You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर: MIM सोबत नसल्याचा परिणाम नाही, कारण आम्हाला मुस्लीम मतं मिळालीच नाही #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1) प्रकाश आंबेडकर - मुस्लीम मतं मिळाली नाही, त्यामुळे...
आम्हाला मुस्लीम मतं मिळाली नाहीत, त्यामुळं MIM सोबत नसण्याचा काहीच परिणाम होणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. दिव्य मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
MIM सोबत नसल्याचा परिणाम होईल का, असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, "काहीच नाही, कारण आम्हाला मुस्लिम मतं पडलीच नाहीत. राहिला विषय राज्याचा. सजादचा व्हिडिओ बघा. महाराष्ट्रातील MIM काय खेळ खेळतेय, हे तुम्हाला कळेल. उलट, कोणत्याही पक्षात नसलेले, परंतु मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारे मुस्लीम आमच्याकडे येत आहेत. हे मोठे स्थित्यंतर आहे."
या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या गोपीचंद पडळकरांवरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "गोपीचंद पडळकरांचा बळी जाऊ देऊ नये, असा आपला आग्रह असेल. पडळकरांचा मतदारसंघ खानापूर आहे, त्यांनी तिथूनच उमेदवारीसाठी आग्रही असावं. भाजपसाठी बारामती अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तिथून उमेदवारी घ्यायला हवी होती."
तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य अलुतेदार-बलुतेदारांचे होते, त्यांचीच सत्ता स्थापन करणे, हेच वंचित बहुजन आघाडीचे अंतिम उद्दिष्ट आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं.
2) उर्मिला मातोंडकर काँग्रेससाठी प्रचार करणार
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर, काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचं कारण देत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या उर्मिला मातोंडकर या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मदतीला धावून येणार आहेत.
"अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी माझं बोलणं झालंय. त्यांची नाराजी दूर झाली असून त्या लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून सहभागी होतील," असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
तसेच, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये आता गटबाजी राहिलेली नाही, मतभेद सर्वच पक्षांमध्ये असतात, असाही दावा गायकवाडांनी केला.
3) देशात फक्त हिंदुत्ववादाचा विचार चालवणं घातक - शरद पवार
सर्व धर्मियांचा सन्मान करणं आवश्यक आहे. देशात केवळ हिंदुत्त्ववादाचा विचार चालवणं देशाच्या दृष्टीनं घातक आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरातील प्रचारसभेत म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
कोल्हापुरातल्या राधानगरी मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच, आपल्यातली सर्व नाराजी बाजूला ठेवून कामाला लागा, असा आदेशही शरद पवार यांनी यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
4) चंदू चव्हाण यांचा राजीनामा
लष्करी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून जवान चंदू चव्हाण यांनी राजीनामा दिलाय. यासंदर्भात चंदू चव्हाण यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात राजीनाम्यामागची आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली.
29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू चव्हाण नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर 21 जानेवारी 2016 रोजी पाकिस्तानातून चंदू चव्हाण यांची सुटका झाली.
मात्र, "मी पाकिस्तानातून सुटून आल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला होता. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत त्रास दिला जात होता. शिक्षा दिल्यानं मानसिक खच्चीकरण झालंय. मला न्याय मिळत नाही. त्यामुळं या त्रासाला कंटाळून राजीनामा देतोय," असं चंदू चव्हाण यांनी म्हटलंय.
दरम्यान, न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषणाला बसेल. शिवाय त्यावेळी अशा गोष्टी बाहेर येतील, ज्या कुणालाच माहीत नाहीत, असा इशाराही चंदू चव्हाण यांनी दिलाय.
5) नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मिझोरमचा विरोध
नागररिकत्व सुधारणा विधेयकाला मिझोरमचा विरोध असल्याचं मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं. यासंबंधी अधिकृत पत्रकच मिझोरम राज्याकडून काढण्यात आलंय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
मुख्यमंत्री जोरामथांगा यांचा मिझो नॅशनल फ्रंट हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे.
दुसरीकडे, अमित शाह यांना मिझोरम दौऱ्यात आंदोलकांचाही सामना करावा लागला. ज्या रस्त्यावरून अमित शाह यांच्या गाड्यांचा ताफा गेला, तिथं अनेक आंदोलकांनी पोस्टर्स घेऊन नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला.
या आंदोलकांमध्ये सर्वसामान्य लोकांसाह विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)