You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रवीश कुमार यांना 2013 मध्ये 5% GDP वाढीचा दर चांगला वाटायचा?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
2013 साली भारताचा जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला होता तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेस रवीश कुमार यांना तो काळजीचा विषय वाटला नव्हता. पण 2019मध्ये जीडीपी पाच टक्क्यांवर आल्यावर भारत मंदीच्या विळख्यात गेल्याचं त्यांना वाटत आहे, असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
30 सेकंदांच्या या व्हीडिओतला पहिला अर्धा भाग रवीश कुमार यांच्या 2013 मधला टीव्ही शोमधून घेतला आहे. त्यानंतर त्याला सध्याच्या कार्यक्रमाला जोडून दोन्हींची तुलना केली आहे. जुन्या व्हीडिओमध्ये रवीश कुमार म्हणतात, "अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण जरा जास्तच रडे आहेत असं वाटत नाही का? कारण जगात फार कमी अर्थव्यवस्था 5 टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहेत."
तर सध्याच्या व्हीडिओत ते म्हणतात, "भारताची अर्थव्यवस्थेची स्थिती बरी नाही. जीडीपीच्या आकडेवारीनुसार 5 टक्क्यांची गती भारत अर्थव्यवस्थेच्या विळख्यात आल्याचं स्पष्ट करते."
फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये रवीश कुमार यांच्या रॅमन मॅगसेसे पब्लिक लेक्चरआधी हा व्हीडिओ व्हायरल केल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.
रवीश कुमार यांना 2019 सालचा प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी 9 सप्टेंबर 2019 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
रवीश कुमार यांचा व्हायरल करण्यात आलेला व्हीडिओ भ्रम पसरवणारा आहे आणि संदर्भ सोडून एका मोठ्या चर्चेतून तो उचललेला आहे. अयोग्य संदर्भांसह तो शेअर केला जात आहे.
2013चा व्हीडिओ
व्हायरल व्हीडिओमध्ये पहिल्या भागात जो जुना व्हीडिओ वापरला गेला आहे तो 27 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झालेल्या रवीश कुमार यांच्या टीव्ही शोचा भाग आहे.
या शोमध्ये भारताच्या आर्थिक पाहणी अहवाल 2012-13 वर चर्चा केली गेली होती. त्यादिवशी सकाळी तो अहवाल भारताचे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत मांडला होता.
या शोची सुरुवात करताना रवीश कुमार म्हणाले होते, "वर्तमान काळात देशाची आर्थिक स्थिती ठिक नाही. भविष्य काळात ती ठिक होईल असं वाटतं. भूतकाळाची म्हणजे जेव्हा भारत 8 ते 9 टक्क्यांच्या विकासदराने पुढे जात होता त्या काळाची तुलना करता आता अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाची गती संथ झाल्याचं दिसतं."
2012-13 च्या आर्थिक पाहणी अहवालात उद्योग, शेती, उत्पादन, सेवा क्षेत्राची गती मंदावल्याचं दिसून आलं होतं.
भारताचे सध्याचे आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यमसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारताची विकासगाथा आता अस्ताला गेली आहे का? वाघाची शेळी झाली आहे का? असा प्रश्न रवीश कुमार यांनी त्यावेळी विचारला होता.
त्याला उत्तर देताना सुब्रमण्यम म्हणाले होते, "भारताचा विकासदर 5 टक्क्यांवर येईल इतकी काही जागतिक मंदीची स्थिती वाईट नाही. गेल्यावर्षी (2012-13) 27 देशांनी 7 टक्के विकासदर गाठला होता. ते पाहाता सरकारनं आपल्या अर्थनितीवर चिंतन करायला हवं"
या टीव्ही शोमध्ये काँग्रेस पार्टीतर्फे संजय निरूपम यांनी सहभाग घेतला होता. देशाच्या आर्थिक स्थितीची कोण जबाबदारी घेणार? असं त्यांना विचारण्यात आलं होतं.
त्याला उत्तर देताना निरुपम म्हणाले होते, "देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे याबद्दल काहीच मतभेद नाहीत. मात्र पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये भारताचा विकासदर अजूनही चांगला आहे."
2019चा व्हीडिओ
व्हायरल व्हीडिओमध्ये तुलनेसाठी वापरण्यात आलेला सध्याचा व्हीडिओ रवीश कुमार यांच्या 30 ऑगस्टच्या शोमधील एक भाग आहे.
या शोच्या सुरुवातीला रवीश कुमार जे स्वगत म्हणतात ते या व्हायरल व्हीडिओमध्ये जोडलं गेलं आहे.
ते म्हणतात, "भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. त्यावर पांघरूण घालण्याच्या प्रयत्नांमध्ये आज जीडीपीचे आकड्यांनी या जखमा उघड्या केल्या. गेल्या 6 वर्षांमध्ये जीडीपीची इतकी घसरण झाली नव्हती. 2013मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये भारताचा विकासदर 4.3 टक्के होता. त्यानंतर जीडीपी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इतक्या खाली पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे."
रवीश म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकली आहे हे पाच टक्के जीडीपी स्पष्ट करते. शेती, खाणकाम, बांधकाम, उत्पादन आणि रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती अत्यंत खराब आहे.
30 ऑगस्ट रोजी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांनी जीडीपीची अधिकृत आकडेवारी जाहीर केल्यानंतर रवीश कुमार यांनी हा शो केला होता.
मात्र सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना संदर्भ जोडून भ्रम पसरवणारी माहिती प्रसिद्ध केली जात आहे.
परंतु फेक न्यूजच्या आधारावर रवीश कुमार यांना ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सोशल मीडियावर त्यांच्याबाबतीत अशा गोष्टी लिहिल्या जातात.
रॅमन मॅगसेसे लेक्चरमध्ये बोलतानाही रवीश कुमार यांनी फेक न्यूजचा उल्लेख केला तसंच ट्रोल करणाऱ्यांचा उल्लेख केला.
ते म्हणाले, "देशभरात माझा नंबर व्हायरल करण्यात आला आणि मला शिव्या देण्यास सांगितलं गेलं. मला शिव्या मिळाल्या धमक्या मिळाल्या. आजही मिळतात. पण त्याच नंबरवर लोक आपापल्या भागातल्या बातम्या कळवू लागले. मी त्या सर्व लोकांचा उल्लेख करू इच्छितो. ज्या लोकांनी पहिल्यांदा ट्रोल केलं, शिव्या दिल्या. मात्र नंतर स्वतः माझी माफी मागितली. जेव्हा सत्ताधारी पक्षाने माझ्या शोवर बहिष्कार टाकला तेव्हा माझे सगळे रस्ते बंद झाले होते. त्यावेळेस याच लोकांनी आपल्या समस्यांनी माझा शो व्यापून टाकला."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)