स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद स्वामी देशातून फरार - गुजरात पोलीस : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. नित्यानंद स्वामी देशातून फरार - गुजरात पोलीस

स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद स्वामी देशातून फरार झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

नित्यानंद यांच्या दोन शिष्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुजरात पोलीस त्यांची चौकशी करत होते.

योगिनी सर्वज्ञपीठम येथील आश्रम चालवण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करून त्यांना देणगी गोळा करायला लावल्याप्रकरणी बुधवारी नित्यानंद यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली होती.

अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आर. व्ही. असारी म्हणाले की, "नित्यानंद परदेशात पळून गेले आहेत आणि गरज भासल्यास गुजरता पोलीस योग्यप्रकारे त्यांना ताब्यात घेईल."

2. रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार, खासदारांची चौकशी करा

रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार आणि खासदारांची चौकशी करा, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार आणि खासदारांची एक यादीच नितीन गडकरी यांनी CBI आणि EDला दिली आहे. यासोबत या लोकप्रतिनिधींच्या गुप्त संवादाच्या ऑडिओ तसंच व्हीडिओ फाईल्सही दिल्या आहेत.

"चार आठवड्यांपूर्वी माझ्याकडे आलेल्या कंत्राटदाराला मी ऑडिओ तसंच व्हीडिओ फाईल्स रेकॉरड करायला सांगितलं होतं. ही सर्व माहिती मी CBI आणि EDला दिली आहे. रस्ते बांधणीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही," असं गडकरींनी म्हटलं आहे.

3. व्यापम घोटाळ्यातील सर्व 31 आरोपी दोषी

मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळामध्ये (व्यापम) झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टानं सर्व 31 आरोपींना दोषी ठरवलं आहे. याबाबत येत्या 25 नोव्हेंबरला रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयननं सर्व 31 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. हे सर्व आरोपी जामिनावर होते. मात्र कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानं या आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

व्यापमकडून झालेल्या सरकारी नोकरीमधील गडबडीप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. व्यापम घोटाळ्याशी संबंधित 26 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

4. अयोध्येत गगनाला भिडणारं राम मंदिर बांधणार - अमित शाह

"काँग्रेसनं अयोध्या प्रकरणात अडथळे आणले. मात्र, अयोध्येवर सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, आता अयोध्येत गगनाला भिडेल असं राम मंदिर बांधण्यात येईल," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. झारखंडमध्ये ते बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

कलम 370विषयी ते म्हणाले, "काँग्रेसनं वोट बँकेसाठी हा मुद्दा 70 वर्षं लटकून ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात कलम 370 आणि 35-A रद्द करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं."

दरम्यान, रामजन्मभूमी-बाबरी मशिदी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समीक्षा याचिका दाखल न करण्याचा निर्णय मौलाना महमूद मदानी यांच्या नेतृत्वात जमीअत उलेमा-हिंद संघटनेनं घेतला आहे.

यावषयी संघटनेनं म्हटलं, "अयोध्येचा निकाल मुक्त भारताच्या इतिहासातील सर्वांत गडद डाग आहे. पण आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्यानं पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही."

5. मोंदीच्या चार्टर्ड फ्लाईटवर 255 कोटी खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यासाठीच्या चार्टर्ड फ्लाईटवर गेल्या 3 वर्षांत 255 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिली आहे. NDTV ही बातमी दिली आहे.

2016-17मध्ये 76.27कोटी, 2017-18 मध्ये 99.32 कोटी, तर 2018-19मध्ये 79.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

2019-20मध्ये खर्च करण्यात आलेल्या पैशांचं बिल अद्याप मिळालेलं नसल्याचं मुरलीधरन यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)