You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या घरावर हल्ला, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. भुसावळमध्ये भाजप नगरसेवकासह 5 जणांचा खून
भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर त्यांच्या घरी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खरात यांच्यासह कुटुंबातील तिघांचा उपचारादरम्यान, तर 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, असं ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केलं आहे.
दरम्यान, नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर पूर्वी काही गुन्हे आहेत, असं बातमीत म्हटलं आहे.
2. महात्मा गांधींना रिटायर करा - तुषार गांधी
"देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," असं वक्तव्य लेखक आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"मध्य प्रदेशातील रेवा आश्रमातून महात्मा गांधींच्या अस्थी चोरण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या फोटोखाली 'गद्दार' लिहिण्यात आलं आहे. या घटनेला 3 दिवस झाले आहेत. देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," अशी टीका तुषार गांधी यांनी केली आहे.
'गांधी : माणूस ते महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभादरम्यान औरंगाबादेत ते बोलत होते. गांधीजींच्या अस्थीचोरीच्या घटनेबाबत राजकीय पक्ष, गांधीवादी संस्था आणि प्रसारमाध्यमांनी मौन बाळगलंय, असा आरोप त्यांनी केला.
3. महाराष्ट्रात मोदींच्या 9 तर अमित शाहांच्या 18 सभा
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9 तर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 18 सभा होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ 9 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी 17 ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी ही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं.
4. काँग्रेस आता राष्ट्रवादाचे धडे गिरवणार
"आमच्यासाठी 'भारत माता की जय' सगळ्यात अगोदर असतं, मात्र काँग्रेसचं धोरण 'सोनिया माता की जय' असं आहे," असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
चंदीगडमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले "आम्ही देशाला प्राथमिकता देतो, काँग्रेस मात्र गांधी कुटुंबीयांना प्राधान्य देतं. काँग्रेस पक्ष नेहरू-गांधी कुटुंबीयांपलीकडचा विचार करू शकत नाही."
हरियाणात महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणुका होत आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवाद या विषयावर प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रवाद, संवाद आणि मोहीम या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणादरम्यान, निवडणूक कशी लढवायची, हाही एक महत्त्वाचा मुद्दा असेल, असं ते म्हणाले.
5. व्यावसायिक श्रेत्राकडे जाणाऱ्या निधीत 88 % घट - RBI
व्यावसायिक क्षेत्राकडे जाणाऱ्या निधीत 88 % घट झाली असल्याचं 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या (RBI) आकडेवारीतून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
RBIच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये (एप्रिल ते मध्य सप्टेंबर) बँका आणि बिगर बँकांकडून व्यावसायिक क्षेत्राकडे जाणारा निधी 90 हजार 995 कोटी रुपये होता, तर याच कालावधीत 2018-19मध्ये हा निधी 7 लाख 36 हजार 87 कोटी रुपये इतका होता.
व्यावसायिक क्षेत्रात शेती, उत्पादन आणि वाहतूक यांचा समावेश होत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)