OSCAR : तुम्ही कधी पॅरासाईट म्हणून राहिला आहात? मग हे नक्की वाचा

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पॅरासाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर जाहीर झाला आहे. पॅरासाईट... शब्द उच्चारला तरी कृतीचा भास झाला ना.

एखाद्याच्या खोलीवर पॅरासाईट म्हणून आपण राहिला असाल तर हे वाक्य वाचताना नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू फुटलं असेल याची आम्हाला खात्री आहे.

मग कधीतरी विश्वास सरपोतदार (अशी ही बनवाबनवी फेम) सारखे घरमालक किंवा वॉर्डनची धाड पडली की धावपळ होते आणि मग जगातली अशक्य कारणं सांगितली जातात.

दक्षिण कोरियातील अशाच एका घरात राहणाऱ्यांवर बेतलेल्या पॅरासाईट या चित्रपटाला ऑस्कर जाहीर झाला आहे. दक्षिण कोरियातील अतिशय बंदिस्त अपार्टमेंटमध्ये आणि त्याचवेळी एका ऐसपैस फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाची ही कथा आहे. कथा जरी काल्पनिक असली तरी फ्लॅट नक्कीच काल्पनिक नाही. बीबीसीने अशाच एका फ्लॅटमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

राजधानी सोलमधील बन्जिहा फ्लॅट (अत्यंत छोटी घरं) मध्ये ओह-की-चिओल नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्या घरात अजिबात सूर्यप्रकाश नाही. तिथे इतका कमी प्रकाश येतो की तिथली झाडंही जगत नाहीत.

खिडकीतून डोकावलं तरी त्यांचा फ्लॅट दिसतो. त्या फ्लॅटच्या बाहेर काही तरुण सिगारेटी ओढतात, आणि खाली थुंकतातही.

उन्हाळ्यात त्यांना दमट हवामानाचा प्रचंड त्रास होतो. तसंच वेगाने वाढणारं शेवाळं हाही त्यांच्या चिंतेचा विषय असतो.

त्यांच्या बाथरुमला सिंक नाही. जमिनीवरून अवघ्या अर्धा मीटर अंतरावर ते बांधलं आहे. बाथरुमचं छप्पर इतकं लहान आहे की त्यांना पाय पसरून उभं रहावं लागतं जेणेकरून डोकं भिंतीला लागणार नाही.

"मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा माझं डोकं सारखं छपराला भिडायचं. अगदी हात उंचावला तरी जखम व्हायची." चिओल सांगतात. ते एका लॉजिस्टिक्स कंपनीत काम करतात.

आता मात्र सवय झाली असल्याचं ते म्हणतात. "आता दिवे कुठे आहेत आणि भिंती कुठे आहेत ते चांगलंच कळलंय."

प्रसिद्ध दिग्दर्शक बाँग जूम बो यांनी पॅरासाईट चित्रपटातून आहे रे आणि नाही रे गटातील तफावत दाखवली आहे.

पॅरासाईट चित्रपटात पार्क नावाचं कुटुंब अतिशय श्रीमंत असतं आणि किम गरीब. दोन्ही कुटुंबांची उदाहरणं देऊन हा संघर्ष पडद्यावर दाखवला आहे. त्यातलं एक घर सोल शहराच्या एका टेकडीवर असतं आणि दुसरं घर एका पार्किंगमध्ये असतं.

वास्तविक पाहता बन्जिहा पद्धतीत हजारो युवक राहतात आणि जीवनमान सुधारावं यासाठी अहोरात्र कष्ट करतात.

बन्जिहा सोल मधील वास्तूरचनेचाच भाग नाही तर त्यामागे एक इतिहास आहे. या जागांचा इतिहास अनेक दशकं जुना आहे. त्याची मुळं अगदी उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या संघर्षात आहे.

1968 मध्ये उत्तर कोरियाचे कमांडो तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग ही यांची हत्या करायला आले होते. हा कट फसला. मात्र त्यानंतरही अशा हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या. म्हणून 1970 मध्ये दक्षिण कोरियाने त्यांच्या अधिवास धोरणात सुधारणा केल्या. लोकांना लपता यावं म्हणून कमी उंचीचे छप्पर असलेली घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरुवातीला बन्जिहा भाड्याने देणं बेकायदेशीर होतं. मात्र 1980 मध्ये घरांचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा ही घरं नियमित करण्यात आली.

