उद्धव ठाकरे: राज्यातील महिला अत्याचारांविरोधात तात्काळ आणि जलद कार्यवाही करा #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. महिला अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करा- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

गुन्हेगारांना वचक बसेल असं काम करण्यासाठी महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करावी, असंही उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

निर्भया फंडचा विनियोग तात्काळ कसा करता येईल याची कार्यपद्धती तयार करा, असेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नागपूर अधिवेशनामध्ये सरकार अस्थिर होण्याचा आजवरचा इतिहास आहे. बॅ. अंतुले, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांची खुर्ची नागपूर अधिवेशवनानंतर थोड्याच दिवसांमध्ये गेली होती. शरद पवार यांच्याविरोधात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव आदिक यांनी केलेल्या बंडाची सुरुवात हिवाळी अधिवेशनातच झाली होती.

उद्धव ठाकरे यांच्यासह सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ केवळ सात जणांचे असून सर्व मंत्री बिनखात्याचे आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. NRC मधून वगळलेल्या 5 लाख बंगाली हिंदूंना नागरिकत्व मिळणार

नागरिकत्व (सुधारणा) विधेयक म्हणजेच Citizenship (Amendment) Bill मुळे बांगलादेशातून आलेल्या 5 लाख हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. राज्यसभेत ते मंजूर झाल्यावर या लोकांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सोपा होईल, असा सराकारचा दावा आहे.

याबाबत आसामचे आरोग्य मंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले, "या लोकांनी लवकरात लवकर नागरिकत्वासाठी अर्ज करावा म्हणजे त्याची तपासणी करता येईल. 2021 साली होणाऱ्या निवडणुकांच्या आधी त्यांना नागरिकत्व मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईल, असं आम्हाला वाटतं."

NRC मधून 5,04,800 बंगाली हिंदूंना वगळण्यात आलं होतं. त्यातील 3 ते 4 लाख लोक कायद्यातील नव्या सुधारणेद्वारे नागरिकत्वासाठी अर्ज करतील आणि NRCमध्ये अर्ज न केलेले एक लाख बंगाली हिंदूही आता नागरिकत्वासाठी अर्ज करतील, असं सर्मा यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. बायकोच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

बायको कपडे धुवायला लावते, घरकाम करून घेते म्हणून पुण्यातल्या एकाने आत्महत्या केल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना एक मूलही आहे.

गेल्या काही दिवसांपासून पत्नी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुवायला लावून घरातील कामे करून घ्यायची, म्हणून या तरुणाने कंटाळून आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

4. 'दिल्लीत एवढं प्रदूषण असताना फाशी कशाला?'

निर्भया बलात्कार खटल्यातील आरोपीने फाशीच्या शिक्षेवरील एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दिल्लीमध्ये असलेल्या प्रदूषित हवा आणि पाण्यामुळे आपलं आयुष्य आधीच कमी होत असताना फाशी देण्याची काय गरज आहे, असा प्रश्न अक्षय नावाच्या आरोपीने या याचिकेद्वारे विचारला आहे.

ही बातमी न्यूज 18ने प्रसिद्ध केली आहे.

"दिल्ली राजधानी क्षेत्र आणि महानगराची स्थिती एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. इतकंच नाही तर या क्षेत्रामध्ये पाणीही विषारी झालं आहे. हे सगळं सरकारनं संसदेत सादर केलेल्या अहवालात सिद्ध झालं आहे. दिल्ली राजधानी क्षेत्रातील प्रदूषणाबद्दल सळ्यांनाच माहिती आहे. असंही आयुष्य कमीच होणार आहे तर मग फाशीची गरजच काय," असा प्रश्न या आरोपीने आपल्या पुनर्विचार याचिकेत विचारला आहे.

5. PSLV चे 50वे उड्डाण आज

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच PSLVवरून (Polar Satellite Launch Vehicle) आज 50वे प्रक्षेपण होणार आहे. आजच्या प्रक्षेपणातून रडारचा समावेश असलेल्या रिसॅट 2 BR1 या भारतीय उपग्रहासह इस्रायल, अमेरिका, इटली आणि जपान या देशांच्या नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येईल.

महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ध्रुवीय कक्षेत 1,750 किलो वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची PSLVची क्षमता आहे. आतापर्यंत या प्रक्षेपकाने एकूण 320 टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. PSLVनेच चांद्रयान 1 आणि मंगळयान या मोहिमांसाठीच्या यानाचे प्रक्षेपण केले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)