नितेश राणे: काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी 'हिजडे' म्हटलं होतं

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सावरकरांबाबत केलेली सगळी जुनी वक्तव्ये मी मागे घेतो. मला देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मी ती भूमिका मांडली होती. पण याविषयी खोलात जाऊन तपास केला. माहितीची पुन्हा पुन्हा पडताळणी केली. तेव्हा देशभक्त असावा तर सावरकर यांच्यासारखा, असं आपलं मत बनल्याचं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडला होता. पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमांकडे बोट दाखवत हा प्रस्ताव फेटाळला.

या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना शिवसेनेने नितेश राणे यांच्या जुन्या ट्वीटकडे बोट दाखवत भाजपला सर्वप्रथम राणे यांची भूमिका जाणून घेण्यास सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी नितेश राणे यांची मुलाखत घेतली.

ही मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात पुढीलप्रमाणे...

प्रश्न - सावरकरांच्या मुद्द्यावर गोंधळ झाला आणि तुमचं नाव घेऊन तुमचं त्यांच्याबाबत काय मत आहे, हे विचारण्यास सांगितलं होतं? आता तुमचं सावरकरांबद्दल काय मत आहे?

नितेश राणे - खरंतर, माझी भूमिका शिवसेनेच्या पूर्वीच्या आणि आताच्या भूमिकेप्रमाणेच बदललेली आहे. सावरकरांबद्दल माझा अभ्यास आणि माझी माहिती कमी होती. कमी माहितीच्या आधारे मी माझी भूमिका मांडली होती. ती चुकीची होती आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण आता मी सावरकरांचा बऱ्यापैकी अभ्यास केला आहे.

काल सावरकरांच्या गौरवाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडलाच आहे. हा प्रस्ताव जर शिवसेना स्वीकारणार असेल, तर त्यांना मी माझं मत प्रामाणिकपणे सांगू शकतो.

प्रश्न - तुम्ही सावरकरांनी चारवेळा माफी मागितली, असं ट्विट केलं होतं. आता तुम्ही तुमचं मत बदललं आहे, असं सांगत आहात. तर कशामुळे तुमची भूमिका बदलली? तुम्ही तुमची मागची वक्तव्ये मागे घेणार का?

नितेश राणे - होय, मी माझी सगळी वक्तव्ये मागे घेतो. मला देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मी ती भूमिका मांडली होती. पण नंतर मी अजून खोलात जाऊन तपास केला. माहितीची पुन्हा पुन्हा पडताळणी केली. तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडल्याच नव्हत्या, हे माझ्या लक्षात आलं.

आपल्या समाजात प्रत्येक महापुरुषाबद्दल गैरसमज पसरवणारा एक वर्ग आहे. हेच सावरकरांबद्दल घडलं होतं. असंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही घडलं होतं. असं अन्य महापुरुषांबद्दलही घडतं. हा वर्ग सावरकरांची बदनामी करण्यासाठी ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर आणतो. मी त्याला बळी पडलो. त्यामुळे ती भूमिका मी त्यावेळी मांडली होती.

आता सावरकरांबद्दल पूर्ण माहिती घेतल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. देशभक्त असावा तर तो सावरकरांसारखाच असावा, असं मला वाटतं. मी भाजपचा आमदार नसलो असतो तरी माझी हीच भूमिका असली असती. काहीवेळा आपण अभ्यासामध्ये कमी पडतो. हे मी स्वीकारतो. माझी चूक झाली होती ते मी मान्य करतो. त्या पद्धतीने मी माझी भूमिका आता मांडत आहे. पण शिवसेना असं करेल का? शिवसेनेची ही तयारी आहे का?

प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसबद्दलची पूर्वीची भाषणं पाहिल्यास, आजच्या स्थितीत शिवसेना हे स्वीकारेल का?

नितेश राणे - आज शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. पण सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती बनवण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये हेच संजय राऊत पुढे होते.

त्यामुळे स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी शिवसेनेची भूमिका असल्यामुळे काल ते विधिमंडळात दिसून आलं.

यापेक्षा त्यांनी मला सभागृहात प्रस्ताव मांडण्याची संधी दिली असती, तर माझी भूमिका मी समजावून सांगितली असती. त्यातून त्यांचं झाकलं गेलेलं सावरकर प्रेम पुन्हा जागवण्याचं काम मी माझ्या प्रस्तावाच्या माध्यमातून केलं असतं.

प्रश्न - तुम्ही तुमची भूमिका स्वतः बदलली की भाजपने बदलायला लावली?

नितेश राणे - मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. भाजपच्या कोणत्याही नेत्याने मला अशी भूमिका घेण्यास सांगितलेलं नाही. मी योग्यप्रकारे अभ्यास करून ही भूमिका घेतलेली आहे. एक व्यक्ती म्हणून मी काही समजून घेण्यास तयार असेन, आणखी शिकल्यानंतर आपल्या भूमिकेत बदल होत असेल, तर त्यात गैर असं काहीही नाही.

प्रश्न - शिवसेनेने बोलल्याप्रमाणे, तुम्ही तुमची वक्तव्ये मागे घेतलेली आहेत, आता तुम्ही शिवसेनेला काय आव्हान देणार?

नितेश राणे - सध्या शिवसेना काँग्रेससमोर झुकलेली आहे. काँग्रेससमोर झुकणाऱ्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी हिजडे म्हटलं होतं. त्यामुळे माझे जुने ट्वीट शोधण्यापेक्षा त्यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणं योग्य पद्धतीने ऐकावीत. अन्यथा महाराष्ट्रात चेहरा पण दाखवू शकणार नाहीत, अशी त्यांची अवस्था होईल.

म्हणून सावरकरांबद्दल तुम्ही खरंच प्रस्ताव आणा, जेणेकरून पुढच्या पीढीला सावरकर कळले पाहिजेत. आमच्यासारखे सावरकरांना कमी समजून घेतलेल्या लोक जर त्यांना योग्य प्रकारे मांडू शकले. तर समाजात प्रबोधन होईल. चुकीच्या विचारांना कुणी बळी पडू नये, अशी शिकवण मिळेल. त्यातून एक नवीन समाज घडेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)