2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या लक्षात आलं की दक्षिण कोरिया ही जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तरीही सामान्यांच्या आवाक्यातील घरं ही एक मोठी अडचण आहे. विशेषत: तरुण किंवा गरीबांसाठी.

गेल्या दशकात पस्तिशीच्या घरातील लोकांच्या उत्पन्नाचा 50 टक्के भाग घरभाडं भरण्यात जात होता. अशा प्रकारच्या घरात राहणं हा काही जणांसाठी कलंक समजला जायचा.

"मी माझ्या फ्लॅटमध्ये खूश आहे. मी पैसे वाचावेत म्हणून ही जागा घेतली आणि माझी खरंच बचत होत आहे. मात्र अजूनही लोक माझी कीव करतात " ओह-की-चिओल सांगतात.

कोरियात घर आणि कार असणं हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जातं. तिथे राहणं म्हणजे दारिद्र्य असल्यासारखंच आहे. त्यामुळे जिथे मी राहतो त्यावरून लोक मला ओळखतात असं ते पुढे म्हणाले

पॅरासाईट चित्रपटात एक प्रसंग आहे. त्यात गरीब असलेलं किम कुटुंबिय पार्क कुटुंबियांकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा पार्क कुटुंबियातील एका सदस्याला लक्षात येतं की किम कुटुंबातील लोकांच्या अंगाला विशिष्ट वास येत आहे.

जेव्हा किम कि-टाएक जेव्हा तो वास घालवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची मुलगी थंडपणे म्हणते, "हा बेसमेंटचा वास आहे. जोपर्यंत ही जागा सुटत नाही तोपर्यंत हा वास जाणार नाही."

पार्क यंग जून 26 वर्षीय फोटोग्राफर आहे. तो बन्जिहा मध्ये रहायला गेल्यावर हा चित्रपट पाहिला. जागा आणि ऐपत या दोन गोष्टी ध्यानात ठेवून त्याने हा फ्लॅट घेतला.

या उन्हाळ्यात त्याने अनेक सुगंधाच्या काड्या जाळल्या आणि दमटपणा कमी करण्याचं यंत्र सतत सुरू ठेवलं. थोडंबहुत का होईना पण आपला फ्लॅट सजवण्याचं समाधान त्याला मिळालं.

"मी कुठे राहतो यावरून लोकांनी माझी कीव करावी असं मला वाटत नव्हतं." तो सांगतो.

पार्क आणि त्याची गर्लफ्रेंड शिम मिन यांनी त्याबाबत एक व्लॉगही (Video blog) तयार केला आहे.

आम्ही आमच्या जागेत खूश आहोत असं ते सांगतात.

"माझ्या पालकांनी जेव्हा पहिल्यांदा माझी जागा पाहिली तेव्हा ते निराश झाले. माझ्या आधीचा भाडेकरू खूप सिगारेट प्यायचा. त्याच्या धुराचा वास माझ्या आईला सतत येत असे." तो सांगतो.

त्याच्या गर्लफ्रेंडला तिथे राहण्याचा निर्णय अजिबात पटला नव्हता.

"बन्जिहा या संकल्पनेबाबत माझ्या मनात अतिशय नकारात्मक भावना होत्या. ते सुरक्षित नव्हतं. त्यामुळे मला शहराची काळी बाजू आठवली. मी कायम उंच इमारतीत राहिले. त्यामुळे मला माझ्या बॉयफ्रेंडची काळजी वाटायची."

त्या दोघांच्या व्हीडिओला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

"आम्हांला आमचं घर आवडतं आणि आम्ही जे केलं त्या आम्हाला अभिमान आहे. याचा अर्थ आम्ही इथेच राहू असा नाही. आम्ही जाऊ तिथे रहायला."

ओह-की-चिरोल त्याच्या नवीन घरासाठी पैसे साठवत आहेत. त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)