You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद : #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
अनुराग ठाकूर यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिल्लीतील रिठाला इथं आयोजित केलेल्या एका सभेमध्ये त्यांनी व्यासपीठावरून घोषणा दिली, "देश के गद्दारों को..."
त्यांच्या या घोषणेला जमावातून उत्तर आलं, "गोली मारो **** को."
त्यावर अनुराग ठाकूर यांनी पुन्हा म्हटलं, की आवाज अगदी पाठीमागेही पोहोचला पाहिजे. गिरीराजजींना सुद्धा ऐकू आलं पाहिजे."
सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.
टेलिव्हिजन क्वीज शो होस्ट सिद्धार्थ बसू यांनी अनुराग ठाकूर यांच्या या विधानावर आक्षेप घेताना म्हटलं आहे, की विरोध करणाऱ्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करणारी ही कृती नाही का? मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो.
2. पुन्हा सत्तेत आल्यावर विरोधकांना संपविण्याचा भाजपचा डाव होता- पृथ्वीराज चव्हाण
"राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला असता तर विरोधकांना संपविण्याचा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता," असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
निवडणुकीपूर्वी धाक दाखवून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 39 खासदार-आमदारांचे पक्षांतर करण्यात आले होते. भाजपची ही खेळी लक्षात घेऊनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.
भाजप सत्तेत असताना विरोधकांना संपविणे हा भाजपचा एक कलमी कार्यक्रम होता. सहकारी संस्थांवर दबाव टाकण्यात आला. भाजपला अनुकूल भूमिका घ्यावी म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर करण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ने आयोजित केलेल्या 'आयडिया एक्स्जेंज' कार्यक्रमात बोलताना केला.
एक पक्ष राजवटीच्या दृष्टीने पावले टाकली जात होती. भाजपचा हा धोका ओळखूनच तीन पक्ष एकत्र आले. राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी भाजपला विरोध या एकाच मुद्यावर तिघांनी हातमिळवणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
3. एल्गार परिषद तपासासाठी NIA चं पथक पुण्यात, पुणे पोलिसांशी चर्चा
एल्गार परिषद प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्यात आल्यानंतर त्यांचे एक पथक सोमवारी (27 जानेवारी) पुण्यात दाखल झालं. त्यांनी या गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेण्यासंदर्भात पुणे पोलिसांशी चर्चा केली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
याबाबतचे एक पत्र एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांकडे सोपविले असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. यावेळी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकारीदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. काही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग होणार असल्याचे समजते. NIA पथकाच्या भेटीबाबत पुणे पोलीस दलातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
4. CAA: उत्तर प्रदेश पोलिसांविरुद्ध राहुल गांधी-प्रियंका गांधींची NHRC कडे तक्रार
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे (NHRC) तक्रार केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) झालेल्या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राहुल आणि प्रियंका यांनी NHRC कडे तक्रार केली आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिली आहे.
आंदोलकांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गोळीबार आणि लाठीचार्जची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी राहुल आणि प्रियंका यांनी केली आहे.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये सोमवारी (27 जानेवारी) प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केरळ, पंजाब आणि राजस्थाननंतर CAA विरोधात प्रस्ताव मंजूर करणारे पश्चिम बंगाल हे चौथे राज्य आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीये.
या दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले, की हे आंदोलन फक्त अल्पसंख्यांकांचे नाही तर सर्वांचे आहे.
5. RSS ची पहिली लष्करी शाळा उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली लष्करी शाळा उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरात सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात ही शाळा सुरू होईल. लोकमतनं ही बातमी दिलीये.
रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर असं या शाळेचं नाव असेल. रज्जू भैय्या माजी सरसंघचालक होते. या शाळेची इमारत जवळपास पूर्ण झाली असून इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या तुकडीत 160 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या शाळेमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, नौदल अॅकेडमी तसंच भारतीय लष्कारातील भरतीसंदर्भातल्या अन्य परीक्षांची तयारी करून घेण्यात येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)