होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणची घोषणा; युद्ध पुन्हा चिघळतंय?

    • Author, हॅरी सेकुलिचऑर
    • Author, टोबी मॅन
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेच्या सैन्याच्या नव्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ला केला आहे.

आम्ही होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांना लक्ष्य केले आहे, असं इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कोरने (IRGC) सांगितले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर 'कडक' कारवाई करण्याचा इशारा दिला होता आणि तेहरानने युद्ध संपवण्यासाठी 'समझोता करण्यात खूप उशीर केला' असल्याचे म्हटले होते आणि याचवेळेस अमेरिकेकडून हे हल्ले झाले आहेत.

अमेरिकी सेंट्रल कमांड (सेंटकॉम)ने म्हटले की, त्यांनी बुधवारी (10 जून) 'स्वसंरक्षणासाठी हल्ले' सुरू केले, ते 'इराणच्या विनाकारण आणि सतत सुरू असलेल्या आक्रमकतेच्या प्रत्युत्तरादाखल' करण्यात आले होते.

यानंतर इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, IRGC ने होर्मुझ सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला केला.

अलीकडच्या काळात इराण आणि अमेरिका यांनी एकमेकांच्या लष्करी आणि टेहळणी केंद्रांवरही हल्ले केले आहेत.

ही घटना प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यांच्या वाढत्या मालिकेचा भागच आहे आणि एप्रिलमध्ये झालेल्या नाजूक युद्धविरामावर पुन्हा संकट निर्माण झाले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद

पर्शियन आखातात असलेल्या इराणच्या केशम बेटावरही स्फोटांचे आवाज ऐकू आले. याशिवाय बंदर अब्बास आणि सीरिकसह अनेक शहरांमध्येही स्फोट झाल्याच्या बातम्या आहेत.

अमेरिकन हल्ल्यांच्या प्रत्युत्तरासाठी म्हणून, इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी 'सर्व प्रकारच्या जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.'

मात्र, सेंटकॉमने सांगितले की, 'व्यावसायिक जहाजांची ये-जा अजूनही होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू आहे.'

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

ताज्या अमेरिकन हल्ल्यांच्या काही तास आधी ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, "आम्ही काल त्यांच्यावर हल्ला केला आणि आजही तसाच करणार आहोत."

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणी नेत्यांनी "समझोत्यावर चर्चा करण्यासाठी खूप वेळ लावला."

त्यावर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला की, अमेरिका "विरोधाभासी संदेशांमुळे कूटनीतिक प्रक्रियेला नुकसान करत आहे."

ट्रम्प यांच्या वक्तव्याला उत्तर देताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी सांगितले की, "इराण कोणत्याही दबाव किंवा धमकीविरोधात ठामपणे उभा राहील."

यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसथ यांनी सांगितले की, इराणच्या "महत्त्वाच्या केंद्रांवर बॉम्ब टाकले जातील."

त्यांनी असेही म्हटले की इराणला समझोता करण्याची संधी देण्यात आली होती, पण त्याने त्याचा फायदा घेतला नाही.

बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ल्याचा इराणचा दावा

बहरीनच्या गृह मंत्रालयाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. गृह मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका संदेशात नागरिक आणि रहिवाशांना शांत राहण्याचे तसेच जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

गुरुवारी (11 जून) सकाळी अमेरिकन हल्ल्यानंतर सुमारे एका तासाने, इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थांनी देशाच्या लष्कराचा संदर्भ देत सांगितले की, "बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. लष्कराच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या (फिफ्थ फ्लीट) पॅट्रियट प्रणालीचे संप्रेषण अँटेना आणि रडार लक्ष्य करण्यात आले."

इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने रिव्होल्युशनरी गार्डचा संदर्भ देत म्हटले आहे की, "अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून बहरीनमधील एका विमानतळासह आणि कुवेतमधील आणखी दोन ठिकाणांसह एकूण 18 महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत."

याआधी अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना इराणने म्हटले आहे की, तो अमेरिकन हल्ल्यांसमोर झुकणार नाही आणि त्याला योग्य उत्तर देईल.

संयुक्त राष्ट्रांचा इशारा

एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली होती, ती सुरुवातीला दोन आठवड्यांसाठी होती.

त्यानंतर अधूनमधून दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला, पण पूर्ण युद्धाची स्थिती निर्माण झाली नव्हती.

मात्र, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चा सध्या थांबली आहे आणि हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.

मंगळवारी (9 जून) एका अमेरिकन हेलिकॉप्टरला पाडण्यात आले होते. त्यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले.

यानंतर अमेरिकेने इराणच्या काही तळांवर हल्ला केला, त्याच्या प्रत्युत्तरादाखल आयआरजीसीने पश्चिम आशियातील अमेरिकन केंद्रांना लक्ष्य केले.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी इशारा दिला की, पश्चिम आशियातील प्रदेश "अधिक खोल संकटाकडे ढकलला जात आहे" आणि सध्याची परिस्थिती "युद्धविरामापेक्षा मर्यादित संघर्षासारखी दिसत आहे."

त्यांनी सर्व पक्षांना कूटनीतिचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत म्हटले की, "आता आणखी हल्ले नकोत. आता आणखी बहाणे नकोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)