचारले जात असताना, धमकावलं जात असताना. वडीलच आहेत जो सगळ्या परिस्थितीत तिच्यामागे ठामपणे उभे राहतात.

खरंतर हा चित्रपट हिंसेबद्दल नाही. हा चित्रपट मुलगी आणि बापाच्या नात्याबद्दल आहे. हा चित्रपट तुमच्या मुलीबद्दल आहे, जे आता हे वाचत आहेत. अशी मुलीबद्दल आहे जिचे तुम्ही बाप होऊन आनंदी व्हाल.

माझ्या बाजूला बसलेल्या दोन मुलांप्रमाणे चित्रपट पाहण्यासाठी बरीच माणसं एकेकटी आली होती. मुली-मुली होत्या, मुलं-मुलं होती. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन आले नव्हते. नवरा बायकोला घेऊन आला नव्हता. मी तुमची भीती समजू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर भीती वाटण्यासाठी पुरेसा होता.

हो, एक थोबाडीत पुरेशी आहे. मात्र ती मारु शकत नाही.

आता एक थपडेसाठी मुली नाती तोडू लागल्या तर या देशातले नातेसंबंध शाबूत राहणं अवघड होईल. ही भीती तुमचीही आहे, ज्यावर चित्रपटाने बोट ठेवलं आहे आणि तुम्हाला कानकोंडलं वाटू लागलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)