You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृता फडणवीसांना आवरा; शिवसेनेची RSSकडे मागणी : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अमृता फडणवीसांना आवरा; शिवसेनेची संघाकडे मागणी
'बांगड्या', 'रेशमी किडा' असे शब्दप्रयोग करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र लिहून 'अमृता वहिनींना आवर घाला' अशी विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं विधान भय्याजी जोशी यांनी नुकतच केलं आहे. तोच धागा पकडत तिवारी यांनी फडणवीसांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
"शिवसेना-भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष भविष्यात जवळ येतील, असे आपणास वाटत असले तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांच्या ताज्या विधानांनी या दोन पक्षांतील दुरावा आणखी वाढला आहे. श्री आणि सौ फडणवीस यांची अनावश्यक आगपाखड हेच महाविकास आघाडी स्थापन होण्याचे मूळ कारण आहे," असं तिवारी यांनी म्हटलंय.
अमृता फडणवीस यांचा राजकारणातील हस्तक्षेप आणि सक्रियता अनाकलनीय आहेच, शिवाय भारतीय राजकारणातील परंपरेलाही छेद देणारी आहे, असंही तिवारी यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
2. गृहमंत्री कुठे आहात? - सामनातून सवाल
दिल्ली जळत असताना, आक्रोश करत असताना गृहमंत्री अमित शाह कुठे होते, काय करत होते, असे प्रश्न विचारले जात आहेत. सामनाच्या संपादकीय या बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यात पुढे म्हटलंय, दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत 38 बळी गेले आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झालं आहे. केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते आणि विरोधी बाकांवर भाजप असते, तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून राजीनामा हवाच, अशी भूमिका घेतली असती. पण आता तसे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे आणि विरोधी पक्ष कमजोर आहे.
तब्बल तीन दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले, पण त्यानं काय होणार, जे नुकसान व्हायचं ते झालं आहे, असंही संपादकीयात म्हटलंय.
3. इंदुरीकरांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमध्ये वातावरण तापलं
कीर्तनकार इंदुरीकर महाराज शुक्रवारी कोल्हापुरात असणार आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इंदुरीकरांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ॉ
मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि इतर पुरोगामी संघटनांचा इंदुरीकर महाराजांना विरोध आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे. मात्र त्याआधी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाब विचारणार आहेत.
दरम्यान, इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई न केल्यानं आता अहमदनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटीस बजावली आहे. इंदुरीकर महाराजांवर 15 दिवसांत कारवाई न केल्यास यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचं रंजना गावंडे यांनी सांगितलं आहे.
4. प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी 3 प्राध्यापक निलंबित
अमरावती जिल्ह्यातील महिला कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेमविवाह न करण्याची शपथ 13 फेब्रुवारीला दिली होती. याप्रकरणी तीन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.
दुसरीकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचं कॉलेज गेटवर आंदोलन सुरु करण्यातं आलं आहे. या तिघांचं निलंबन मागे घ्या अशी ठाम भूमिका विद्यार्थीनींनी घेतली आहे.
प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विजय कापसे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीनं प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी होण्याआधीच यांना निलंबित करण्यात आलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
5. मध्य प्रदेशात महिलांसाठी दारूची वेगळी दुकानं
मध्य प्रदेश सरकारनं महिलांसाठी दारूची वेगळी दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही अडचणींशिवाय महिलांनाही दारू विकत घेता यावी, हा सरकारचा प्रयत्न आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
सुरुवातीला भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये एक-एक दुकानं सुरू करण्यात येतील. महिलांना आवडणारी वाईन आणि व्हिस्कीची सर्व ब्रँड्स या दुकानांवर उपलब्ध करून दिली जातील.
मुंबई, दिल्ली आणि इतर मेट्रो सिटींच्या धर्तीवर ही दुकानं सुरू केली जातील. दर्जा उत्तम रहावा यासाठी दारूची फक्त विदेशी ब्रँड्स दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातील. राज्यात नोंदणी नसलेल्या ब्रँड्सची दारूही येथे विकली जाईल, असं बातमीत म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)